For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मराठी भाषिकांनी पुन्हा एकदा दाखविली जनशक्ती

11:01 AM Apr 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
मराठी भाषिकांनी पुन्हा एकदा दाखविली जनशक्ती
Advertisement

शक्तिप्रदर्शनाने महादेव पाटील यांचा अर्ज दाखल : भगवे ध्वज, भगवा फेटा परिधान करून अनेक महिला सहभागी

Advertisement

बेळगाव : मराठी भाषिकांच्या न्याय हक्कासाठी म. ए. समितीनेही लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शुक्रवारी शक्तिप्रदर्शनाने म. ए. समितीचे उमेदवार महादेव पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी संपूर्ण परिसर भगवेमय झाला. महिलांनी तर अक्षरश: महादेव पाटील यांना विजयी करण्याचा निर्धार करून स्वयंस्फूर्तीने आपला सहभाग दर्शविला. यामुळे राष्ट्रीय पक्षांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. म. ए. समितातर्फे अर्ज दाखल करण्यात येणार असल्याने शहरासह ग्रामीण भागातील मराठी जनता पुन्हा एकवटली. धर्मवीर संभाजी चौक येथे बघताबघता हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते जमले. धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीला सुरुवात झाली. बैलगाडीमधून उमेदवार महादेव पाटील हे आपला अर्ज भरण्यासाठी जात होते. यामुळे एक वेगळे आकर्षण निर्माण झाले. शेतकऱ्यांच्या जमिनी वाचविण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो असल्याचे दाखवून दिले.

यावेळी महिला भगवे ध्वज, भगवा फेटा परिधान करून सामील झाल्या होत्या. माउली झांजपथकानेही साऱ्यांनाच आकर्षित केले होते. हर हर महादेव, घर घर महादेव अशा घोषणा देत कार्यकर्ते सामील झाले होते. निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांच्याकडे उमेदवारी अर्ज देण्यात आला. म. ए. समितीचे आजी-माजी लोकप्रतिनिधी, नगरसेवक, पदाधिकारी, विविध ग्रा. प. अध्यक्ष, उपाध्यक्ष, माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, शहर म. ए. समितीचे कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण-पाटील, तालुका म. ए. समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे, रमाकांत कोंडुस्कर, आर. एम. चौगुले, मदन बामणे, नगरसेवक रवी साळुंखे, युवा म. ए. समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, युवा नेते सागर पाटील, श्रीकांत कदम यांच्यासह माजी महापौर, उपमहापौर, माजी नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.