7 कंपन्यांच्या बाजार भांडवल मूल्यात 1.28 लाख कोटींची वाढ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
शुक्रवारी संपलेल्या आठवड्यात आघाडीवरच्या दहापैकी सात कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य 1,28,281 लाख कोटी रुपयांनी वाढलेले पाहायला मिळाले. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज आणि भारती एअरटेल यांच्या बाजार भांडवल मूल्यामध्ये सर्वाधिक वाढ झालेली दिसून आली. तर बजाज फायनान्स, एलआयसीचे बाजारमूल्य घटले होते.
मागच्या आठवड्यात पाहता बीएसई 30 समभागांचा सेंसेक्स निर्देशांक 669 अंकांनी वाढून बंद झाला होता. वधारलेल्या कंपन्यांचा विचार करता रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस, स्टेट बँक ऑफ इंडिया, इन्फोसिस आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांच्या बाजार मूल्यामध्ये वाढ झालेली दिसून आली. या उलट निराशाजनक कामगिरीमध्ये पाहता बजाज फायनान्स, लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एलआयसी)आणि आयसीआयसीआय बँक यांचा समावेश आहे.
यांच्या मूल्यात वाढ
याचदरम्यान बाजारातील भांडवलाच्या बाबतीत आघाडीवरची असणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल मूल्य मागच्या आठवड्यामध्ये 36,673 कोटींनी वाढत 20,92,052 लाख कोटींवर तर दूरसंचार क्षेत्रातील भारती एरटेलचे 36,579 कोटींनी वाढत 12,33,279 कोटी रुपयांवर पोहोचले होते. आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसचे बाजार भांडवल मूल्य 17,490 कोटी रुपयांनी वाढत 6,41,688 कोटी रुपयांवर तर टीसीएसचे बाजार मूल्य 16,299 कोटींनी वाढत 11,39,715 कोटी रुपयांवर पोहोचले होते. खासगी क्षेत्रातील बँक एचडीएफसी बँकेचे बाजार भांडवल मूल्य 14,608 कोटी रुपयांनी वाढत 15,35,132 कोटी रुपयांवर आणि स्टेट बँकेचे बाजार भांडवल मूल्य 4846 कोटी रुपयांनी वाढत 8,97,769 कोटी रुपयांवर पोहोचले. हिंदुस्थान युनिलिव्हरचे बाजार मूल्य 1785 कोटी रुपयांनी वाढत 5,71,972 कोटींवर पोहोचले होते.
यांच्या मूल्यात घसरण
दुसरीकडे वित्त क्षेत्रातील कंपनी बजाज फायनान्सचे बाजार भांडवल मूल्य 8244 कोटी रुपयांनी कमी होत 6,25,328 कोटींवर तर एलआयसीचे बाजार मूल्य 45 22 कोटी रुपयांनी कमी होत 5,70,578 कोटी रुपयांवर स्थिरावले होते. आयसीआयसीआय बँकेचे बाजारमूल्य 1248 कोटी रुपयांनी कमी होत 9, 79,126 कोटी रुपयांवर स्थिरावले.