7 कंपन्यांच्या बाजार भांडवलात 1.55 लाख कोटींची वाढ
रिलायन्स, टीसीएस सर्वाधिक नफ्यात : एचयुएल, एचडीएफसी बँकेचे मूल्य घसरणीत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आघाडीवरच्या दहापैकी सात कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य मागच्या आठवड्यात 1.55 लाख कोटी रुपयांनी वाढले होते. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस यांचे बाजार भांडवल मूल्य मागच्या आठवड्यात सर्वाधिक वाढलेले पाहायला मिळाले.
शुक्रवारी संपलेल्या एकंदर छोट्याशा आठवड्यामध्ये पाहता दहापैकी सात कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल मूल्य 1 लाख 55 हजार 710 कोटी रुपयांनी वाढले होते. मागच्या आठवड्यात पाहता बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 259 अंकांनी वाढला होता तर हा निर्देशांक 52 आठवड्याच्या उच्चांकी स्तरावर म्हणजे 85,290 च्या स्तरावर पोहोचला होता.
रिलायन्स इंडस्ट्रीज, भारती एअरटेल, टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस, स्टेट बँक ऑफ इंडिया, बजाज फायनान्स, इन्फोसिस आणि लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या बाजार भांडवल मूल्यामध्ये वाढ झालेली दिसून आली तर दुसरीकडे एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, हिंदुस्थान युनिलिवर यांचे बाजार भांडवल मूल्य मात्र घसरलेले दिसून आले.
यांच्या बाजार मूल्यात वाढ
रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल मूल्य 46,687 कोटी रुपयांनी वाढत 19,64,170 कोटी रुपयांवर पोहोचले तर टीसीएसचे बाजार भांडवल मूल्य 36,126 कोटींनी वाढत 11,08,021 कोटी रुपयांवर पोहोचले. याच दरम्यान इन्फोसिसचे बाजार भांडवलमूल्य 34,938 कोटींनी वाढत 6 लाख 33 हजार 712 कोटी रुपयांवर पोहचले. तर स्टेट बँकेचे बाजार भांडवल 13,892 कोटी रुपयांच्या वाढीसह 8,34,817 कोटी रुपयांवर पोहोचले. वित्त क्षेत्रातील कंपनी बजाज फायनान्सचे बाजारमूल्य 11,947 कोटींनी वाढत 6,77,846 कोटी रुपयांवर आणि दूरसंचार क्षेत्रातील कंपनी भारती एअरटेलचे बाजार भांडवल 9799 कोटी रुपयांनी वाढत 11,57,014 कोटी रुपयांवर पोहोचले. एलआयसीचे बाजार भांडवल मूल्य 2340 कोटी रुपयांनी वाढत 5 लाख 62 हजार 513 कोटी रुपयांवर पोहोचले होते.
यांच्या बाजार भांडवल मूल्यात घसरण
तर दुसरीकडे आयसीआयसीआय बँकेचे बाजार भांडवल 43,744 कोटी रुपयांनी कमी होत 9,82,746 कोटी रुपयांवर आणि हिंदुस्थान युनिलिव्हरचे बाजार भांडवल मूल्य 20,523 कोटी रुपयांनी कमी होत 5 लाख 91 हजार 486 कोटी रुपयांवर स्थिरावले होते. एचडीएफसी बँकेचे बाजारमूल्य 11,983 कोटी रुपयांनी कमी होत 15,28,227 कोटी रुपयांवर घसरले होते.