मनपा कारभाराविरोधात उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
म. ए. समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर यांची पत्रकार परिषदेत माहिती
प्रतिनिधी/ बेळगाव
सर्वसामान्य जनतेच्या पैशातून महानगरपालिका कर वसूल करते. मात्र, कुणाच्या तरी दबावाखाली अधिकारी काम करून महानगरपालिकेला आर्थिक अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्या विरोधात आता सोमवार दि. 30 सप्टेंबर रोजी सकाळी 11.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. तरी समस्त बेळगावकर जनतेने 11 वा. सरदार्स हायस्कूल मैदानावर उपस्थित रहावे, असे आवाहन म. ए. समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर यांनी केले आहे.
जत्तीमठ येथे पत्रकार परिषद घेऊन महानगरपालिकेने तसेच स्मार्ट सिटीने शहरातील विविध रस्ते व इतर कामांमध्ये जो भ्रष्टाचार केला आहे. त्या भ्रष्टाचाराविरोधात आता बेळगावची जनता आवाज उठविणार आहे. जनतेचा पैसा जनतेसाठीच खर्च केला पाहिजे. यासाठी यापुढे अधिकाऱ्यांना जाब विचारला जाणार आहे. रस्ता करताना जागा मालकांना विश्वासात घेणे गरजेचे होते. मात्र, दबावाखाली अधिकाऱ्यांनी जनतेला विश्वासात न घेता रस्ते केले. आता 20 कोटी नुकसानभरपाई देऊन हे प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला जात होता. यासाठी महानगरपालिकेमध्ये जो ठराव करण्यात आला आहे, तो देखील बेकायदेशीर असल्याचा आरोप रमाकांत कोंडुसकर यांनी केला आहे.
मोर्चापूर्वी अर्धवट कामांची यादी द्या
शहरातील रस्ते, ड्रेनेज, पदपथ, पथदीप यांची कामे अर्धवट आहेत. ज्या प्रभागातील कामे अर्धवट आहेत, त्यांची संपूर्ण यादी तयार करून मोर्चापूर्वी द्यावी, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. एकूणच यापुढे जनतेला त्रास होऊ नये, याची दखल घेतली जाईल. तसेच महानगरपालिकेचा भोंगळ कारभार थांबविण्यासाठी बेळगावची जनता रस्त्यावर उतरणार आहे. सोमवारच्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सर्वांनी उपस्थित रहावे, असेही त्यांनी कळविले आहे.
खादरवाडीच्या शेतकऱ्यांचा विजय
खादरवाडी येथील जमिनीच्या खरेदी विरोधात शेतकऱ्यांनी न्यायालयीन लढा दिला. त्याला यश आले. बेकायदेशीर जमीन खरेदी विरोधात गावाने एकजूट दाखवली. त्यामुळेच शेतकऱ्यांचा विजय झाला आहे. यापुढे एकजुटीनेच अन्यायाविरोधात सर्वजण लढा लढायचा असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी माजी महापौर मालोजी अष्टेकर, प्रशांत भातकांडे, युवा म. ए. समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, माजी नगरसेवक अनिल पाटील, आनंद आपटेकर, सुनील जाधव यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.