कॅनडाच्या नेतेपदी मार्क कर्नी यांची निवड
भारताशी संबंध सुधारण्याची इच्छा केली व्यक्त, जस्टीन ट्रूडो पदमुक्त, याचवर्षी देशात निवडणूक
वृत्तसंस्था / ओटावा
कॅनडाच्या प्रमुखपदी मार्क कर्नी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जस्टीन ट्रूडो यांनी काही महिन्यांपूर्वी पदत्याग केला होता. नव्या नेत्याची निवड होईपर्यंत त्यांना देशाचा राज्यकारभार पाहण्यास सांगण्यात आले होते. संपूर्ण देशात सर्वेक्षण घेऊन मार्क कर्नी यांची या पदावर नियुक्त करण्यात आल्यानंतर त्यांचा रविवारी शपथविधी करण्यात आला. याच वर्षी कॅनडात संसदेची निवडणूक होणार असून ती कर्नी यांच्या नेतृत्वात लढविली जाणार असल्याचे सत्तधारी पक्षाने स्पष्ट केले.
नवे नेते कर्नी यांनी भारताशी संबंध सुधारण्याचे आश्वासन दिले आहे. मध्यंतरीच्या काळात भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध तणावग्रस्त झाले होते. कॅनडाचा एक खलिस्तानवादी नागरिक हरदीपसिंग निज्जर याची हत्या त्या देशात झाली होती. या हत्त्येचा आरोप ट्रूडो यांनी उघडपणे भारतावर केला होता. भारत सरकारचा या हत्येत हात आहे, अशी माहिती त्यांनी कॅनडाच्या संसदेलाही दिली होती. तथापि, या प्रकरणात कोणताही पुरावा सादर करण्यात त्यांना अपयश आले होते. भारताने वारंवार मागणी करुनही त्यांनी पुरावे सादर केले नव्हते. उलट, आपल्याकडे स्पष्ट पुरावे नाहीत. मात्र, ‘विश्वसनीय अफवां’च्या आधारे आपण हा आरोप करीत आहोत, असे प्रतिपादन करुन त्यांनी पुरावे नसल्याची कबुली दिली होती. या प्रकरणात त्यांचेच हसे झाले. मात्र, या घडामोडी घडत असताना भारताशी कॅनडाचे संबंध चांगलेच तणावग्रस्त झाले. आता नवे नेते कर्नी यांनी हे संबंध पुन्हा पूर्ववत करण्याची इच्छा व्यक्त केल्याने तणाव कमी होणे शक्य आहे.
ट्रम्प यांना आव्हान
कॅनडाच्या नेतेपदाची शपथ घेतल्यानंतर त्वरित कर्नी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली. ट्रम्प कॅनडाच्या वस्तूंवर कर वाढविणार असतील, तर या धोरणाला जशास तसे उत्तर दिले जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. अमेरिकेने हेच करधोरण लागू ठेवल्यास कॅनडाला अन्य देशांशी व्यापार वाढविण्याची संधी मिळणार आहे. आम्ही समविचारी राष्ट्रांशी व्यापारात वाढ करण्याचा प्रयत्न करु. भारताशीही व्यापार वाढविण्याची संधी यामुळे प्राप्त होणार आहे, असे विधान त्यांनी केले, जे अत्यंत सूचक मानण्यात येत आहे.
भारताचा सखोल परिचय
मार्क कर्नी यांना भारताच्या अर्थव्यवस्थेची सखोल माहिती आहे. ते जानेवारीपर्यंत ब्रुकफिल्ड अॅसेट मॅनेजमेंट संस्थेच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष होते. या आंतरराष्ट्रीय कंपनीचा भारतातही मोठा व्यवसाय आहे. कर्नी हे भारतासंबंधी अत्यंत आशावादी आहेत, अशी माहिती या कंपनीच्या एका संचालकाने एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेशी बोलताना दिली आहे. त्यामुळे ते भारताशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न करतील अशी दाट शक्यता असल्याचे मत काही तज्ञांनी व्यक्त केले आहे.
मार्क कर्नी यांचा अल्पपरिचय
मार्क कर्नी यांचा जन्म 16 मार्च 1965 या दिवशी कॅनडातील फोर्ट स्मिथ येथे झाला. ते आता 59 वर्षांचे आहेत. हार्वर्ड विद्यापीठात शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी 2008 ते 2013 या काळात बँक ऑफ कॅनडाचे संचालन केले. नंतर 2020 पर्यंत ते बँक ऑफ इंग्लंडचे संचालक होते. ही जगातील सर्वात जुन्या बँकांपैकी एक असून तिची स्थापना 1694 मध्ये झाली आहे. या बँकेचे ते प्रथम बिगर ब्रिटीश संचालक ठरले. त्यांनी काही काळ गोल्डमन सॅश या वित्तसंस्थेतही उच्च पदावर काम केले आहे. त्यांनी 13 वर्षे लंडन, टोकियो, न्यूयॉर्क आणि टोरँटो येथे वास्तव्य केले आहे. 2020 मध्ये त्यांची नियुक्ती संयुक्त राष्ट्रसंघात पर्यावरण संरक्षण आणि वित्त विभागाचे प्रतिनिधी म्हणून करण्यात आली होती. ते हार्वर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्राचे पदवीधर आहेत. त्यांच्याकडे कॅनडा, आयर्लंड आणि ब्रिटन अशा तीन देशांचे नागरिकत्व आहे. तीन देशांचे नागरिकत्व असणाऱ्या व्यक्तीस कॅनडाचे सर्वोच्च नेतेपद मिळण्याची ही प्रथमच वेळ आहे. त्यांनी आता कॅनडाच्या प्रमुखपदाची सूत्रे हाती घेतल्याने अनेक देशांनी आनंद व्यक्त केला असून भारत आणि कॅनडा यांच्यातील तणाव दूर होण्याची शक्यता आहे.