5 कंपन्यांच्या बाजार भांडवलात 1 लाख कोटींची घट
एचडीएफसीचे मूल्य घसरले तर रिलायन्स, भारती एअरटेलचे मूल्य वधारले
वृत्तसंस्था/ मुंबई
मागच्या आठवड्यात शेअरबाजारात चढउतार दिसून आला. यात आघाडीवरच्या 10 कंपन्यांच्या बाजार भांडवल मूल्यात मात्र 1.02 लाख कोटींची घसरण अनुभवायला मिळाली. यात सर्वाधिक बाजार भांडवल मूल्य घसरले ते एचडीएफसी बँकेचे. या बँकेच्या बाजार भांडवल मूल्यात 56 हजार कोटीची घट दिसून आली.
एचडीएफसी बँकेचे बाजार भांडवल मूल्य 56,124 कोटींनी घटत 12,01,267 कोटी रुपयांवर राहिले तर एफएमसीजी कंपनी हिंदुस्थान युनिलिव्हर यांच्या बाजार भांडवल मूल्यात 18009 कोटी रुपयांची घसरण झाली असून बजाज फायनान्सच्या बाजार भांडवलात 15,338 कोटी रुपयांची घट दिसली आहे. आयटी क्षेत्रातील दिग्गज टीसीएस ही कंपनीसुद्धा नुकसानीत राहिली होती. या कंपनीचे 7127 कोटी रुपयांचे तर आयसीआयसीआय बँकेचे मूल्य 6171 कोटी रुपयांनी कमी झाले आहे.
यांच्या मूल्यात वाढ
याचदरम्यान बाजारात कंपन्यांच्या मूल्यात घट होत असताना दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रिजचे बाजार भांडवल मूल्य मात्र 45,942 कोटी रुपयांच्या वाढीसह 19,14,235 कोटी रुपयांवर पोहचले होते. भारती एअरटेलच्या मूल्यात 24,462 कोटींनी वाढ झाली होती तर एसबीआयच्या मूल्यात 10,707 कोटी आणि इन्फोसिसच्या बाजार भांडवलात 2473 कोटींनी वाढ झाली होती.
मागच्या आठवड्यात शेअर बाजार जवळपास सपाट स्तरावर बंद झाला. बीएसई सेन्सेक्स 30 अंकांनी घसरणीत राहिला होता तर निफ्टी 36 अंकांनी घसरणीत राहिला होता. गुरुवारी शेअरबाजारात मोठी घसरण राहिली होती.
महत्त्वाचे...
हिंदुस्थान युनिलिव्हरचे मूल्य 18009 कोटींनी घटले
टीसीएसच्या मुल्यातही 7127 कोटींची घसरण
भांडवल मूल्यात रिलायन्सच आघाडीवर