६ कंपन्यांच्या बाजार भांडवलात ७४ हजार कोटींची वाढ
रिलायन्सचे मूल्य सर्वाधिक वाढले, सेन्सेक्स होता अल्पसा तेजीत
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
आघाडीवरच्या 10 कंपन्यांपैकी 6 कंपन्यांच्या बाजार भांडवल मूल्यात मागच्या आठवड्यात 74,111 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. यामध्ये बाजार भांडवल मूल्यात आघाडीवर असणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रिजच्या मूल्यात मागच्या आठवड्यात सर्वाधिक वाढ झालेली दिसून आली.
मागच्या आठवड्यात बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 177 अंकांनी वाढत बंद झाला होता. भारती एअरटेलच्या मूल्यात मात्र सर्वाधिक घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. रिलायन्स ब्रोकिंग लिमिटेडचे वरीष्ठ उपाध्यक्ष अजित मिश्रा यांच्या माहितीनुसार, बाजार आठवड्यात काहीशा तेजीसोबत बंद झाला. संपूर्ण आठवड्यातील व्यवहारात चढउतार दिसून आला. रुपया कमकुवत होताना दिसला आणि नव्या नीचांकीवर तो पोहचला. महागाई आणि व्याजदरांबाबत अनिश्चितता यामुळे बाजारात मोठी चढ उतार दिसली. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सावधता बाळगणेच योग्य मानले होते.
यांचे मूल्य वाढले
आघाडीवरच्या 10 पैकी रिलायन्स, आयसीआयसीआय बँक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, बजाज फायनान्स, लार्सन टुब्रो व एलआयसी यांच्या बाजार भांडवलात वाढ झाली होती तर एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, भारतीय स्टेट बँक व हिंदुस्थान युनिलिव्हर यांच्या भांडवलात नुकसान दिसून आले. रिलायन्सच्या बाजार भांडवलात सर्वाधिक वाढ दिसली. 24,696 कोटी रुपयांच्या वाढीसह कंपनीचे बाजार भांडवल मूल्य 18 लाख 33 हजार 117 कोटी रुपयांवर पोहचले. टीसीएसचे बाजार भांडवल मूल्य 19,3388 कोटी रुपयांनी वाढत 8 लाख 38 हजार 401 कोटी रुपयांवर पोहचले होते. आयसीआयसीआय बँकेचे मूल्य 14515 कोटी रुपयांच्या वाढीसह 9 लाख 6 हजार 901 कोटी रुपयांवर पोहचले होते.