5 कंपन्यांच्या बाजार भांडवल मूल्यात 1 लाख कोटींची घसरण
वृत्तसंस्था, मुंबई
मागच्या आठवड्यात भारतीय शेअरबाजारात घसरण राहिली होती. देशातील 10 पैकी 5 कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य जवळपास 1 लाख कोटी रुपयांनी कमी झाल्याचे समजते. यात आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी टीसीएसचे बाजार मूल्य सर्वाधिक घसरणीत राहिले होते. आठवड्याच्या कालावधीत सेन्सेक्स 489 अंकांनी तर एनएसई निफ्टी 204 अंकांनी घसरुन बंद झाला होता. यामध्ये टीसीएस व रिलायन्स या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठी घट झाली होती. टीसीएसचे मूल्य 34,263 कोटी रुपयांनी घटले होते. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया यांचेही मूल्य मागच्या आठवड्यात कमी झाले होते.
दुसरीकडे एलआयसीसह 5 कंपन्यांच्या बाजार भांडवल मूल्यात एकत्रितरित्या 55,149 कोटी रुपयांची वाढ झालेली दिसून आली. बाजारात दबाव असतानाही दूरसंचार क्षेत्रातील कंपनी भारती एअरटेल, बजाज फायनान्स, लार्सन टुब्रो, एलआयसी व हिंदुस्थान युनिलिव्हर यांचे समभाग मजबूतीसोबत बंद झाले होते. यांचे एकत्रित भांडवल मूल्य 55,149.45 कोटी रुपयांसह वाढले होते.
