बँकिंग, वित्त कंपन्यांच्या समभागात विक्रीने बाजार घसरणीत
सेन्सेक्स 769 अंकांनी घसरला : निफ्टीही 241 अंकांनी नुकसानीत
मुंबई :
भारतीय शेअर बाजाराची आठवड्याचा शेवट घसरणीने झाल्याचे दिसून आले. सेन्सेक्स 769 अंकांनी घसरणीत राहिला. बँकिंग व वित्त कंपन्यांच्या समभागांच्या विक्रीमुळे बाजारात घसरण दिसून आली.
शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 769 अंकांच्या घसरणीसोबत 81537 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 241 अंकांच्या घसरणीसोबत 25048 अंकांवर बंद झाला. बँक निफ्टी निर्देशांक 727 अंकांनी कोसळत 58473 अंकांवर बंद झाला. सर्व क्षेत्रांचे निर्देशांक घसरणीत राहिले होते.
समभागांची कामगिरी
डॉ. रे•िज लॅब्ज, टेक महिंद्रा, एचयुएल, हिंडाल्को, ओएनजीसी, बजाज ऑटो एचसीएल टेक, अल्ट्राटेक सिमेंट, एशियन पेंटस्, अपोलो हॉस्पिटल, इन्फोसिस यांचे समभाग तेजीत होते. तसेच मिडकॅपमध्ये बंधन बँक, हिंदुस्थान झिंक, वोल्टास, अशोक लेलँड, एपीएल अपोलो ट्युब, पेट्रोनेट एलएनजी यांचे समभाग मजबूतीसोबत बंद झाले.
दुसरीकडे घसरणीत असणाऱ्या समभागांची संख्या मोठी होती. अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्टस्, इटर्नल, सिप्ला, इंटरग्लोब एव्हीएशन, जियो फायनॅन्शीयल्स, ग्रासिम, बीईएल, लार्सन टुब्रो, एनटीपीसी, एसबीआय, ट्रेंट, बजाज फायनान्स, अॅक्सिस बँक, आयशर मोटर्स, टाटा स्टील, विप्रो, महिंद्रा आणि महिंद्रा, कोल इंडिया, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, टाटा कंझ्युमर, मारुती सुझुकी, मॅक्स हेल्थकेअर, आयटीसी, एफचडीएफसी बँक यांचे समभाग घसरणीत होते. सोबत मिडकॅपमधील वन 97 कम्युनिकेशन, पुनावाला फिन, हुडको, गोदरेज प्रॉपर्टीज, सीजी पॉवर, जीएमआर एअरपोर्टस यांनीही नकारात्मक कामगिरी केली होती.
विविध क्षेत्राच्या निर्देशांकात सर्वच नकारात्मक बंद झाले. यातही एनर्जी निर्देशांक 648 अंकांनी घसरत 33098 अंकांवर तर फायनॅन्शीयल्स 328 अंकांनी घसरत 26821 अंकांवर बंद झाला होता.
जागतिक बाजारात तेजी
आशियाई बाजारात कोरीयाचा कोस्पी 0.84 टक्के वाढत 4994 अंकांवर जपानचा निक्केई 0.34 टक्के वाढत 53870 अंकांवर व्यवहार करत होता. हाँगकाँगचा हँगसेंग 0.29 टक्के वाढत 26706 अंकांवर तर चीनचा शांघाय कंपोझीटल 0.27 टक्के वाढत 4133 अंकांवर व्यवहार करत होता.