मराठी माणसाचे अस्तित्व टिकवा, तरच मराठी टिकेल
विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपात राज ठाकरे यांचे प्रतिपादन : रितेश देशमुख यांना ‘कलारत्न पुरस्कार‘ प्रदान
पुणे/ प्रतिनिधी
कुठल्याही भाषेचं अस्तित्व हे जमिनीवर अवलंबून असते. जमीन सरकली की अस्तित्व संपते. काश्मीरमध्ये 370 कलम हटविल्यानंतर देशातील नागरिकांना तेथे जमीन विकत घेण्याचा अधिकार मिळाला. मात्र, आजही भारतातील हिमाचल प्रदेश, आसाम यासह काही राज्यांमध्ये इतर राज्यातील नागरिकांना जमीन खरेदी करता येत नाही. मात्र, महाराष्ट्रात यासाठी मोकळीक का, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी येथे उपस्थित केला. मराठी माणसाच्या जमिनी जात असल्याने त्याचे अस्तित्वच मिटत असून अगोदर मराठी माणसाचे अस्तित्व टिकवा, तरच भाषा टिकेल, अशी विनंती राज ठाकरेंनी महाराष्ट्र शासनाला केली.
विश्व साहित्य संमेलनाची सांगता समारंभात राज ठाकरे बोलत होते. याप्रसंगी प्रसिद्ध अभिनेते रितेश देशमुख यांना ‘कलारत्न पुरस्कार‘ राज ठाकरेंच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी मराठी भाषा मंत्री उदय सामंत, ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे, ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, लक्ष्मीकांत देशमुख, रवींद्र शोभणे उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले, आपण आपल्या भाषेवर ठाम राहिले पाहिजे. इतर राज्ये आपल्या भाषेशी प्रामाणिक असतात मग आपण का नाही? मराठी भाषिकांवरील अन्यायावर साहित्यिकांनी बोलले पाहिजे. पूर्वीचे साहित्यिक पुढे येऊन बोलायचे, भुमिका घ्यायचे. परंतु दुदैवाने आता तसे होत नाही. हल्ली मुलांना व्हाटस ?पवर सर्व माहिती उपलब्ध होते. त्यामुळे मुलांचे पुस्तक वाचन कमी झाले. मुले पुन्हा पुस्तकांकडे वळाली, तरच संमेलनांचा उपयोग होईल. पुस्तकातून होणारा प्रचार मराठी माणसाच्या हितासाठी झाला पाहिजे. जिथे कुठे मराठी भाषिक असतील तिथे त्यांनी मराठी संस्कृती वाढवली पाहिजे. इतर राज्यांमध्ये मातृभाषेच्या अस्मितेसाठी सर्व राजकारणी एकत्र येतात. त्याचरीतीने मराठीसाठी राज्यातील सर्व राजकारण्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. राज्यातील सर्व नदयांचा संगम झाला, तर महाराष्ट्राकडे वाकडया नजरेने बघायची कोणाची हिंमत राहणार नाही.
मराठी घरात जन्म घ्यायला भाग्य लागते
रितेश देशमुख म्हणाले, मराठी घरात जन्म घ्यायला पण भाग्य लागते. मराठी भाषेवर माझे विशेष प्रेम आहे. हिंदीत काम करताना मला वडील म्हणायचे मराठीत काय करणार? मराठीत काम करायचे सोडलेले नाही. लय भारी चित्रपट केला, तेव्हा पहिला फोन राज ठाकरेंचा आला. राज ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली माझी मराठी चित्रपटांची सुरुवात झाली. मराठी चित्रपट आणि भाषा माझ्या कायमच हृदयात राहील.
तेव्हा केसेस टाकू नका
मराठीच्या सन्मानासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, असे उदय सामंत म्हणाले असून आम्ही जे-जे करू त्याला ते पाठिंबा देणार आहेत. मात्र हे करताना आमच्या कार्यकर्त्यांवर केसेस टाकू नका, अशी मिश्किल टिप्पणी राज ठाकरेंनी कार्यक्रमात केली. आम्ही महाराष्ट्राच्या भल्यासाठी, सन्मानासाठी झटतोय. मराठी भाषा वृद्धिंगत नाही करायची तर मग आपला उपयोग काय? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.
चौथे संमेलन नाशिकला
मराठी अस्मिता जपण्याचे काम शासन करत आहे. राज ठाकरेंकडून मराठी भाषेच्या संवर्धनासाठी केले जाणारे काम कौतुकास्पद आहे. या कामासाठी शासन ठाकरेंच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही देतो. मराठी भाषा विभागातील अधिक्रायांनी हसत हसत या विभागाचे काम करावे. मराठीचे जतन करण्याची जबाबदारी शासनाने घेतली आहे. बाल साहित्य संमेलन, स्त्राr साहित्य संमेलन ही सगळी संमेलन घ्यायची ठरवली आहेत. पुढील विश्व मराठी संमेलन नाशिकमध्ये होईल, अशी घोषणा उदय सामंत यांनी कार्यक्रमात केली.