जागतिक संकेतामुळे बाजार प्रभावीत
सेन्सेक्स 288 तर निफ्टी 88 अंकांनी नुकसानीत
मुंबई :
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील तिसऱ्या सत्रात बुधवारी फारसे चढ-उतार दिसून आले नाहीत. मात्र जागतिक बाजारांकडून मिळालेल्या मिश्र संकेतांमध्ये, गुंतवणूकदार सावध राहिले. अंतिम सत्रात शेअर बाजार घसरणीसह बंद झाला आहे.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स 93 अंकांच्या वाढीसह उघडला. मात्र दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 287.60 अंकांच्या घसरणीसह निर्देशांक 83,409.69 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 88.40 अंकांच्या नुकसानीसह निर्देशांक 25,453.40 वर बंद झाला आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप विभागांमध्येही घसरण दिसून आली. बीएसई मिडकॅप निर्देशांक 0.18 टक्क्यांनी घसरला आणि स्मॉलकॅप निर्देशांक 0.20 टक्क्यांनी घसरला.
सेन्सेक्समध्ये 30 शेअर्सपैकी टाटा स्टील, एशियन पेंट्स, अल्ट्राटेक सिमेंट, ट्रेंट आणि मारुती सुझुकी यांचे समभाग सर्वाधिक वधारले. यामध्ये 1.38 टक्क्यांवरून 3.72 टक्के पर्यंत तेजी दिसून आली. याशिवाय, सन फार्मा, टाटा मोटर्स, भारती एअरटेल, टेक महिंद्रा, एनटीपीसी, टायटन, अॅक्सिस बँक आणि इन्फोसिस हे तेजीत होते. दुसरीकडे, बजाज फिनसर्व्ह, एल अँड टी, बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक आणि बीईएल हे सेन्सेक्समधील सर्वाधिक घसरणीतले पाच समभाग राहिले होते. याशिवाय, कोटक बँक, पॉवर ग्रिड, एसबीआय, रिलायन्स, आयटीसी, इटरनल, महिंद्रा अँड महिंद्रा, अदानी पोर्टस्, एचसीएल टेक आणि टीसीएस नुकसानीसह बंद झाले.
या क्षेत्रांची कामगिरी
क्षेत्रीय आघाडीवर, निफ्टी धातू, ग्राहकोपयोगी वस्तू, वाहन, आयटी, औषधनिर्माण आणि आरोग्यसेवा निर्देशांक स्थिर राहिले. दुसरीकडे, निफ्टी रिअल्टी, वित्तीय सेवा, बँका, तेल आणि वायू आणि मीडिया निर्देशांकांमध्ये घसरण नोंदली गेली. आशिया-पॅसिफिकमधील बहुतेक बाजारपेठांची सुरुवात मंदावलेल्या स्थितीत झाली.