For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

समुद्रसंस्कृती ही अर्थव्यवस्था, भविष्याचा आधार

12:11 PM Jan 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
समुद्रसंस्कृती ही अर्थव्यवस्था  भविष्याचा आधार
Advertisement

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन : ‘समुद्र प्रताप’ तटरक्षक दलात दाखल

Advertisement

वास्को : समुद्र ही भारतीय संस्कृती आहे. समुद्र हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा आणि भविष्याचा आधार आहे. समुद्र सुरक्षित राहिला तरच संस्कृती, अर्थव्यवस्था, व्यापार, पर्यावरण व जीवन सुरक्षित राहू शकते, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले. गोवा शिपयार्डमध्ये ‘आयसीजीएस समुद्र प्रताप’ या जहाजाच्या प्रवर्तीकरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे राजनाथ सिंह बोलत होते. त्यांच्याच हस्ते हे जहाज भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात सामील करण्यात आले.

‘आयसीजीएस समुद्र प्रताप’ जहाजाच्या प्रवर्तीकरण सोहळ्याला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक परमेश शिवमणी, संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह गोवा शिपयार्डचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ब्रजेशकुमार उपाध्याय व मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.  केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक, खासदार विरियातो फर्नांडिस, आमदार दाजी साळकर तसेच भारतीय तटरक्षक दल, नौदल, गोवा शिपयार्ड तसेच केंद्र व राज्य सरकारांमधील वरिष्ठ अधिकारी या सोहळ्याला उपस्थित होते. गोवा शिपयार्डचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ब्रजेशकुमार उपाध्याय यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

Advertisement

भारताचा वाढता आत्मविश्वास

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय तटरक्षक दलाच्या कार्यक्षमतेबद्दल गौरवोद्गार काढले. समुद्र संस्कृतीची सुरक्षा, आर्थिक विकासासाठी, पर्यावरणाच्या रक्षणासाठी आणि समाजजीवनासाठी फार महत्त्वाची आहे असे ते म्हणाले. आपल्या तटरक्षक दलाने समुद्राशी निगडीत जनसामान्यांमध्ये विश्वास निर्माण केलेला आहे. आणि आपल्या समुद्राकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांच्या मनात भितीही निर्माण केली आहे. आयसीजीएस ‘समुद्र प्रताप’ दलाचा आत्मविश्वास अधिक बळकट करणार आहे. 60 टक्के स्वदेशी बनावटीचे हे भारतातील पहिले जहाज आहे. दलाच्या आत्मनिर्भरतेचे हे उदाहरण आहे. ही आत्मनिर्भरता अधिक मजबूत होत आहे. भारताची स्वदेशी यंत्रसामुग्रीचा वापर करून जहाजे बांधण्याची क्षमता 90 टक्क्यांवर जाईल यासाठी आमचे प्रयत्न राहील, आत्मनिर्भरतेचा नारा आता आपली कार्यशैली बनलेली आहे असे केंद्रीयमंत्री राजनाथ सिंह म्हणाले.

तटरक्षक दलाला जागतिक सन्मान 

भारतीय तटरक्षक दलाकडे जागतिक पातळीवरही सन्मानाने पाहिले जाते असे सांगून हवामान बदल व तापमान वाढ समस्यांकडे दलाने एक नैतिक जबाबदारी म्हणून पाहिले आहे. या समस्येवर जागतिक हितासाठी दल कार्यरत आहे. समुद्र संपत्ती ही कुणा एकाची नव्हे तर मानवतेची संपत्ती असल्याचे तटरक्षक दलाने मानले आहे. केवळ स्वत:च्या क्षेत्रातच नव्हे तर संपूर्ण इंडो पॅसिफिक क्षेत्रात आपले दल कार्यरत राहिले आहे. भारत एक सागरी शक्ती म्हणून जगासमोर आलेली आहे असे राजनाथ सिंह म्हणाले. भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक परमेश शिवमणी यांनी यावेळी संबोधत करताना ‘आयसीजीएस समुद्र प्रताप’ या प्रदूषणविरोधी जहाजाचा भारतीय तटरक्षक दलाच्या सेवेत दाखल होण्याचा हा सोहळा दलासाठी ऐतिहासिक असल्याची भावना व्यक्त केली.

ते म्हणाले की, हे भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात सामील झालेले 201 वे जहाज आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची या सोहळ्याला लाभलेली उपस्थिती तटरक्षक दलाला अधिक प्रेरणा देणारी आहे. समुद्र प्रताप जहाजाचा जन्म हा दलासाठी महत्त्वपूर्ण मैलाचा दगड आहे. महासागराच्या सुरक्षिततेसाठी या जहाजाचे योगदान लाभेल. दलाची कार्यक्षमता अधिक सुदृढ बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तटरक्षक दल सागरी सुरक्षा क्षेत्रात करीत असलेले कार्य व समुद्र प्रताप जहाजाविषयी त्यांनी माहिती दिली. तटरक्षक दल पूर्ण क्षमतेने आणि सतत सतर्क राहून सुरक्षेचा संकल्प पूर्ण करीत आलेले आहे. येणाऱ्या वर्षभरात तटरक्षक दलाच्या सेवेत ‘समुद्र प्रचेती’ हे जहाजसुद्धा दाखल होणार असल्याचे सांगून परमेश शिवमणी यांनी भारतीय तटरक्षक दलाचा सक्षमतेच्या दृष्टीने जगातील सुदृढ तटरक्षक दलांमध्ये समावेश झालेला आहे व वाढता सन्मान हा भारतीय तटरक्षक दलासाठी प्रेरणा देणारा असल्याचे ते म्हणाले.

आयसीजीएस ‘समुद्र प्रताप’ प्रदूषण नियंत्रण जहाज

‘समुद्र प्रताप’ हे जहाज गोवा शिपयार्डतर्फे तटरक्षक दलासाठी बांधण्यात येत असलेल्या दोन प्रदूषण नियंत्रण जहाजांपैकी पहिले जहाज आहे. या जहाजाचे 29 ऑगस्ट 2024 रोजी गोवा शिपयार्डमध्ये जलावतरण करण्यात आले होते. ‘समुद्र प्रताप’ जहाजाची लांबी 114.5 मीटर तर रूंदी 16.5 मीटर एवढी असून हे जहाज 22 नॉटसपेक्षा जास्त वेग गाठू शकते आणि ते प्रगत ऑटोमेशन आणि संगणकीकृत नियंत्रण प्रणालीनी सुसज्ज आहे. जे जटील जहाज बांधणीमध्ये भारताची वाढती क्षमता अधोरेखित करते. सुमारे 4200 टन वजनाचे हे जहाज दोन 7,500 किलोवॅट डिझेल इंजिनद्वारे चालवले जाईल. जहाजाची प्राथमिक भूमिका समुद्रातील प्रदूषणाला प्रतिसाद देणे ही आहे. भारताच्या सागरी हितांचे रक्षण करण्याबरोबरच प्रदूषण नियंत्रण, सागरी पाळत ही प्रमुख कर्तव्ये हे जहाज पार पाडेल. डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल अशोक कुमार भामा यांच्या नेतृत्वाखालील या जहाजावर 14 अधिकारी आणि 115 कर्मचारी तैनात असतील. यात दोन महिला अधिकाऱ्यांच्या पहिल्या नियुक्तीचा समावेश आहे. ज्या त्यांच्या पुरूष सहकाऱ्यांसोबत खांद्याला खांदा लावून कर्तव्य बजावतील.

Advertisement
Tags :

.