बाजाराची घसरण
शेअर मार्केट हा गुंतवणुकीचा एक सुरक्षित पर्याय मानला जातो. हवी तेव्हा गुंतवणूक करता वा काढता येणे, हे शेअर बाजाराचे वैशिष्ट्या. तरेदेखील अनेक वर्षे शेअर बाजार हा मध्यमवर्गीय वा सर्वसामान्यांपासून दूर होता. कोरोना काळानंतर डिमॅट खात्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली. लोक गुंतवणूक म्हणून मोठ्या प्रमाणात शेअर मार्केटकडे वळू लागले. परंतु, तेथील अस्थिरताही आता दिवसेंदिवस वाढत असल्याचे पहायला मिळते. गत काही दिवसांपासून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची लहरी धोरणे, जगभरातील ताणतणाव व भारतातील अर्थकारणाचे वास्तव या सगळ्याचा एकत्रित परिणाम भारतीय शेअर बाजारावर होताना दिसतो. अमेरिका आणि इराणमधील युद्धामुळे सध्या भू राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. तेल वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतूक सध्या विस्कळीत झाली आहे. भारतासह सबंध जगाला याचा तीव्र फटका बसल्याचे दिसून येते. वास्तविक, ही सामुद्रधुनी खुली होण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु, अद्याप तरी याप्रश्नी दोन देशांमध्ये तोडगा निघू शकलेला नाही. परिणामी तेलाच्या किमती भडकलेल्या दिसतात. आजमितीला कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 107 रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत. भारतासारखा देश 80 टक्क्यांहून अधिक तेल आयात करतो. तेलाच्या किमती वाढल्यामुळे महागाईही वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे या घसरणीमागे हे घटकही प्रामुख्याने कारणीभूत असल्याचे दिसते. अमेरिकेत फेडरल रिझर्व्हने महागाई नियंत्रणात आणण्यासाठी व्याजदरात वाढ केली असून, रोख उत्पन्नात अर्थात बॉन्ड यिल्डमध्येही वाढ झाली आहे. दहा वर्षांच्या अमेरिकन टेझरी बाँडचे यिल्ड 5.2 टक्क्यांवर पोहोचल्याने गुंतवणूकदारांनी सोने-चांदी या मौल्यवान धातूंवरून आपला मोर्चा तेल, जागतिक रोखे व डॉलर खरेदी करण्याकडे वळवला आहे. गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून मोठ्या प्रमाणात पैसे काढून घेण्याचा सपाटा लावल्याने बाजार कोसळत असल्याचे चित्र आहे. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून तब्बल 3 हजार 693.93 कोटी रुपयांचे भागभांडवल काढून घेतल्याचे सांगण्यात येते. हा आकडा मोठाच म्हणता येईल. मागील 27 ऑगस्टपासून सेन्सेक्स 4 हजार 161 अंकांनी तसेच निफ्टी 1 हजार 310 अंकांनी घसरला आहे. या होरपळीत गुंतवणूकदारांची 17.17 लाख कोटी रुपयांची संपत्ती स्वाहा झाली आहे. मुळात प्रतिकूल वातावरणामुळे बाजारातील विक्रीचा दबाव वाढतच आहे. त्यामुळे नकारात्मकता अशीच कायम राहू शकते. जागतिक मंचावर तणाव कायम राहिला, तर पुढच्या टप्प्यातही बाजारात अस्थैर्यच राहील, असे तज्ञांचे म्हणणे आहे. युद्ध, तेल भडका आणि जागतिक मंदी अशा अनेकविध संकटांनी आज जगाला ग्रासले आहे. मुळात या तिन्ही बाबी परस्परांशी निगडित आहेत. त्यातून दिलासा मिळण्याची कोणतीही शक्यता सध्या तरी दिसत नाही. त्यामुळे लवकरच सगळे काही सुरळीत होईल, अशी अपेक्षा ठेवणे भाबडेपणाचे ठरू शकते. अलीकडच्या काळात भारतीय रुपयाचेही सातत्याने अवमूल्यन झाले आहे. रुपया 96 रुपये प्रति डॉलरवर गेला आहे. रुपया कमकुवत झाल्याने विदेशी गुंतवणूकदारांचा नफा कमी होतो. त्यामुळे ते बाजारातून बाहेर पडत असतील, तर त्याचा परिणाम हा होणारच आहे. वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताचा उल्लेख होतो. अलीकडेच भारताचा विकासदर 7.8 टक्के असल्याचे सरकारकडून जाहीर करण्यात आले. परंतु, हा आकडा फसवा असल्याची टीका केली गेली. दस्तुरखुद्द माजी वित्त सचिवांनी त्यावर शंका घेतली. एकूणच जीडीपी व देशाच्या अर्थकारणाबाबतही म्हणावे तसे निरभ्र वातावरण पहायला मिळत नाही. वास्तविक, शेअर बाजाराचे क्षेत्र हे अतिशय संवेदनशील म्हणून ओळखले जाते. म्हणून संपूर्ण जगातील वातावरण निवळल्याशिवाय बाजार स्थिरस्थावर होणार नाही.