आयटी-आर्थिक क्षेत्रातील विक्रीने बाजार प्रभावीत
विदेशी गुंतवणूकदारांनी भांडवल काढल्याचा परिणाम
मुंबई :
भारतीय भांडवली बाजाराची नवीन सप्ताहाची सुरुवात ही नववर्षासोबत सोमवारपासून झाली आहे. यामध्ये पहिल्या सत्रात काहीशी तेजी प्राप्त करत बाजाराने आपला प्रवास थांबवला होता. परंतु दुसऱ्या सत्रात मंगळवारी मात्र ही तेजी प्राप्त करण्याऐवजी सेन्सेक्स व निफ्टी यांचे निर्देशांक घसरणीसह बंद झाले आहेत.
दिग्गज क्षेत्रांपैकी मंगळवारी आर्थिक व आयटी या क्षेत्रांमधील झालेल्या मोठ्या विक्रीने व विदेशी संस्थांच्या गुंतवणूकदारांकडून करण्यात आलेल्या भांडवली विक्रीमधून भारतीय बाजार प्रभावीत होत बंद झाल्याचे दिसून आले. दरम्यान आशिया बाजारात मिळताजुळता कल राहिला होता. नवीन वर्षाच्या सुट्टीचा सीजन लक्षात घेता युरोप व अमेरिकन बाजारात सोमवारी ट्रेडिंग झाले नाही, तर भारतामध्ये वाढत असणाऱ्या कोविडच्या नव्या व्हेरियंटमुळे गुंतवणूकदारांमधील चिंता वाढत असल्याचे चित्र असल्याने या गोष्टींचाही प्रभाव भारतीय बाजारात झाला आहे.
मुख्य कंपन्यांच्या मदतीने दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 379.46 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 71,892.48 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 76.10 अंकांनी घसरुन निर्देशांक 21,665.80 वर बंद झाला आहे. व्यापक बाजारात मंगळवारी बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप यांचे निर्देशांक 0.9 टक्क्यांनी घसरणीत राहिले.
मंगळवारच्या सत्रात घसरणीत राहिलेल्या मुख्य कंपन्यांमध्ये कोटक महिंद्रा बँक, अल्ट्राटेक सिमेंट, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, लार्सन अॅण्ड टुब्रो, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक, विप्रो आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांचे समभाग नुकसानीत राहिले आहेत. दुसऱ्या बाजूला सनफार्मा, बजाज फायनान्स, भारती एअरटेल, रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फिनसर्व्ह आणि टायटन यांचे समभाग मात्र लाभात राहिले होते.
जागतिक घडामोडी
जगभरातील मुख्य घडामोडींमध्ये आशियातील अन्य बाजारात चीनचा शांघाय कम्पोझिट आणि हाँगकाँगचा हँगसेंग हे नुकसानीत राहिले.