आघाडीवरच्या 6 कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य 78 हजार कोटींनी घसरणीत
रिलायन्स इंडस्ट्रिजचे मूल्य सर्वाधिक घसरणीत : बजाज, आयटीसीचे मूल्य वधारले
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आघाडीवरच्या दहा पैकी सहा कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य मागच्या आठवड्यामध्ये 78 हजार 166 कोटी रुपयांनी घटले होते. रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपनीचे बाजार भांडवल मूल्य सर्वाधिक घसरणीत राहिले होते.
मागच्या आठवड्यामध्ये मुंबई शेअर बाजाराचा बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 609 अंकांनी घसरणीत राहिला होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 166 अंकांनी घसरणीत राहिला होता. रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, इन्फोसिस आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांच्या बाजारमूल्यात घसरण पाहायला मिळाली. दुसरीकडे एचडीएफसी बँक, दूरसंचार क्षेत्रातील भारती एअरटेल, वित्त क्षेत्रातील कंपनी बजाज फायनान्स आणि आयटीसी यांच्या बाजार भांडवल मूल्यामध्ये वाढ झालेली दिसून आली.
यांच्या मूल्यात घसरण
बाजारातील दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल मूल्य 40800 कोटी रुपयांनी कमी होत 19 लाख 30 हजार 339 कोटी रुपयांवर राहिले होते. आयटी क्षेत्रातील कंपनी टीसीएसचे बाजार भांडवल मूल्य 17710 कोटी रुपयांनी कमी होत 12 लाख 71 हजार 395 कोटी रुपयांवर राहिले होते. आयटी क्षेत्रातील आणखी एक कंपनी इन्फोसिसचे बाजार भांडवल मूल्य सुद्धा 10,488 कोटी रुपयांनी घटून 6 लाख 49 हजार 876 कोटी रुपयांवर राहिले होते. हिंदुस्थान युनिलिव्हरचे बाजारमूल्य 5462 कोटींनी कमी होत 5लाख 53 हजार 974 कोटी रुपयांवर स्थिरावले होते. यासोबतच आयसीआयसीआय बँकेचे बाजार भांडवल मूल्य 2454 कोटी रुपयांनी कमी होत 10 लाख 33 हजार 868 कोटी रुपयांवर राहिले होते. स्टेट बँकेचे बाजारमूल्य 1249 कोटी रुपयांनी घसरून 7 लाख 5 हजार 446 कोटी रुपयांवर राहिले होते.
यांच्या मूल्यात मात्र वाढ
दूरसंचार क्षेत्रातील भारती एअरटेलचे बाजार भांडवल मूल्य मात्र 10 हजार 121 कोटी रुपयांनी वाढत 10 लाख 44 हजार 682 कोटी रुपयांवर पोहोचले होते. यासोबतच बजाज फायनान्सचे बाजार मूल्य 4548 कोटींनी वाढत 5 लाख 74 हजार 207 कोटी रुपयांवर पोहोचले तर आयटीसीचे बाजारमूल्य 875 कोटींनी वाढत 5 लाख 45 हजार 991 कोटी रुपयांवर पोहोचले.