सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी बाजारात घसरण
सेन्सेक्स 876 अंकांनी तर निफ्टी 257 अंकांनी घसरणीत् आयटी समभाग दबावात
वृत्तसंस्था, मुंबई
सोमवारी भारतीय शेअरबाजाराची सुरुवात तेजीने झाली खरी पण नंतरच्या सत्रात घसरणीचा सिलसिला बाजारात पहायला मिळाला. सेन्सेक्स 876 अंकांनी तर निफ्टी 257 अंकांनी घसरणीत राहिला होता.
सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 876 अंकांनी घसरत 73853 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 257 अंकांनी घसरत 22889 अंकांवर बंद झाला. खासगी क्षेत्रातल्या बँकांचे समभाग, इन्फोसिस व महत्त्वपूर्ण कंपन्यांच्या समभागांमध्ये आलेल्या घसरणीचा दबाव शेअरबाजारावर दिसला आहे.
समभागांची कामगिरी
निफ्टी 50 समभागांमध्ये पाहता जेएसडब्ल्यू स्टीलचा समभाग सर्वाधिक वाढलेला होता. हा समभाग 2.06 टक्के इतका वाढला होता. यापाठोपाठ ओएनजीसीचा समभाग 1.36 टक्के वाढत, एसबीआय 1.16 टक्के, लार्सन टुब्रो 0.96 टक्के आणि आयशर मोटर्सचा समभग 0.89 टक्के वाढत बंद झाला होता. निफ्टीत अॅक्सिस बँक सर्वाधिक घसरणीत होता. हा समभाग 4.19 टक्के इतका घसरला होता. टाटा मोटर्सचा समभाग 3.09 टक्के, ट्रेंट 2.63 टक्के, बजाज फायनान्स 2.53 टक्के व अपोलो हॉस्पिटल 2.41 टक्के घसरणीसह बंद झाला होता.
क्षेत्रांचे निर्देशांक दबावात
विविध क्षेत्रांच्या कामगिरीकडे पाहिल्यास प्रायव्हेट बँकेचा निर्देशांक 1.85 टक्के, एफएमसीजी 1.44 टक्के, आयटी 1.28 टक्के, रियल्टी 1.20 टक्के, कॅपिटल मार्केट 0.98 टक्के, इन्फ्रा 0.68 टक्के, कमोडिटीज 0.66 टक्के, एनर्जी निर्देशांक 0.60 टक्के व फार्मा निर्देशांक 0.65 टक्के इतका कमकुवत होत बंद झाला. कच्च्या तेलाच्या दरात याचदरम्यान वाढ होत 105 डॉलर प्रति बॅरलवर दर पोहचले होते. याचाही दबाव बाजारावर दिसला. तर दुसरीकडे विदेशी गुंतवणूकदारांनी बाजारातून पैसे काढून घेण्यावर भर दिला होता.
बाजारात घसरणीची चार कारणे...
बँक समभागात विक्री : एचडीएफसी बँकेचा नफा कमी राहिल्याने बँकांच्या समभागात दबाव दिसून आला. यातून विक्रीवर भर दिसला.
जागतिक बाजारात दबाव : अमेरिका व आशिया या शेअरबाजारात मोठी घसरण होती. टेक्नॉलॉजी कंपन्यांचे समभाग विक्रीत होते. याचा परिणाम बाजारावर झाला.
कच्चे तेल महागले : आंतरराष्ट्रीय बाजारात पुन्हा नकारात्मकता वाढल्याने कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा वाढ झाली. एकावेळी हे दर 108 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले. याचाही परिणाम बाजारावर नकारात्मक होता.
बाजारात भीतीचे वातावरण : बाजारात जोखीम व चढ उतार मोजणारा इंडिया विक्स इंडेक्स 4 टक्के इतका वाढला. याचा अर्थ गुंतवणूकदारांमध्ये असमंजसपणा व भीतीचे वातावरण वाढले आहे, असा होतो. यातून गुंतवणूकदार खरेदी करणे टाळतात.
