5 कंपन्यांचे बाजार भांडवलमूल्य84 हजार कोटींनी वाढले
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आघाडीवरच्या दहा पैकी पाच कंपन्यांच्या बाजार भांडवल मूल्यामध्ये मागच्या आठवड्यात 84 हजार 559 कोटी रुपयांची वाढ दिसून आली आहे. यामध्ये हिंदुस्थान युनिलिव्हर या कंपनीचे बाजार भांडवल मूल्य सर्वाधिक वाढलेले पाहायला मिळाले आहे.
सेन्सेक्स 207 अंकांनी वधारला
मागच्या आठवड्यात मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा बीएसई सेंसेक्स निर्देशांक 207 अंकांनी वाढला होता तर 50 समभागांचा राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 75 अंकांनी वाढला होता. एक लक्षात घ्या की मागच्या आठवड्यात शेअर बाजाराचे कामकाज केवळ चारच दिवस झाले होते. गुरुवारी शेअर बाजाराला महावीर जयंतीनिमित्त सुट्टी होती.
या आठवड्यात 3 दिवस काम
शेअर बाजाराला सोमवारी डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त सुटी होती. याच आठवड्यात शुक्रवारी 18 एप्रिल रोजी गुड फ्रायडेनिमित्त बाजार बंद राहणार आहे. म्हणजेच बाजाराचे कामकाज तीन दिवस मंगळवार, बुधवार, गुरुवार असे राहणार आहे.
याच दरम्यान रिलायन्स इंडस्ट्रीज, भारती एअरटेल, हिंदुस्थान युनिलिव्हर, बजाज फायनान्स आणि आयटीसी या कंपन्यांनी बाजार भांडवल मूल्यात वाढ करण्यामध्ये यश मिळवले होते. एचडीएफसी बँक, टीसीएस, स्टेट बँक आणि इन्फोसिस यांच्या मूल्यात घसरण झाली.
यांचे भांडवल मूल्य वधारले
हिंदुस्थान युनिलिव्हरचे बाजार भांडवल मूल्य 28,700 कोटींनी वाढत 5 लाख 56 हजार 054 कोटी रुपयांवर तर रिलायन्स इंडस्ट्रीचे बाजार भांडवल मूल्य 19757 कोटींनी वाढत 16 लाख 50 हजार 2 कोटी रुपयांवर पोहोचले होते. याच दरम्यान आयटीसीचे बाजारमूल्य 15,329 कोटेनी वाढत 5,27,845 कोटी रुपयांवर पोहोचले तर बजाज फायनान्सचे बाजार भांडवल 12,760 कोटींच्या वाढीसह 5,53,348 कोटी रुपयांवर पोहोचले. भारती एअरटेल कंपनीचे बाजार भांडवल 8011 कोटी रुपयांनी वाढत 10 लाख 2 हजार 30 कोटी रुपयांवर स्थिरावले होते.
यांचे बाजार भांडवल घटले
दुसरीकडे काही कंपन्यांच्या बाजार भांडवलात घसरण पाहायला मिळाली आहे. टीसीएसचे बाजार भांडवल 24,295 कोटींनी कमी होत 11,69,474 कोटी रुपयांवर स्थिरावले होते. आयटी क्षेत्रातील आणखीन एक दिग्गज कंपनी इन्फोसिसलाही मागच्या आठवड्यामध्ये फटका बसला आहे. कंपनीचे बाजार भांडवल 17,319 कोटींनी कमी होत 5लाख 85 हजार 859 कोटी रुपयांवर स्थिरावले होते. स्टेट बँकेचे बाजार मूल्य 12,271 कोटींनी कमी होत 6,72,960 कोटी रुपयांवर खाली आले. आयसीआयसीआय बँकेचे बाजारमूल्य 8913 कोटी रुपयांनी कमी होत 9 लाख 34 हजार 351 कोटी रुपयांवर घसरले होते.