आठ कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य 1.65 लाख कोटींनी घटले
मागच्या आठवड्यातील कामगिरी : टीसीएस सर्वाधिक नुकसानीत
मुंबई :
मागच्या आठवड्यात आठ कंपन्यांच्या बाजार भांडवल मूल्यामध्ये 1.65 लाख कोटी रुपयांची घसरण झाली असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस यांचे बाजारमूल्य सर्वाधिक घसरणीत दिसून आले आहे.
628 अंकांनी घसरला सेन्सेक्स
मागच्या आठवड्यामध्ये बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 628 अंकांनी म्हणजेच 0.82 टक्के इतका घसरला होता तर या तुलनेमध्ये राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 133 अंकांनी म्हणजेच 0.58 टक्के नुकसानीत होता. एकंदर पाहता मागच्या आठवड्यामध्ये दहापैकी आठ कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल मूल्य1 लाख 65 हजार 784 कोटी रुपयांनी कमी झाले होते. टीसीएसचे बाजार भांडवल मूल्य 53,185 कोटींनी कमी होत 13 लाख 69 हजार 717 कोटी रुपयांवर राहिले.
भारती एअरटेल, हिंदुस्थान युनिलिव्हरला फटका
दूरसंचार क्षेत्रातील कंपनी भारती एअरटेलचे बाजार भांडवल मूल्य 44,407 कोटींनी कमी होत 9 लाख 34 हजार 223 कोटी रुपयांवर तर आयसीआयसीआय बँकेचे बाजारमूल्य 18,235 कोटींनी कमी होत 8,70,579 कोटी रुपयांवर स्थिरावले होते. हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडचे बाजार भांडवल मूल्य 17 हजार 962 कोटी रुपयांनी कमी होत 5 लाख 26 हजार 684 कोटी रुपयांवर राहिले होते. इन्फोसिसचे बाजार भांडवल मूल्य सुद्धा 17 हजार 86 कोटी रुपयांनी घसरलेले पाहायला मिळाले. या घसरणीनंतर बाजारमूल्य 7 लाख 53 हजार 700 कोटी रुपयांवर राहिले. आयटीसी आणि एचडीएफसी बँकेचे बाजारमूल्य अनुक्रमे 11949 कोटी, 2555 कोटी रुपयांनी कमी झाले होते.
यांच्या मूल्यात झाली वाढ
दुसरीकडे रिलायन्स इंडस्ट्रीचे बाजार भांडवल मूल्य मात्र 14547 कोटी रुपयांनी वाढत 16 लाख 61 हजार 369 कोटी रुपयांवर पोहोचले होते. यासोबत बजाज फायनान्स कंपनीचे बाजार भांडवल मूल्य 384 कोटी रुपयांनी वाढत 5लाख 20 हजार 466 कोटी रुपयांवर पोहोचले होते. दहा आघाडीवरच्या कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज पहिल्या क्रमांकावर राहिलेली आहे. यानंतर टीसीएस, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, स्टेट बँक ऑफ इंडिया, हिंदुस्थान युनिलिव्हर, बजाज फायनान्स आणि आयटीसी यांचा नंबर लागतो.