For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मडगाव नगरी बनली कार्निव्हलमय

11:40 AM Feb 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
मडगाव नगरी बनली कार्निव्हलमय
Advertisement

मडगाव : लक्षणीय ख्रिस्ती लोकसंख्या असलेल्या सासष्टीतील लोकांनी रविवारी मडगावात आयोजित केलेल्या कार्निव्हल मिरवणुकीला मोठ्या संख्येने उपस्थिती लावून आनंद लुटला. यामुळे मडगाव नगरी कार्निव्हलमय होऊन गेली. लोकांनी नेहमीप्रमाणे दुतर्फा गर्दी करून मिरवणुकीत भाग घेतलेल्या चित्ररथांना तसेच अन्य पथकांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सायंकाळी 4 च्या सुमारास होली स्पिरीट चर्चपासून मिरवणुकीला सुऊवात होऊन पुढे आनाफॉन्त, जुने जिल्हाधिकारी कार्यालय अशी मार्गाने येऊन पालिका चौकात समाप्त झाली. यावेळी किंग मोमोने आपली राजवट जाहीर करत ‘खा प्या मजा करा’ असा संदेश दिला. पर्यावरणमंत्री आलेक्स सिकेरा, मडगावचे आमदार दिगंबर कामत, नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, माजी आमदार दामू नाईक, नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, कार्निव्हल समिती अध्यक्षा असलेल्या नगरसेविका मिलाग्रीना गोम्स व अन्य नगरसेवक तसेच प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते. मिरवणुकीच्या सुऊवातीस नौदलाच्या पथकाचे संचलन तसेच त्यांचा चित्ररथ हे प्रमुख आकर्षण ठरले. त्याशिवाय पारंपरिक व्यवसायांवरील खास करून गोव्यातील पादत्राणे निर्मितीचा व्यवसाय आणि गूळनिर्मिती यावरील तसेच गोव्याच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारे चित्ररथही आकर्षणाचा विषय राहिले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारे तसेच आरोग्यविषयक जागृती घडविणारे चित्ररथ, कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याचा आणि रॅबिजविरोधी लस देण्याचा संदेश देणारा चित्ररथ, गोवा पोलिसांचा चित्ररथ, उत्यादनांची जाहिरात करणारे व्यावसायिक गटातील चित्ररथ आणि नृत्य करणारी युवक-युवतींची पथके, विविध प्रकारच्या वेशभूषा करून सहभागी झालेले कलाकार यांनीही लक्ष वेधून घेतले.

Advertisement

Advertisement
Tags :

.