For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा!

11:03 AM Feb 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा
Advertisement

ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार : येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलन उत्साहात : ग्रंथदिंडी लक्षवेधी

Advertisement

बेळगाव : मराठी साहित्यिकांनी परिघाबाहेर जाऊन पाहिल्यानेच मराठी साहित्यात वेगळेपण आहे. देशामध्ये महाराष्ट्र व बंगाल या दोन राज्यांनीच वैचारिक परंपरा जपत देशाला दिशा देण्याचे काम केले आहे. मराठी भाषेला 12 व्या शतकापासूनचा इतिहास आहे. त्यामुळे भाषा टिकविण्यासाठी चिंता व्यर्थ असून अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे, हे रास्त आहे आणि तो हक्कही आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार यांनी केले. येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघ यांच्यातर्फे स्वातंत्र्यसैनिक तरुण भारतकार दिवंगत बाबुराव ठाकुर संमेलननगरी श्री शिवाजी विद्यालय येळ्ळूर येथे आयोजित 19 व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते.

ते म्हणाले, येळ्ळूर हे आंदोलकांचे गाव आहे. मराठी भाषा, साहित्य, संस्कृती टिकविण्यासाठी करावा लागत असलेला संघर्ष कौतुकास्पद आहे. मराठी भाषेला प्रदीर्घ इतिहास आहे. वर्तमानपत्र व मराठी साहित्याचा जवळचा संबंध आहे. अनेक लेखकांचे साहित्य वर्तमान पत्रांतून प्रसिद्ध झाल्यामुळे साहित्यिक नावारुपाला आले आहेत. मराठी भाषा टिकण्यासंदर्भात वादविवाद होत असतात. मात्र, मराठी भाषेला मोठा वारसा आहे. त्या-त्या काळात भाषेसाठी एल्गार केला गेला आहे. संत परंपरेतील साहित्याने समाजाच्या विरोधात दंड थोपटले, समाजाचे प्रबोधन केले. देवाच्या नावावर बाजार मांडला जात असेल तर लिहिते झाले पाहिजे. लेखकांनी लिखाण केले पाहिजे. भावना दुखावतात म्हणून लिहिणे व बोलणे थांबविणे, लेखन थांबविणे कोणावर तरीही परिणाम घडविण्यासाठीच लेखक लिहीत असतो. समाजात घडणारा बदल व त्यामध्ये साहित्याचा संबंध येतोच. सभोवती घडणाऱ्या घटनांचा संबंध साहित्यामध्ये येतो. साहित्यिकांच्या लिखाणाचा परिणाम समाजावर होतोच, असे त्यांनी सांगितले.

Advertisement

सध्याच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक घटनांचा परिणाम समाजावर होत असतो. शेतीचे महत्त्व कमी झाल्यानेच शेतकरी मुलांचा विवाह ठरत नाही. मुलींच्या उच्चशिक्षणाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मुलीही सुशिक्षित तरुणांनाच पसंत करीत आहेत. सध्याच्या घडीला शेतीची प्रतिष्ठा संपवली गेली आहे. त्यामुळे ज्याचे भविष्य नाही त्याच्याशी का जोडावे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. समाजासमोर हा मोठा प्रश्न आहे. तंत्रज्ञानाने अनेक संज्ञा बदलल्या आहेत. पुढील पिढी तंत्रज्ञानावरच अवलंबून असणार आहे. धर्माच्या नावावर समाजामध्ये भिंती निर्माण केल्या जात आहेत. इतिहासातील लढाया वर्तमानात लढल्या जात आहेत. यामुळे आपण काहीतरी चुकत आहोत, हे निश्चित आहे. अनेक आक्रमणे झाली तरी संस्कृती, परंपरा टिकून आहेत, असे त्यांनी सांगितले.

ग्रा. पं. उपाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी स्वागत केले. उद्योजक सूर्यकांत शानभाग यांनी उद्घाटन करून साहित्य व वाचनाचे महत्त्व पटवून दिले. प्रारंभी संमेलनाचे अध्यक्ष श्रीराम पवार, ज्योती पठाणीया, सुजाता मायाण्णाचे, माजी महापौर सरिता पाटील, अॅड. सागर खन्नूकर, अॅड. सुधीर चव्हाण, अॅड. शाम पाटील, माजी आमदार परशुरामभाऊ नंदिहळ्ळी, ग्रा. पं. माजी सदस्य सतीश पाटील, दुद्दाप्पा बागेवाडी, बी. जी. पाटील, संघाचे अध्यक्ष परशराम मोटराचे, परशराम बिजगरकर, प्रा. सी. एम. गोरल आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

मराठमोळ्या ग्रंथदिंडीचे आकर्षण

येळ्ळूर येथील 19 व्या मराठी साहित्य संमेलनात मराठमोळ्या ग्रंथदिंडीचे दर्शन घडले. टाळ-मृदंगाच्या गजरात दिंडीला चांगळेश्वरी मंदिरपासून प्रारंभ झाला. दिंडीत शाळकरी मुले विविध पोषाख धारण करून सहभागी झाली होती. दिंडी मार्गावर सुंदर रांगोळ्या घालून सजावट करण्यात आली होती. संमेलनाध्यक्ष श्रीराम पवार, सूर्यकांत शानभाग, ज्योती पठाणीया, प्रमोद पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आले. चांगळेश्वरी मंदिरपासून सुरू झालेली दिंडी श्री शिवाजी हायस्कूलच्या आवारातील संमेलनस्थळी दाखल झाली.

