महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बंधाऱ्यातील फळ्या काढल्याने मार्कंडेयचे पात्र पडतेय कोरडे

10:36 AM Dec 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कुणालाही विश्वासात न घेता विघ्नसंतोषी लोकांचे कृत्य : पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी फळ्या घालून पाणी अडवण्याची मागणी

Advertisement

वार्ताहर/उचगाव

Advertisement

बेळगावच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांची जीवनदायीनी ठरलेल्या मार्कंडेय नदीच्या पात्रातील सुळगा-उचगाव येथे असलेल्या बंधाऱ्याच्या फळ्या काही विघ्नसंतोषी लोकांनी शेतकऱ्यांना विश्वासात न घेताच काढल्याने नदीचे पात्र कोरडे पडण्याच्या मार्गावर असल्याने असंख्य शेतकरी वर्गातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तरी पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी तातडीने या बंधाऱ्याला फळ्या घालून पाणी अडवावे आणि पिकांना जीवदान द्यावे, अशी मागणी या भागातील शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे. बेळगावच्या पश्चिम भागातील हजारो एकर जमिनीतील शेतवडीतील पिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या मार्कंडेय नदीच्या पात्रातील पाणी हे अतिशय महत्त्वाचे आहे. सुळगा हद्दीमध्ये मार्कंडेय नदीच्या पात्रात बंधारा घालण्यात आला असून दरवर्षी या बंधाऱ्याला फळ्या घालून पाणी अडवण्याची प्रक्रिया राबवली जाते. तशीच प्रक्रिया यावर्षीही या नदीच्या पात्रातील बंधाऱ्याला फळ्या घालून पाणी अडविण्यात आले होते. मात्र गेल्या दोन दिवसांपूर्वी काही असंतुष्टांनी या बंधाऱ्याच्या फळ्या काढल्याने हे नदीचे पात्र कोरडे पडण्याच्या मार्गावर आहे.

पिकांसाठी पाणी अडविणे अत्यावश्यक

सध्या नदीच्या दुतर्फा पसरलेल्या शेतवडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची पिके घेतली जातात. आता भातकापणीनंतर विविध प्रकारचा भाजीपाला, रब्बी हंगामामध्ये बटाटा या पिकांची लागवड केली जाते. त्याचबरोबर उसाला पाणी देणे, ऊसतोडणी, नंतर सदर खोडवे उगविण्यासाठी पुन्हा पाण्याची गरज असते. अशावेळी नदीचे पात्र कोरडे पडल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. यासाठी पाटबंधारे खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तसेच या भागाच्या लोकप्रतिनिधींनी अशाप्रकारच्या सूचना करून तातडीने या बंधाऱ्याला फळ्या घालून पाणी अडविण्यात यावे आणि हजारो एकर शेतवडीतील पिकांना जीवदान मिळावे, अशी मागणी करण्यात येत आहे. याबरोबरच मार्कंडेय नदीचे पात्र जर भरून राहिले तर जवळपासच्या सर्व गावातील सार्वजनिक विहिरीमधील पाण्याची पातळी टिकून राहते आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवत नाही. तसेच शेतवडीमध्ये असलेल्या शेतकरी वर्गाच्या ज्या शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी आहेत त्या विहिरींचीही पाण्याची पातळी टिकण्यास मदत होणार आहे. यासाठी या मार्कंडेय नदीचे पात्र सदोदित भरून राहणे हे नितांत गरजेचे आहे.

नदीचे पात्र कोरडे पडल्यास संपूर्ण शेती ओस

मार्कंडेय नदीच्या पात्रात जर पाण्याचा साठा असेल तरच या भागात उत्तमप्रकारची चांगली भरघोस पिके शेतकरी घेऊ शकतात. जर नदीचे पात्र कोरडे पडले तर संपूर्ण शेतीदेखील ओस पडण्याच्या मार्गावर असते. यासाठी नदीच्या पात्रात पाणी हे अत्यंत गरजेचे आहे. तो शेतकऱ्यांच्या पिकांचा प्राण आहे. शासनाने तातडीने या बंधाऱ्याला फळ्या घालून पाणी अडवून शेतकऱ्यांना सहकार्य करावे आणि भरघोस पिके येण्यासाठी आणि लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी मदत करावी.

 - अरुण जाधव, ग्रा. पं. माजी सदस्य, उचगाव.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article