5 कंपन्यांचे भांडवल मूल्य 1.13 लाख कोटी रुपयांनी वाढले
सेन्सेक्स 623 अंकांनी होता वाढला : भारती एअरटेल अग्रस्थानावर
►वृत्तसंस्था/नवी दिल्ली
शुक्रवारी संपलेल्या आठवड्यामध्ये आघाडीवरच्या 10 पैकी 5 कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य 1,13,117 कोटी रुपयांनी वाढले आहे. यामध्ये दूरसंचार कंपनी भारती एअरटेलचे बाजार भांडवल सर्वाधिक वाढलेले पाहायला मिळाले.
यासोबतच आयटी क्षेत्रातील कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि इन्फोसिस या कंपन्यांचे बाजार भांडवलसुद्धा वाढले होते. दुसरीकडे रिलायन्स इंडस्ट्रीज, स्टेट बँक ऑफ इंडिया, एलआयसी, आयटीसी आणि हिंदुस्तान युनिलिव्हर यांच्या बाजार भांडवलात मात्र मागच्या आठवड्यात घसरण पाहायला मिळाली. मागच्या आठवड्यात बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 623 अंकांनी वाढला होता. दुसरीकडे निफ्टीसुद्धा 90 अंकांनी वाढला होता. भारती एअरटेलचे बाजार भांडवल मूल्य 47836 कोटी रुपयांनी वाढत 9 लाख 57 हजार 842 कोटी रुपयांवर पोहचले होते. इन्फोसिसचे बाजार भांडवल मूल्य 31,826 कोटींनी वाढत 8,30,387 कोटी रुपयांवर, एचडीएफसी बँकेचे बाजार भांडवल मूल्य 11887 कोटींनी वाढत 14 लाख 31 हजार 158 कोटी तर आयसीआयसीआय बँकेचे बाजार भांडवल मूल्य 11,760 कोटी रुपयांनी वाढत 9,49,306 कोटी रुपयांवर पोहोचले होते. टीसीएसचे बाजारमूल्य 9805 कोटींनी वाढत 16 लाख 18 हजार 587 कोटी रुपयांवर राहिले होते.
यांच्या भांडवलमूल्यात घट
दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या बाजार मूल्यामध्ये मात्र 52,031 कोटी रुपयांची घसरण झाली असून ते आता 17 लाख 23 हजार 144 कोटी रुपयांवर घसरले आहे. एलआयसीचे मूल्य 32,067 कोटींनी कमी होत 5,89,869 कोटी रुपयांवर राहिले होते. हिंदुस्थान युनिलिव्हरचे बाजार भांडवल मूल्य 22,250 कोटींनी कमी होत 5,61,423 कोटी रुपयांवर स्थिरावले आहे.
विदेशी गुंतवणूकदार बाजारात परतले
विदेशी पोर्टफोलियो गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारामध्ये 22766 कोटी रुपये गुंतवले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. डिसेंबरमध्ये ही गुंतवणूक झाली आहे. डिसेंबरच्या पहिल्या दोन आठवड्यात भारतीय शेअर बाजारामध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी 22766 कोटी रुपये गुंतवले आहेत. या योगे विदेशी गुंतवणूकदार पुन्हा एकदा बाजारात परतल्याचे पाहायला मिळाले आहे.
अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची शक्यता लक्षात घेऊन गुंतवणूकदार पुन्हा एकदा भारतीय बाजाराकडे वळले आहेत. नोव्हेंबरमध्ये 21612 कोटी रुपये गुंतवणूकदारांनी काढले होते आणि ऑक्टोबरमध्ये तर 94 हजार 17 कोटी रुपये गुंतवणूकदारांनी काढले होते. सप्टेंबर महिन्यात मात्र नऊ महिन्यानंतर उच्चांकी 57,724 कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याचे पाहायला मिळेल.