सोमवारी चांगल्या तेजीसमवेत बाजार बंद
सेन्सेक्स 787 अंकांनी वधारला, बँकांची चमकदार कामगिरी, जागतिक बाजारात मिळताजुळता कल
जागतिक बाजारातील मिळताजुळता कल व डॉलरच्या तुलनेत रुपयात झालेली सुधारणा या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजार सलग तिसऱ्या सत्रात चांगल्या तेजीसमवेत बंद झाला. सेन्सेक्सने 787 अंकांची तेजी अनुभवली तर निफ्टीने 255 अंकांची तेजी अनुभवली. बँकिंग निर्देशांक 1 हजार अंकांच्या वाढीसोबत बंद होताना दिसला.
वृत्तसंस्था, मुंबई
सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 787 अंकांनी वाढत 74106 अंकांवर बंद झाला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 255 अंकाच्ंया वाढीसोबत 22968 अंकांवर बंद झाला. निफ्टी बँक निर्देशांक 1060 अंकांच्या वाढीसोबत 52609 या स्तरावर बंद होण्यामध्ये यशस्वी झाला होता. स्मॉल कॅप व मिडकॅप निर्देशांकातील समभागांचीदेखील गुंतवणुकदारांनी खरेदी केल्याचे पहायला मिळाले. निफ्टीतील 50 पैकी 43 समभाग तेजीत तर सेन्सेक्समधील 30 पैकी 28 समभाग तेजीमध्ये राहिले होते. बँकिंग निर्देशांकातील सर्व 14 बँकांचे समभाग मजबुतीसोबत बंद झाले.
क्षेत्राच्या निर्देशांकांची कामगिरी
निफ्टीमधील सर्व निर्देशांकात पाहता फक्त ऑईल आणि गॅस यांचा निर्देशांक घसरणीसोबत बंद झाला. यानंतर ऑटो, कमोडिटीज, सिपीएसई, एनर्जी, फायनान्शीयल्स, एफएमसीजी, इन्फ्रा, आयटी, मेटल, फार्मा आणि रियल्टी यांचे निर्देशांक तेजी दाखवित बंद झाले. यातही फायनान्शीयल निर्देशांकांची कामगिरी 561 अंकांच्या वाढीसह चमकदार राहिली होती.
विविध समभागांच्या कामगिरीचा आढावा घेतला असता बहुतेक समभाग तेजीत राहिले होते. यामध्ये ट्रेंटचा समभाग 7.98 टक्के, श्रीराम फायनान्सचा समभाग 4 टक्के, अॅक्सिस बँकेचा समभाग 3टक्के व अदानी एंटरप्रायझेसचा समभाग 3 टक्के वाढत बंद होताना दिसला. टायटन, एसबीआय लाईफ, लार्सन ट्रूब्रो, इंडिगो, नेस्ले, टाटा मोटर्स, हिंडाल्को, टाटा स्टील, आयटीसी, टीसीएस, हिंदुस्थान युनिलिव्हर, सिप्ला, मारुती सुझुकी, इन्फोसिस, इटर्नल, भारती एअरटेल, सनफार्मा यांचे समभाग मजबुतीसोबत बंद झाले.