मराठवाडा पदवीधर निवडणुकीत काटे की टक्कर; राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण अवघ्या 3 मतांनी आघाडीवर; पवारांच्या उमेदवाराची तगडी फाईट
छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीत महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे. टपाली मतांच्या सुरुवातीच्या फेरीत सतीश चव्हाण यांनी केवळ 3 मतांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाबाबत उत्सुकता वाढली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, वैध ठरलेल्या एकूण 494 टपाली मतांपैकी सुरुवातीच्या 200 मतांची मोजणी पूर्ण झाली आहे. या मोजणीत सतीश चव्हाण यांना 67 मते मिळाली, तर डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या खात्यात 64 मते जमा झाली आहेत. त्यामुळे दोन्ही उमेदवारांमधील मतांचा फरक अत्यंत कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
टपाली मतांच्या या सुरुवातीच्या आकडेवारीतून दोन्ही उमेदवारांमध्ये चुरस असल्याचे दिसून येत आहे. मात्र, ही मोजणी प्राथमिक स्वरूपाची असून, उर्वरित मतांची मोजणी पूर्ण झाल्यानंतरच अधिक स्पष्ट चित्र समोर येणार आहे.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील अंतिम निकालाकडे राजकीय पक्षांसह मतदारांचे लक्ष लागले आहे. पुढील मतमोजणीत आघाडी कायम राहते की मतांचे गणित बदलते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
