सलग दुसऱ्या सत्रात बाजारात तेजी
सेन्सेक्स 92 तर निफ्टी 28 अंकांनी मजबूत : बुधवारी चढउताराचा प्रवास
मुंबई :
चालू आठवड्यातील प्रवासामधील तिसऱ्या सत्रातील बुधवारी भारतीय बाजारात तेजीचा कल कायम राहिल्याचे दिसून आले. यामध्ये मंगळवारच्या सत्रातील जागतिक पातळीवरील स्थितीचा सकारात्मक लाभ हा बुधवारच्या कामगिरीतही कायम राहिल्याचे दिसून आले. मात्र बुधवारी चढउताराचा कल राहिला होता. दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 92 तर निफ्टी 28 अंकांनी वधारुन बंद झाला आहे.
भारतीय बाजारात बुधवारी रिलायन्स इंडस्ट्रीजमधील समभागातील तेजी आणि आयटी क्षेत्रातील समभागांच्या झालेल्या खरेदीमुळे बाजाराला आपली कामगिरी मजबूतपणे करण्यात मोठे यश प्राप्त झाले. काही वेळ बाजार चढउताराचे हेलकावे खात राहिला होता. मात्र अंतिम क्षणी मात्र सेन्सेक्स 66 हजारांचा टप्पा प्राप्त करत बंद झाला. दुसरीकडे निफ्टी 28 अंकांनी वधारल्याचे दिसून आले.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 92.47 अंकांनी वधारुन निर्देशांक 66,023.24 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसअखेर 28.45 अंकांनी वधारुन 19,811.85 वर स्थिरावला आहे.
जागतिक बाजारांमधील मिळताजुळता कल राहिल्याच्या दरम्यान विदेशी गुंतवणूकदारांनी विक्री केली. यामुळे बाजाराने तेजीच्या जवळपास जाण्याचा प्रयत्न केला आहे. दिवसभरातील कामगिरीनंतर दिवसअखेर बाजारात एनटीपीसीचे समभाग हे सर्वाधिक 1.50 टक्क्यांनी वधारले आहेत. याच दरम्यान पॉवरग्रिड कॉर्प, टायटन, सनफार्मा, रिलायन्स इंडस्ट्रीज, हिंदुस्थान युनिलिव्हर, एशियन पेन्ट्स, टाटा मोर्ट्स, टेक महिंद्रा, नेस्ले आणि आयटीसी यांचे समभाग तेजीसह बंद झाले आहेत.
अन्य कंपन्यांमध्ये इंडसइंड बँक, कोटक महिंद्रा बँक, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, जेएसडब्ल्यू स्टील, एचडीएफसी बँक आणि मारुती सुझुकी यांचे समभाग हे घसरणीसह बंद झाले.
.......यामुळे बाजारात उत्साह
भारतीय बाजारात आपली मजबूत कामगिरी करणाऱ्या अन्य कंपन्यांमध्ये देशातील दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज, आयटीसी आणि इन्फोसिस यांच्या समभागातील तेजीमुळे बुधवारी भारतीय बाजाराने तेजी प्राप्त केली आहे. अमेरिकेमधील महागाईच्या नरमाईची आकडेवारी आणि औषधांच्या समभागातील खरेदीचा फायदा हा बाजाराला बुधवारी झाल्याचे दिसून आले.
शेअर बाजारातील आकडेवारीनुसार विदेशी संस्थांच्या गुंतवणूकदारांच्या विक्रीच्या प्रवाहामुळे मंगळवारच्या सत्रात बाजारात 455.59 कोटी रुपयांच्या इक्विटीची विक्री झाली आहे.