पुरस्कारांचे वितरण

राष्ट्रवीरकार शामराव देसाई पुरस्कार कोल्हापूरचे ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार यांना, मारुती पेंटर सामाजिक पुरस्कार दलित नेते मल्लेश चौगुले, रमाबाई आंबेडकर महिला सामाजिक पुरस्कार पुणेतील ज्योती पठाणीया, गुरुवर्य गावडोजी पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार मुख्याध्यापक एम. बी. बाचीकर, विशेष साहित्य पुरस्कार प्रा. सुनंदा शेळके, कै. कृष्णा मुचंडीकर पुरस्कार पत्रकार गोपाळ गावडा, क्रीडा पुरस्कार सुजय सातेरी, कृषी पुरस्कार दौलत कुगजी, शैक्षणिक सन्मान डॉ. प्रवीण चिट्टी, डॉ. निकिता कणबरकर यांना देऊन सन्मानित केले.

संमेलनातील ठराव

  • सर्वोच्च न्यायालयात गेली 20 वर्षे सीमाप्रश्न सुनावणीला आलेला नाही. तो त्वरित सुनावणीला यावा ही न्यायदेवतेकडे अपेक्षा.
  • साहित्यिक व पत्रकार यांना शासनाच्यावतीने मानधन दिले जावे.
  • देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ले होत आहेत. त्या कृत्याचा त्वरित बंदोबस्त करून लोकशाहीचा आदर राखावा.

महिलांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे : ज्योती पठाणीया

पुणे येथील उद्योजिका ज्योती पठाणीया यांनी समाजातील शोषित, पीडित, महिलांच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याची माहिती दिली. महिलांना सन्मानाने जगता यावे, समाजानेही त्यांची परिस्थिती जाणून घेऊन सन्मानाने जगण्यासाठी सहकार्य करण्याची गरज आहे. समाजातील अनेक शोषित महिलांना माहेरचे दारही बंद झालेले असते. निराधार, असह्या झालेल्या महिलांनी आत्महत्येचा मार्ग अवलंबलेला आहे. मात्र, जीवन संपविल्याने प्रश्न सुटणार नाही, त्या प्रश्नाला सामोरे गेले पाहिजे. त्यासाठीच अशा शोषित महिलांना समाजात मान मिळवून देण्यासाठी समाजकार्याचा वसा घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. या दरम्यान आलेल्या कटू अनुभवांची माहिती त्यांनी दिली. पुण्यातील बुधवार पेठ येथील लालबत्ती भागातील महिलांच्या परिस्थितीची माहिती देऊन त्यांच्या मुलांना शिक्षण देऊन आज उच्च पदावर कार्यरत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. एकीकडे देवींची पूजा करायची आणि दुसरीकडे महिलांचे शोषण हे थांबविले पाहिजे. महिलांना मानाने जगता आले पाहिजे. त्यासाठी आपण सतत मदत करत असून कुणालाही मदतीची गरज असल्यास आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पुन्हा जगूया आनंदाने

‘पुन्हा जगूया आनंदाने’ या विषयावर वसंत हंकारे यांनी दुसऱ्या सत्रात बोलताना कितीही संकटे आली तरी हसत हसत संकटांचा सामना केला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. आपल्या परखड आवाजाने व हावभावाद्वारे प्रेक्षकांना खळखळून हसविले. संस्कारक्षम पिढी घडविण्याचे आवाहन केले. सध्याच्या ताणतणावाच्या जगात प्रत्येक जण एक ना अनेक समस्यांनी ग्रासलेला आहे. यामुळे प्रत्येक जण आनंद विसरून गेला आहे. जगणे म्हणजे विवंचना झाली आहे. अशा परिस्थितीत संस्कार लोप पावत आहेत. माणसाला प्रत्येक गोष्ट सहजतेने उपलब्ध होत आहे. मात्र, संस्कारक्षम पिढी घडताना दिसत नाही. यासाठी सर्व सुविधा दिल्या नाही तरी चालेल, मात्र संस्कारक्षम पिढी घडविणे आवश्यक आहे. प्रत्येक घरामध्ये एक डॉक्टर, एक अभियंता, एक वकील नसला तरी चालेल, मात्र चारित्र्यवान माणूस घडला पाहिजे, असे वसंत हंकारे यांनी सांगितले.

भारुडाने आणली रंगत

तुकोबांचं स्मरण झालं की गाथा पुढे उभी राहते, तर नाथांची आठवण झाली की त्यांची भारुडे समोर येतात, असे सांगत क्रोध, मत्सर, संताप, व्यसन अशा नवऱ्याची समाजात कशा प्रकारे दशा होते, हे संमेलनातील चौथ्या सत्रात सातारा येथील तानाजी कुंभार व सहकाऱ्यांनी विनोदातून समाज प्रबोधन या भारुड कार्यक्रमातून दाखवून दिले. प्रारंभी माझे माहेर पंढरी, लिंबोनीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई, माझं छकुलं छकुलं माझं सोनुलं सोनुलं आदी गौळण सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. नवरा नको गं बाई मला नवरा नको, बयो तुला बुरगुंडा होईल गं, या भारुडाचे सादरीकरण केले. एकुलता एक मुलगा झाला आणि तोही बापावर गेला असे म्हणत एकुलत्या मुलाची व्यथा भारुडातून मांडली. पूर्वी जात्यावर दळण दळले जात होते. त्यावेळी महिला एकत्रित येऊन गीत सादर करत होत्या. मात्र, काळाच्या ओघात जातं जाऊन त्याची जागा गिरणीने घेतली आहे. त्यामुळे जात्यावरील गीते लुप्त झाली आहेत. अशा परिस्थितीत काही कलाकार जुन्या संस्कृती आणि परंपरा जपत असल्याचेही त्यांनी बोलताना सांगितले.

Advertisement
Tags :

.