मडगाव पालिका काबिज करणार
गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष, फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांची घोषणा
समविचारी पक्षांना सोबत घेऊन जाण्यास तयार फातोर्डा मॉडेल गोवाभर नेणे गरजेचे
प्रतिनिधी/ मडगाव
आम्ही मडगावात येणारच आणि पालिका निवडणुकीत उमेदवार उतरविणार, सर्व समाजांना समान संधी देणार आणि पालिका काबीज करणार आहे, अशी जाहीर घोषणा फातोर्डाचे आमदार व गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी शनिवारी त्यांच्या वाढदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना केली.
विधानसभेत सर्व विरोधकांची एकजूट असण्याची गरज आहे. तरच आम्ही प्रगती करू शकू. कारण 2024 च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही एकसंध राहिलो म्हणून कॅप्टन विरियातो फर्नांडिस जिंकून आले. यावर पुढील विधानसभा निवडणुकीवेळी गंभीरपणे विचार होण्याची गरज आहे. समविचारी पक्षांना सोबत घेऊन जाण्यास आपण तयार आहोत. आता काँग्रेस पक्षाने त्वरित जागे होण्याची गरज आहे, असे सरदेसाई म्हणाले. सध्या भाजपाचे काँग्रेसीकरण झाल्याची टीका त्यांनी केली. यावेळी माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, जुझे फिलीप डिसोझा, माजी आमदार किरण कांदोळकर, नरेश सावळ, फ्रान्सिस सिल्वेरा, अॅड. राधाराव ग्रासियस, उषा सरदेसाई, मडगावचे माजी नगराध्यक्ष आर्थुर डिसिल्वा, फातोर्डा फॉरवर्डचे नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
फातोर्डा मॉडेल गोवाभर नेणे गरजेचे
फातोर्डा मॉडेल येथे यशस्वी झाला, तर गोव्यात तो का होऊ शकत नाही, असा सवाल सरदेसाई यांनी केला. मडगावातील इमारती कधी पडणार याची शाश्वती नाही. मडगाव कोसळत आहे. फातोर्डात असे नसून फातोर्डा मॉडेल गोवाभर नेणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
मी फातोर्डातील एक इंचही जमीन ऊपांतरित केलेली नाही. जे काही झाले ते पूर्वी झाले. आम्ही विकास ही संकल्पना घेऊनच काम केले आहे. 2012 साली मला एका पक्षाने तिकीट डावलले, तेव्हा मी अपक्ष म्हणून निवडणूक लढविताना फातोर्डातील जनतेला विरोधी पक्षात राहण्यासाठी म्हणून मते मागली आणि फातोर्डावासियांनी माझ्यासोबत राहून मला निवडून आणले. म्हणून मी त्यांचे आभार मानतो, असे सरदेसाई पुढे म्हणाले.
गोमंतकीयांचे प्रश्न नेहमीच मांडणार
गोमंतकीयांचे प्रश्न आपण नेहमीच विधानसभेत हिरिरीने मांडेन. बहुजन समाजाला जे मिळायला हवे ते मिळायलाच हवे. आपण सारस्वत असून तशी मागणी करतो म्हणून ते देण्यास टाळाटाळ करण्याची गरज नाही. जनतेवरील अन्याय दूर करण्यासाठी सक्षम विरोधी गट असणे गरजेचे आहे. कारण सरकार सर्वांची पिळवणूक करत आहे, असे त्यांनी सांगितले. जीएसटी घेत असल्याने सर्व मतदारसंघांत विकास व्हायला हवा. दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात सुधारणा गरजेची आहे. तेथे नर्सिंग कॉलेज आम्हाला नको. आमचा फातोर्डा सर्वांत विकसित मतदारसंघ बनत आहे आणि इतरांसाठी आदर्शवत ठरत आहे, असे सरदेसाई आपल्या भाषणात म्हणाले. फातोर्डात अॅग्रो टुरिझम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सरदेसाईंकडे मोठे पद भूषविण्याची कुवत : मांद्रेकर
सरदेसाई यांनी विरोधात राहून चांगले काम केले असून 2012 मध्ये त्यांनी चांगली भूमिका बजावली आणि आम्ही मंत्री म्हणून चांगले काम करू शकलो. विजय यांच्याकडे यापेक्षा मोठे पद भूषविण्याची कुवत आहे, असे माजी मंत्री मांद्रेकर म्हणाले. सरदेसाई हे सध्याच्या घडीला विरोधी पक्षातील एक चांगले नेते आहेत. त्यांनी फातोर्डातच नव्हे, तर गोवाभर चांगले कार्य केले आहे. सरदेसाई हे सारस्वत समाजाचे असले, तरी बहुजन समाजाला नेहमीच न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. 2017 त्यांनी स्वत:सह गोवा फॉरवर्डचे अन्य दोन आणि बहुजन समाजातील आमदार जयेश साळगावकर व विनय पालयेकर यांना झगडून मंत्री बनविले, असे माजी आमदार किरण कांदोळकर यांनी नजरेस आणून दिले.
सरदेसाई यांच्याकडे मोठ्या पदावर काम करण्याची कुवत असून येथील फलकावर त्यांच्या नावापुढे माजी उपमुख्यमंत्री म्हणून लिहिलेले आहे. ते पुढे मुख्यमंत्री बनलेले सर्वांना पाहायला आवडेल असे सर्व वक्त्यांनी केलेल्या भाषणांवरून दिसून येते, असे कांदोळकर पुढे म्हणाले.
