आरबीआयच्या निर्णयाने बाजार मजबूत
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवड्यातील अंतिम सत्रात शुक्रवारी भारतीय भांडवली बाजार हा एक दिवसांच्या घसरणीनंतर पुन्हा मजबूत होत बंद झाला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेची मागील दोन दिवसांपासून सुरु असणाऱ्या पतधोरण बैठकीचा निर्णय शुक्रवारी आरबीआयने सकाळीच सादर केला. यामुळे गुरुवारी निर्माण झालेला दबाव काहीसा कमी होत बाजाराने मोठी तेजी प्राप्त केली.
मुख्य कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर जवळपास 303.91 अंकांनी वधारुन निर्देशांक 69,825.60 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 68.25 अंकांनी वधारुन निर्देशांक 20,969.40 वर बंद झाला आहे. यामध्ये पहिल्यादांच निफ्टीने 21 हजारांचा टप्पा प्राप्त केला आहे.
बाजारात शुक्रवारच्या सत्रात वेगाने झालेल्या नफाकमाईच्या कारणास्तव बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप यांचे निर्देशांक हे 1 टक्क्यांनी खाली सरकले होते. आरबीआयने रेपोदर 6.5 टक्क्यांवर कायम ठेवला आहे. तर आर्थिक वर्ष 2024 साठी जीडीपी अंदाज 6.5 टक्क्यांऐवजी तो 7 टक्क्यांवर राहणार असल्याचेही भाकीत मांडले असून याचाही सकारात्मक प्रभाव भारतीय बाजारात पडल्याचे दिसून आले.
निफ्टी 21,000 च्या घरात
पतधोरण बैठकीचा निर्णय सादर केल्यानंतर दुपारी निफ्टीमधील समभागांच्या मदतीने निफ्टीने तब्बल 21,000 चा टप्पा पार केला. चालू वर्षात 11 सप्टेंबररोजी पहिल्यांदाच निफ्टी 20 हजारावर पोहोचला होता. सेन्सेक्स आणि निफ्टी यांच्यामधील सकारात्मकपणे आलेल्या तेजीत गौतम अदानी समूहातील सर्व 9 लिस्टेड कंपन्यांचे समभाग नफा कमाईत राहिले. तर एसीसी लिमिटेडचे समभाग हे 0.19 टक्क्यांनी प्रभावीत राहिले. मल्टीबॅगर समभागात पटेल इंजिनिअरींगचे समभाग 10 टक्क्यांनी मजबूत राहिले असून अन्य कंपन्यांमध्ये ओम इंफ्रा 2 टक्क्यांनी, स्टोव्ह क्राफ्ट आणि देवयानी व इन्फोसिस, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक आणि पतंजली फूड्स यांचे समभाग वधारले आहेत.