चार सत्रांच्या घसरणीनंतर बाजारात परतली तेजी
मिडकॅप-स्मॉलकॅप समभागांची खरेदी, सेन्सेक्स 483 अंक तर निफ्टी 153 अंकांनी वधारला
वृत्तसंस्था, मुंबई
गेल्या चार सत्रातील शेअर बाजारातील घसरणीला अखेर सोमवारी ब्रेक लागला आहे. भारतीय शेअर बाजाराने नव्या आठवड्याची सुरुवात तेजीसह केली आहे. सेन्सेक्स 483 अंक व निफ्टी 153 अंकांनी वधारत बंद झाला होता. मिडकॅप व स्मॉलकॅप निर्देशांकांनी तसेच मेटल, फार्मा व एनर्जी समभागांनी तेजीसह बाजाराला आधार दिला.
सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी सरतेशेवटी 30 समभागांचा मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक 483 अंकांनी वधारून 73,606 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी 153 अंकांनी वाढून 22,753 अंकांवर बंद झाला. निफ्टी बँक निर्देशांक 79 अंकांच्या वाढीसोबत 54366 अंकांवर बंद झाला. आयटी निर्देशांक 277 अंकांनी तेजी राखत 32273 अंकांवर बंद झाला होता. मेटल आणि हेल्थकेअर क्षेत्रात सर्वाधिक क्षेत्रीय वाढ दिसली. मेटल क्षेत्रातल्या समभागांची खरेदी सोमवारी पाहायला मिळाली. निफ्टी मेटल 2.21 टक्के वाढीसह बंद झाला. निफ्टी फार्मा 1.76 टक्के वाढला होता.
गेल्या आठवड्यात कमकुवत कामगिरीनंतर आयटी समभाग सोमवारी लक्षणीयरित्या वाढले होते. ऑटो निर्देशांक 108 अंकांनी वाढत 24970 अंकांवर बंद झाला. एनर्जी निर्देशांक सर्वाधिक चमकताना दिसला. हा निर्देशांक 502 अंकांच्या वाढीसोबत 35022 अंकांवर बंद झाला. इतर क्षेत्रांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँक शेअर्समध्येही खरेदी होती. निफ्टी एफएमसीजीही 0.28 टक्केच्या वाढीसह बंद झाला. याव्यतिरिक्त, निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस 0.18 टक्केची किंचित वाढ नोंदवत बंद झाला. याव्यतिरीक्त कमोडिटीज, सीपीएसई, इन्फ्रा, ऑईल व गॅस, रियल्टी यांचेही निर्देशांक तेजीत होते. गेल्या आठवड्यात अत्यंत खराब कामगिरी करणाऱ्या स्मॉल आणि मिड-कॅप निर्देशांक सोमवारी पुन्हा तेजीत दिसून आले. त्यामुळे शेअरबाजारात तेजीचा माहोल दिसला.
जागतिक बाजारात पाहता दक्षिण कोरीयाचा कोस्पी 1.46 टक्के घसरणीत तर जपानचा निक्केई 0.80 टक्के घसरत व्यवहार करत होता. हाँगकाँगचा हँगसेंग 0.51 टक्के इतका वाढत व्यवहार करत होता. 23 ऑक्टोबरला अमेरिकेतील बाजारात घसरण होती.
निफ्टीत डॉ. रे•िज लॅब्ज, जेएसडब्ल्यू स्टील, बीएसई लिमिटेड, अदानी पोर्टस, इटर्नल व मॅक्स हेल्थकेअर यांचे समभाग तेजीत होते. तर दुसरीकडे घसरणीत श्रीराम फायनान्स, टाटा कंझ्युमर, बजाज फायनान्स, एचडीएफसी लाइफ, एचडीएफसी बँक, टाटा मोटर्स पीव्ही यांचा समावेश होता.