2012 मध्ये आपण निवडणुकीत पराभूत झालो होतो. एका वाहिनीला मुलाखत देताना आपणास कोण चांगला विरोधी पक्षनेता बनू शकेल, असा प्रश्न केला असता आपण प्रथमच निवडून आलेल्या सरदेसाई याचे नाव घेतले होते. त्यावेळी आपणास हलक्यात घेतले होते, मात्र पुढे त्यांनी आपली कुवत सिद्ध करून दाखविली, असे माजी मंत्री जुझे फिलीप डिसोझा यांनी सांगितले. सरदेसाई यांच्यात मुख्यमंत्री बनण्याची क्षमता आहे, असेही ते म्हणाले.
हे व्यासपीठ पाहिल्यावर ते सर्वपक्षीय व्यासपीठ असे वाटले. विजयना आम्ही विधानसभेत वावरताना पाहिले आहे. त्यांच्यात फ्लोअर व्यवस्थापन, मतदारसंघ व्यवस्थापन आणि संपूर्ण गोव्याचे व्यवस्थापन करण्याची कुवत आहे. त्यांच्याकडे विरोधी नेता म्हणून पाहिले जात असले, तरी यापेक्षा मोठे पद हाताळण्याची क्षमता सरदेसाई यांच्यात आहे, असे माजी आमदार सावळ यांनी सांगितले.
सरदेसाई यांनी गोवा सांभाळण्याची गरज कोणी तरी प्रतिपादली. मात्र विजयनी गोवा सांभाळण्याची गरज नसून तो आम्हा सर्वांनी सांभाळायला हवा. आम्ही त्यासाठी विजय यांच्या मागे रहायला हवे. भाजप सरकार सत्तेत असल्यास 15 वर्षे झाली, मात्र त्यात राज्याचे काही भले झालेले नाही. त्यामुळे त्यांना सत्तेवरून हटवायलाच हवे. त्यासाठी सर्वांनी एकजूट दाखविण्याची गरज आहे, असे माजी आमदार राधाराव ग्रासियस यांनी सांगितले.
विजयना काँग्रेस-आपची ऑफर : राधाराव
विजयना काँग्रेस आणि ‘आप’कडून ऑफर आहे. त्यांनी काय तो निर्णय त्वरित किमान सहा महिन्यांत घ्यायला हवा. तशी मुदत विजयनी त्या पक्षांना द्यायला हवी. कारण शेवटच्या क्षणी कृती करण्याची काँग्रेसला सवय आहे. अन्यथा आम्ही वेगळी वाट पत्करायला हवी. कारण लोकांना बदल हवा आहे आणि सरदेसाई यांच्याकडे नेतृत्व गुण आहेत, असे ग्रासियस म्हणाले. मागील लोकसभा निवडणुकीत ‘इंडिया’ आघाडीखाली विरोधकांनी एकजूट दाखविल्याने दक्षिण गोव्यात भाजपाला धूळ चारणे शक्य झाले, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
दरम्यान, विजय सरदेसाई यांच्यावर वाढदिनानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होऊन त्यांना राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रांतील मान्यवरांनी तसेच फातोर्डा व अन्य भागांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. सकाळी सरदेसाई यांनी फातोर्डातील श्री दामोदर शिवलिंग देवस्थानाच्या ठिकाणी जाऊन देवाचे दर्शन घेतले आणि नंतर सेंट फ्रान्सिस झेवियर कपेलमध्ये जाऊन आशीर्वाद घेतले. त्यानंतर आपल्या दवंडे, फातोर्डा येथील ‘गोंयकार घर’ येथे लोकांच्या शुभेच्छा त्यांनी स्वीकारल्या. सायंकाळी ‘वुई फॉर फातोर्डा’ मैदानावर भव्य मंडपात वरील जाहीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊन त्यात फातोर्डा मतदारसंघ मर्यादित दहावी व बारावीतील 170 गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच शेतकऱ्यांना खत, ट्रॅक्टर, अन्य कृषी साधनसामग्री व महिला स्वयंसाहाय्य गटांना यंत्रसामग्री प्रदान करण्यात आली.
एसटी, भंडारी समाजांना न्याय मिळवून देणार
मी एसटी आरक्षणासाठी आवाज उठवला आणि भंडारी समाजासाठी जातीय जनगणना करण्याची मागणीही केली. त्यावेळी भंडारी समाजाचा एकही आमदार माझ्या बाजूने उभा राहिला नाही. भाजप एसटी आणि भंडारी या दोन्ही समाजांना मूर्ख बनवत आहे. त्यांना न्याय मिळेपर्यंत मी गप्प बसणार नाही, असे सरदेसाई याप्रसंगी म्हणाले.
ज्यांना पाडले तेही सोबत
दुसऱ्या पक्षातील काही राजकारणी, ज्यांच्या विरोधात आम्ही काम केले तेही या व्यासपीठावर उपस्थित असल्याने आपण त्यांचा, खास करून दयानंद माद्रेकर यांचा आभारी आहे. ज्यांना आम्ही पाडले ते आमच्यासोबत आहेत, तर ज्यांना जिंकून आणून पदे दिली ते आमच्याबरोबर नाहीत, असे आमदार सरदेसाई यावेळी बोलताना म्हणाले.
भाजप नेत्यांचीही उपस्थिती
विजय सरदेसाई यांच्या या वाढदिन कार्यक्रमास भाजपाच्या नेत्यांनीही चक्क व्यासपीठावर उपस्थिती लावल्याने सर्वांच्या भुवया उंंचावल्याशिवाय राहिल्या नाहीत. त्यात माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, फ्रान्सिस सिल्वेरा यांचा समावेश राहिला.