रक्षाबंधनसाठी बाजारपेठ सज्ज
बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल करण्यात आलेल्या राख्या
बेळगाव : भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सोहळा अशी ओळख असलेला सण म्हणजे रक्षाबंधन. श्रावण महिन्यातील पहिल्या पौर्णिमेला हा सण असतो. या सणाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव येथील बाजारपेठेमध्ये राखीच्या खरेदीसाठी बहिणींची गर्दी पाहावयास मिळत आहे. सध्या बाजारपेठेमध्ये विविध प्रकारच्या राख्यांनी दुकाने बहरलेली आहेत. 2 रु. पासून 100 रु. पर्यंत राख्यांची विक्री केली जात आहे. त्यामध्ये रेशमी धाग्यांपासून बनविलेल्या राख्यांची मागणी जास्त आहे. मोळी राखी, झरी राखी, कुंदन राखी, रुद्राक्ष राखी, स्वस्तिक राखी, लुंबा राखी, मोत्याची राखी, चांदीने पॉलिश केलेली राखी अशा प्रकारच्या राख्या उपलब्ध आहेत. लहान मुलांच्या आवडीनुसार कार्टूनची चित्रे असलेल्या राख्या जसे की सिनचॅन, छोटा भीम, डोरेमॉन, मोटू-पतलू, कृष्णा, हनुमान यांच्या लायटिंग असलेल्या राख्या तसेच मोठ्या भावांसाठी स्टोन व चांदीने पॉलिश केलेल्या राख्यांची विक्री जास्त असल्याचे दिसून येत आहे. सध्या भारतभूमीच्या रक्षणासाठी सीमेवर सेवा बजावत असलेल्या जवानांसाठी व कामानिमित्त देश-परदेशातील भावांना राखी पाठविण्यासाठी बहिणींकडून खरेदी केली जात आहे.