9 कंपन्यांच्या बाजार मूल्यात 3.35 लाख कोटींची वाढ
वृत्तसंस्था/ मुंबई
बाजारातील दहापैकी नऊ कंपन्यांच्या बाजार भांडवल मूल्यामध्ये मागच्या आठवड्यात 3.35 लाख कोटी रुपयांची वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज ही बाजार मूल्य वाढवण्यामध्ये आघाडीवर राहिली होती. एचडीएफसी बँक, टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, इन्फोसिस, बजाज फायनान्स, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि आयटीसी या कंपन्यांच्या बाजार भांडवल मूल्यामध्ये वाढ झाली होती तर भारती एअरटेल ही दूरसंचार कंपनी मात्र नुकसानीत राहिली होती.
मागच्या आठवड्यामध्ये मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 2876 अंकांनी म्हणजेच 3.61 टक्के इतका वाढला होता. रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल मूल्य 1 लाख 6 हजार 703 कोटी रुपयांनी वाढत 19 लाख 71 हजार 139 कोटी रुपयांवर तर आयसीआयसीआय बँकेचे बाजार मूल्य 46,306 कोटी रुपयांनी वाढून 10 लाख 36 हजार 322 कोटी रुपयांवर पोहोचले होते.
या आयटी कंपन्यांचे मूल्य वाढले
आयटी क्षेत्रातील कंपनी टीसीएसचे बाजार भांडवल मूल्य 43688 कोटी रुपयांनी वाढत 12 लाख 89 हजार 106 कोटी रुपयांवर पोहोचले होते. इन्फोसिसचे बाजारमूल्य 34281 कोटी रुपयांनी वाढत 6 लाख 60 हजार 365 कोटी रुपयांवर पोहोचले होते.
खाजगी क्षेत्रातील कंपनी एचडीएफसी बँकेचे बाजार मूल्य 34 हजार 29 कोटी रुपयांनी वाढत 14 लाख 80 हजार 323 कोटींवर पोहचले.