दुसऱ्या सत्रात बाजार घसरणीसह बंद
सेन्सेक्स आणि निफ्टी यांचे निर्देशांक प्रभावीत
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवड्यातील पहिल्या सत्रात सोमवारी बाजार तेजीसह बंद झाला. परंतु दुसऱ्या सत्रात मंगळवारी मात्र जागतिक बाजारांमधील मिळताजुळता कल राहिल्याचा फटका सेन्सेक्स आणि निफ्टी यांना बसल्याचे दिसून आले. मुख्य क्षेत्रांपैकी आयटी, वीज, ऑईल अॅण्ड गॅस आणि धातू या क्षेत्रांनी बाजाराला काहीसे सावरल्याचे दिसून आले. मुख्य कंपन्यांच्या मदतीने मंगळवारी बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 29.47 अंकांच्या नुकसानीसोबत निर्देशांक 75,967.39 वर बंद झाला. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 14.20 अंकांच्या घसरणीसह निर्देशांक 22,945.30 वर बंद झाला आहे.
सेन्सेक्समध्ये इंडसइंड बँकेचे समभाग हे 2.38 टक्क्यांनी सर्वाधिक घसरणीत राहिले. यासोबतच अल्ट्राटेक सिमेंट, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, हिंदुस्थान युनिलिव्हर, टीसीएस, सनफार्मा, आयटीसी, टाटा मोटर्स, आयसीआयसीआय बँक, एशियन पेन्ट्स यांचे समभाग घसरणीत राहिले. दुसऱ्या बाजूला एनटीपीसीचे समभाग हे 3 टक्क्यांनी वधारुन बंद झाले. यासोबतच टेक महिंद्रा, झोमॅटो, पॉवरग्रिड कॉर्प, कोटक बँक, एचसीएल टेक, इन्फोसिस, बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक यांचे समभाग तेजीसह बंद झाले.
बाजारात दबाव
देशातील कंपन्यांचे डिसेंबर तिमाहीमधील संथ राहिलेले अहवाल आणि विदेशी गुंतवणूकदारांनी केलेल्या मोठ्या विक्रीमुळे शेअर बाजारात दबावाची स्थिती निर्माण झाली होती. यासोबतच स्मॉलकॅप आणि मिडकॅप यांच्या निर्देशांकांमध्येही घसरण राहिल्याने बाजारात चिंता निर्माण झाली. जागतिक बाजारांमध्ये कोरियाचा कोस्पी 0.63 टक्क्यांनी तेजीत राहिला. तर हाँगकाँगमध्ये 1.59 टक्क्यांची तेजी तर चीनचा शांघाय कम्पोझिट निर्देशांकांत 0.93 टक्क्यांची घसरण नेंदवली गेली.