राजधानीत उगवले गांजाचे रोपटे
प्रतिनिधी/ पणजी
गांजा हा अमलीपदार्थ असून त्याची तस्करी होते. गांजा स्वत:कडे ठेवणे हा गुन्हा आहे, स्थानिक तसेच परप्रांतीय गांजाची तस्करी करताना पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे. आता चक्क राजधानीतच भर लोकवस्तीत गांजाचे रोपटे उगवल्याने एकच खळबळ माजली आहे. याबाबत अमलीपदार्थ विरोधी विभागाला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि ते रोपटे ताब्यात घेतले आहे.
हे रोपटे सांतइनेज पणजी येथील एका मॉलच्या दारात रस्त्याच्या बाजूला असलेल्या बागेत आढळले मात्र मॉलचा आणि या गांजाच्या रोपट्याचा काहीही संबंध नसल्याचे आढळून आले आहे. हे रोपटे कुणी लावले कुणालाही माहीत नाही. रस्त्याच्या बाजूला असलेल्या बागेला पाणी घालण्याचे काम मनपातर्फे केले जाते. गांजाचे रोपटे बागेत उगवल्याने कुणालाच दिसले नाही. त्यामुळे इतर झाडांना पाणी घालताना त्या रोपट्याला पाणी मिळत होते आणि त्या पाण्यातूनच गांजाचे रोपटे मोठे झाले. सुऊवातीला हे गांजाचे रोपटे आहे हे कुणाच्या लक्षात आले नाही. मात्र रोपटे मोठे झाल्यावर त्याला फुले आली तेव्हा एका व्यक्तीच्या लक्षात आले की, हे गांजाचे रोपटे आहे. त्याने एका टीव्ही पत्रकाराला याबाबत माहिती दिली त्यानंतर त्याठिकाणी टीव्ही पत्रकार आला आणि त्याने एएनसी पथकाला याबाबत माहिती दिली. पोलिस त्याठिकाणी आले आणि पाहणी केली तर ते गांजाचे रोपटे असल्याचे सिद्ध झाल्यावर त्यांनी ते रोपटे ताब्यात घेतले.
याबाबत अद्याप कुणाच्याही विरोधात तक्रार नोंद करण्यात आलेली नाही. हे रोपटे त्या ठिकाणी आले कसे ते कुणी लावले असावे, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले असून सध्या हे रोपटे पोलिसांनी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहे.