सांगे - केपे परिसरात बहरली झेंडूची शेती
पावसाने परिणाम करूनही दिवाळीवेळी मोठ्या प्रमाणात स्थानिक फुले बाजारपेठांत
प्रसाद तिळवे/ सांगे
यंदा दिवाळी सणावेळी बाजारात स्थानिक झेंडू फुले मोठ्या प्रमाणात दाखल झाली होती. गतवर्षाच्या तुलनेत यंदा पावसामुळे झेंडू फुलांच्या (मेरी गोल्ड) उत्पादनावर थोडा परिणाम झाला. सांगे-केपे तालुक्यातील अनेक स्वयंसाहाय्य गटांनी तसेच अन्य शेतकऱ्यांनी झेंडूची लागवड केली आहे. सांगेत कृषी खात्याने झेंडू फुलांची रोपे उपलब्ध करून दिली होती. पण यंदा विक्रमी पाऊस पडल्याने त्यांच्या लागवडीवर आणि फुलांवर परिणाम झाला. असे असले, तरी बऱ्याच शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळाले आहे.
झेंडू फुलांच्या लागवडीचा प्रयोग यशस्वी झाल्याने दरवर्षी कृषी खात्याकडून शेतकऱ्यांना रोपटी पुरविली जातात. यंदाही सांगे विभागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात झेंडू लागवडीत उतरले. झेंडू हे नगदी पीक असून दसरा आणि दिवाळीला मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलांना मागणी असते. झेंडू लागवडीकडे महिलांचा जास्त कल असून एकेकाळी केवळ मिरचीचे मळे आणि भाजीच्या बागांपुरत्या मर्यादित असलेल्या झेंडूची आज व्यावसायिक तत्त्वावर लागवड होत आहे. गेल्या काही वर्षांपासून झेंडू लागवडीसाठी कृषी खात्याने केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. यापूर्वी ‘आत्मा’ अर्थात कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना तसेच स्वयंसाहाय्य गटांना प्रात्यक्षिक म्हणून झेंडू लागवडीकडे आकर्षित करण्यात आले होते. त्याला उत्तम प्रतिसाद लाभला. चांगले पीक आले आणि महिलांना काही प्रमाणात कमाई झाली.
पावसामुळे दसऱ्याचा मुहूर्त हुकला
सांगे आणि केपे तालुक्यात मोठ्या प्रमाणात झेंडूची लागवड केली जाते. दसरा हा सण केंद्रस्थानी ठेऊन वेळेवर लागवड केली होती. पण सतत पडणाऱ्या पावसाने परिणाम केला. 45 दिवसांत पीक यायला सुऊवात होऊन दसऱ्याच्या वेळी हे पीक ऐन भरात येते. यंदा सांगे तालुक्यात 200 इंचांहून जास्त पाऊस पडला. त्याचे परिणाम झेंडू पिकावर झाले, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
गोव्यात फुलोत्पादनाला वाव असून झेंडूच्या फुलांना तर खूप मागणी आहे. कारण सजावटीकरिता झेंडूची फुले सर्रास वापरली जातात. विशेषत: कर्नाटक आणि महाराष्ट्रातून या फुलांची आयात केली जाते. यापूर्वी झेंडू लागवडीतून प्रत्येक स्वयंसाहाय्य गटाने 25 ते 30 हजार रुपये पर्यंत उत्पन्न घेतल्याची माहिती मिळालेली आहे. कमी कालावधीत उत्पन्न देणारे झेंडू हे पीक असून शेतकऱ्यांना लाभदायक ठरणारे आहे. आपल्याकडे स्थानिक झेंडू फुलांच्या माळांना दसरा आणि दिवाळीच्या वेळी चांगली मागणी असते. एक हजार चौरस मीटर क्षेत्रात लागवड केल्यास शेतकऱ्याला 7500 रु., तर 500 चौरस मीटर क्षेत्रातील लागवडीसाठी 3750 ऊ. सबसिडी कृषी खात्याकडून दिली जाते.
यावर्षी 150 ते 200 ऊ. प्रति किलो दराने झेंडूच्या फुलांची घाऊक विक्री करण्यात आली, तर झेंडू फुलांच्या माळा 50 ऊपये याप्रमाणे विकण्यात आल्या होत्या. एक किलो फुलांच्या चार माळा होतात, त्यामुळे 200 ऊ. प्रति किलो असा दर प्राप्त झाला. याव्यतिरिक्त सांगे आणि केपे भागात स्वत: झेंडू फुलांची रोपे तयार करून कमी प्रमाणात लागवड करणारे शेतकरी आहेत.
एका रोपट्याला आली दीडशे फुले : आंचल मळीक
यावर्षी मी 800 चौरस मीटर जमिनीत कोलकाता नामक झेंडूची 800 रोपटी लावली होती. 12 ऑगस्टला लागवड केली होती. गतवर्षापेक्षा यावर्षी उत्पादन चांगले आले. यंदा एका रोपाला दीडशेच्या आसपास फुले आली, असे मळकपण-मळकर्णे येथील महिला शेतकरी आंचल मळीक यांनी सांगितले.
दसऱ्याच्या दिवशी मध्यम प्रमाणात, तर दिवाळी, लक्ष्मीपूजन, पाडवा या सणांच्या वेळी मोठ्या प्रमाणात फुले मिळाली. पाच ऊपयांना एक रोप याप्रमाणे आपण वैयक्तिकरीत्या महाराष्ट्रातून रोपे आणली होती. लागवडीच्या काळात पाऊस कमी होता. रोपट्यांना चार वेळा मातीचा भराव देण्यात आला. उत्पादित फुलांच्या माळा करून सांगे, मडगाव बाजारात तसेच गावात प्रत्येकी रु. 50 याप्रमाणे विकण्यात आल्या, असे त्यांनी सांगितले. 60 दिवसांतच फुले यायला लागली होती. पुढे तुळशी विवाहाच्या वेळी फुले विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहेत, असे मळीक यांनी सांगितले. पिवळ्या रंगाच्या फुलांचा आकार मोठा असतो, तर केशरी फुले थोडी लहान असतात.
दिवाळीवेळी फुले बाजारपेठांत
यंदा दसऱ्याला जास्त पीक मिळाले नाही. मात्र दिवाळीला सांगे, केपे, कुडचडेच्या बाजारपेठांत ही फुले विकण्यास आली. त्यामुळे बरीच उलाढाल झाली. यावर्षी देखील महिलांनी झेंडू लागवडीत चांगला रस दाखविल्याचे सांगेचे विभागीय कृषी अधिकारी अग्रेश शिरोडकर यांनी सांगितले. यंदाही स्वयंसाहाय्य गटांतील महिला आणि इतर शेतकऱ्यांना पिवळ्या आणि केशरी रंगाच्या संकरित जातींची झेंडूची रोपे प्रत्येकी 4.50 रु. याप्रमाणे उपलब्ध करून दिल्याचे शिरोडकर यांनी सांगितले.
झेंडू लागवडीतून स्वयंपूर्ण बनण्याच्या दृष्टीने उचललेले हे पाऊल आहे. कृषी खात्याकडे हेक्टरमागे 75 हजार ऊ. सबसिडी देणारी योजना आहे. किमान 500 चौरस मीटर जमिनीत लागवड केली, तरी सबसिडी दिली जाते. राज्यात पुष्पलागवडीला वाव असून शेतकऱ्यांनी पुढे यावे, असे आवाहन कृषी अधिकारी शिरोडकर यांनी केले.