सलग चौथ्या सत्रात बाजारात तेजीचा उत्साह
सेन्सेक्स 303 अंकांनी तेजीत : बँकेचा निर्देशांक सर्वोच्च पातळीवर
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय शेअर बाजाराने शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सलग चौथ्या सत्रात तेजीसोबत बंद होण्यात यश मिळवलं आहे. सेन्सेक्स 303 अंक व निफ्टी 88 अंकांनी मजबूत होत बंद झाले. रुपयाही शुक्रवारी 23 पैसे मजबूत झालेला दिसला.
शुक्रवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 303 अंकांनी मजबूत होत 84058 अंकांवर बंद झाला आहे तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 88 अंकांच्या मजबुतीसोबत 25637 अंकांवर बंद झाला आहे. निफ्टी बँक निर्देशांकही 237 अंकांची तेजी कमावत 57443 च्या सर्वोच्च स्तरावर बंद झाला आहे. सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 16 कंपन्यांचे समभाग तेजीसोबत बंद झाले आहेत. तर निफ्टीमधील 50 पैकी 26 कंपन्यांचे समभाग तेजीसोबत बंद झाले होते. विविध क्षेत्रांच्या निर्देशांकाच्या कामगिरीकडे पाहता तेल व गॅस, ऊर्जा, ऑटो, इन्फ्रा क्षेत्रातील कंपन्यांमध्ये तेजी होती. आयटी, एफएमसीजी, रियल्टी क्षेत्रातील समभागांमध्ये शुक्रवारी काहीसा दबाव दिसून आला. कंपन्यांच्या कामगिरीकडे पाहता जियो फायनॅन्शीयल, एशियन पेंटस्, अपोलो हॉस्पिटल, इंडसइंड बँक, अदानी एंटरप्रायझेस, अल्ट्राटेक सिमेंट, आयसीआयसीआय बँक, हिंडाल्को, टाटा स्टील, टाटा मोटर्स, भारती एअरटेल, बजाज ऑटो, कोल इंडिया यांचे समभाग तेजीत होते.
हे समभाग घसरणीत
काही कंपन्यांचे समभाग मात्र शुक्रवारी घसरणीत राहिले होते. यात एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स, सिप्ला, विप्रो, टायटन, ट्रेंट, इटर्नल, अॅक्सिस बँक, आयटीसी, टीसीएस, जेएसडब्ल्यू स्टील, ग्रासिम, इन्फोसिस, डॉ. रे•िज लॅब्ज, ओएनजीसी, एसबीआय लाइफ, टेक महिंद्रा, मारुती सुझुकी व श्रीराम फायनान्स यांचा समावेश होता.
जागतिक बाजारात तेजी
अमेरिकेतील व युरोपातील बाजारात तेजी होती. आशियाई बाजारात मिश्र कला होता.