For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऑस्ट्रेलियात भरते मराठी शाळा...मराठी संस्कृती जपण्यासाठीचा ऑस्ट्रेलियन सरकार व मराठी भाषिकांचा उपक्रम

01:27 PM May 17, 2024 IST | Abhijeet Khandekar
ऑस्ट्रेलियात भरते मराठी शाळा   मराठी संस्कृती जपण्यासाठीचा ऑस्ट्रेलियन सरकार व मराठी भाषिकांचा उपक्रम
Advertisement

सुधाकर काशीद कोल्हापूर

आमचा चिंटू इंग्लिश मधलेच मोबाईल नंबर लगेच ओळखतो. मराठी नंबर त्याला कळतच नाही...

Advertisement

आमच्या नयनाला केळ घे म्हटलेला आवडत नाही. बनाना म्हटलं की लगेच हात पुढे करते...

आमचा मॉन्टी जॉनी जॉनी यस पप्पा, खूप चांगलं म्हणतो. एवढा मोठा भोपळा आकाराने वाटोळा.. हे गाणं म्हण म्हटल की ,म्हणजे काय असे विचारतो...

Advertisement

आपल्याकडच्या चिंटू, नयना आणि मॉन्टीच्या आईच्या या कौतुकाने गच्च भरलेल्या प्रतिक्रिया आहेत. आपल्या मुलांना लहानपणापासून इंग्रजीची आवड कशी आहे, हे सांगण्याची त्यांना मोठी हौस. इंग्रजीच्या नादात आपली पोरं मराठमोळी भाषा विसरत चालली, यात त्यांना काहीही चूक वाटत नाही..

पण नेमकं याउलट घडते आहे, ते ऑस्ट्रेलियातील सिडने येथे नोकरीनिमित्त वास्तव्य करणाऱ्या कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, मुंबई, जुन्नर, नगर, नाशिक परिसरातील रहिवाशांनी सिडने येथे चक्क मराठी शाळा चालवली आहे. उलाढालीत वावरताना इंग्रजी जरूर आवश्यक आहे. म्हणून मूळ मराठी भाषा, मराठी संस्कृती विसरायची नाही. तिला अडगळीत टाकायची नाही, ही या शाळेमागील भावना आहे आणि विशेष हे की ऑस्ट्रेलियन सरकारनेच कम्युनिटी स्कूल म्हणून अशा शाळांना अनुदान दिले आहे. त्यामुळे या मराठी शाळेला आणखी बळ आले आहे.

सिडनी येथील बहुतेक मराठी रहिवासी महाराष्ट्रातून नोकरीनिमित्त तेथे आले आहेत. ज्यांना लहान मुले आहेत, त्यांनी मुलांना इथल्या शाळेत दाखल केले आहे. त्या शाळेतला अभ्यासक्रम जरूर इंग्रजीत आहे. पण या शाळेच्या प्रिन्सिपलची सूचना अशी असते की, मुलाला येथे इंग्रजीतून शिक्षण घ्यावे लागते म्हणून घरातही त्याच्याशी इंग्रजीत बोलू नका. तुमची मूळ भाषा, संस्कृती, मूळ गावरान खेळ, मूळ गाणी, मूळ लोकगीते हे त्याला जरूर ऐकू द्या, घरातले संपूर्ण संभाषण मराठीतच ठेवा आणि ऑस्ट्रेलियातले मराठी रहिवासी त्याचे तंतोतंत पालन करत आहेत.

सिडनीमध्ये पूर्वी एक मराठी शाळा होती. आता मकवारे फिल्ड, बेस्टमिड, वोलोनगोडा येथे तीन मराठी शाळा झाल्या आहेत. साधारण 170 विद्यार्थी तेथे शिकत आहेत. शाळेसाठी या रहिवाशांनी स्थानिक कमिटी तयार केली आहे.

या शाळेसाठी स्वतंत्र मराठी पुस्तके आहेत. पंधरा शिक्षक आहेत असे की, केवळ डी.एड. किंवा बी.एड. दर्जाची पदवी असणारे नव्हे तर, मुलांना कसे हाताळायचे, एक शब्दही रागाने न बोलता त्यांच्याकडून अभ्यास कसा करून घ्यायचा, याची विशेष पदवी असलेले शिक्षक नेमले आहेत. मराठी शिक्षणाबरोबरच दहीहंडी, नवरात्रौत्सव, प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, रंगपंचमी, गणेशोत्सव, शिवजयंती हे सोहळे तेथे आनंदाने साजरे केले जातात. सणाला महिला नऊवारी साडी नेसतात. पुरुष धोतर, विजार-झब्बा असे पारंपरिक वेश परिधान करतात. गणपतीची मूर्ती स्वत:च्या हाताने तयार करतात. पारंपरिक वाद्यांच्या तालावर गणेश विसर्जनाची मिरवणूक काढतात. व्यक्तिगत अडचणीच्या वेळी एकमेकाला मदत करतात.

आणि नेमके बरोबर याच्या उलटे आपण येथे वागत आहोत.
इंग्रजी भाषा आवश्यक असली तरी आमचा मुलगा, मुलगी लहानपणापासून इंग्रजी शाळेला.. इंग्रजी शाळेला असा नको इतका गवगवा केला जात आहे. मुलाला तोंड उघड म्हणण्याऐवजी कारण नसताना ‘ओपन युवर माऊथ.’ असे आई-बाप म्हणत आहेत. मुलाला मराठी आकड्यापेक्षा इंग्रजीतील आकडे कसे झटकन् येतात, हे मोठ्या कौतुकाने सांगितले जात आहे. मुलाने झेंडावंदनाऐवजी फ्लॅग होस्टिंग म्हणणे म्हणजे मुलाची बौद्धिक वाढ झाली, असे समजले जात आहे. ‘येरे येरे पावसा.. तुला देतो पैसा..’, एवढा मोठा भोपळा.. आकाराने वाटोळा’ ही बडबड गीते गावठी ठरवली जाऊ लागली आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्याच मराठी माणसांनी ऑस्ट्रेलियात चालवलेल्या मराठी शाळेचा आदर्श घेण्याची वेळ भारतात राहून आता आपल्यावर आली आहे.

Advertisement
Tags :

.