4 कंपन्यांच्या बाजार मुल्यात 2.20 लाख कोटी वाढ
रिलायन्सचे मूल्य सर्वाधिक वाढीत : सेन्सेक्स 249 अंकांनी होता वाढलेला
त. भा. वृत्तसंस्था
मुंबई : भारतीय शेअर बाजार मागच्या आठवड्यात हलक्या तेजीसह बंद झाला. शुक्रवारी बाजाराला सुटी होती. याच दरम्यान सदरच्या आठवड्यात 10 पैकी 4 कंपन्यांच्या बाजार भांडवल मुल्यात 2.20 लाख कोटी रुपयांची वाढ झाली होती.
मागच्या आठवड्यात बीएसई सेक्सेक्स निर्देशांक 249 अंकांनी वाढत बंद झाला. ही वाढ मोठी नसली तरी बाजार घसरणीसह बंद झाला नाही, हे विशेष म्हणायला हवे. संपूर्ण आठवड्यात बाजारात अस्थिरता होती. कधी जागतिक संकेताने तर कधी देशांतर्गत घटनांनी बाजारात अस्थिरता होती.
यांच्या मूल्यात झाली वाढ
रिलायन्स इंडस्ट्रिज, भारती एअरटेल, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस व बजाज फायनान्स यांच्या मूल्यात वाढ झाली होती. रिलायन्सचे बाजार भांडवल मूल्य 1.39 लाख कोटींनी वाढत 19.36 लाख कोटींवर पोहचले. भारती एअरटेलचे बाजार भांडवल मूल्य 43500 कोटींसह 11.49 लाख कोटींवर पोहचले होते. आयटीतील कंपनी टीसीएसचे बाजार मूल्य 27500 कोटींच्या वाढीसोबत 8.94 लाख कोटीवर पोहचले होते. बजाज फायनान्सचे बाजार मूल्य 9400 कोटींसह वाढत 5.83 लाख कोटींवर पोहचलं. इतर 6 कंपन्यांच्या बाजारमूल्यात घसरण दिसून आली.
यांचे मूल्य घसरले
आयसीआयसीआय बँकेचे बाजार भांडवल मूल्य 45364 कोटींनी घसरत 9.4 लाख कोटींवर, स्टेट बँकेचे मूल्य 30,922 कोटींनी कमी होत 9.85 लाख कोटीवर घसरले होते. एचडीएफसी बँकेचे बाजारमूल्य 20951 कोटींच्या घसरणीसह 11.87 लाख कोटींवर तर हिंदुस्थान युनिलिव्हरचे बाजार मूल्य 18420 कोटींच्या कमकुवतेसह 5.28 लाख कोटींवर राहिले होते. विमा क्षेत्रातील एलआयसीचे मूल्यही 8222 कोटींच्या घसरणीसोबत 5.04 लाख कोटीवर आले होते.