सलग सातव्या सत्रात बाजारात मूड खराबच
निफ्टी 76 अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी रुपये बुडाले : आयटी निर्देशांक मात्र तेजीत
भारतीय शेअर बाजारात बुधवारी सलग सातव्या दिवशी दबाव पाहायला मिळाला. सेन्सेक्स 325 अंकांनी तर निफ्टी 76 अंकांनी घसरणीत राहिला होता. बुधवारी जवळपास 200 समभागांना लोअर सर्किट लागले होते.
त. भा. वृत्तसंस्था मुंबई
सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 325 अंकांनी घसरत 76909 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 76 अंकांनी घसरत 24078 अंकांवर बंद झाला होता. बँक निफ्टी निर्देशांक 22 अंकांनी नुकसानीसह 57239 च्या स्तरावर बंद झाला. जागतिक बाजारातील कमकुवतता यामुळे भारतीय बाजारातही काहीसा दबाव बुधवारी होता. वाढत्या बाँड यिल्डच्या कारणास्तव बाजाराची सुरुवात दबावात झाली होती. पण निफ्टी आयटी निर्देशांकाने 1 टक्का इतकी तेजी राखत बाजाराला आधार देण्याचे काम केले. एनर्जी निर्देशांक मात्र सर्वाधिक नुकसानीत होता. याशिवाय एफएमसीजी व मीडिया क्षेत्रातही कमकुवतता होती. डिफेन्स निर्देशांक जवळपास 1.5 टक्का इतका तर एनर्जी निर्देशांक 1.2 टक्के इतका घसरणीत राहिला होता. मिडकॅप निर्देशांक 0.2 टक्के व स्मॉलकॅप निर्देशांक 0.5 टक्के घसरत बंद झाला.
निफ्टी 50 मध्ये पाहता मॅक्स हेल्थकेअर, कोल इंडिया, पॉवरग्रिड, बजाज फायनान्ससोबत आयटीसीचा समभाग सर्वाधिक घसरणीत होता. हे समभाग अंदाजे 1 ते 1.7 टक्के इतके घसरले होते. एचसीएल टेकचा समभाग मात्र विरुद्ध दिशेने काम करताना 2 टक्के इतक्या तेजीत होता. जेएसडब्ल्यू स्टील, सनफार्मा व इटर्नल यांचे समभाग 1 टक्का इतके वधारले होते.
बुधवारी शेअर बाजारात विक्रीचा दबदबा कायम राहिला होता. सलग सातव्या दिवशी बाजारात नकारात्मक वातावरण होते. बुधवारी बाजारातील कंपन्यांच्या बाजार भांडवल मूल्यात एकत्रित 2.12 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. बुधवारी सरतेशेवटी सुचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल मूल्य 488.67 लाख कोटी रुपयांवर आले, जे मंगळवारी 490.79 लाख कोटी रुपयांवर होते. बाजारात 1814 समभाग तेजीसह बंद झाले.