मराठी सन्मान यात्रा 27 फेब्रुवारीऐवजी 15 मार्चला
मराठी भाषा दिनी राजहंसगडावर पूजनाचा कार्यक्रम
प्रतिनिधी/ बेळगाव
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागाच्यावतीने शुक्रवार दि. 27 रोजी मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून सन्मान यात्रेला प्रारंभ करण्यात येणार होता. परंतु, युवा समिती सीमाभागाचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्या वडिलांचे मंगळवार दि. 24 रोजी अल्पशा आजाराने निधन झाल्याने शुक्रवार दि. 27 रोजी होणारी बाईक रॅली व जाहीर सभा स्थगित करून रविवार दि. 15 मार्च रोजी घेतली जाणार असल्याचे युवा समिती सीमाभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.
26 जानेवारी रोजी रायगडावरून मराठी सन्मान यात्रेची घोषणा करण्यात आली. पहिल्या टप्प्यात मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून राजहंसगड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिवादन करून बाईक रॅली काढली जाणार होती. येळ्ळूर, सुळगा, राजहंसगड, धामणे, अवचारहट्टी या परिसरातून जागृती केली जाणार होती. त्यानंतर येळ्ळूर येथे जाहीर सभेचे आयोजनही करण्यात आले होते.
परंतु, शुभम शेळके यांचे वडील विक्रांत शेळके यांचे मंगळवारी निधन झाले. त्यानंतरही आपल्या वैयक्तिक कारणामुळे लढा व सन्मान यात्रा कुठे थांबता कामा नये, अशी भावना शुभम शेळके यांनी कार्यकर्त्यांसमोर मांडली. पण कार्यकर्त्यांशी व नेत्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर शुक्रवारी होणारी सन्मान यात्रा स्थगित करून रविवार दि. 15 मार्च रोजी काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
युवा समितीचे आवाहन
शुक्रवार दि. 27 रोजी मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून दुपारी 4 वाजता राजहंसगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन तसेच कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन केले जाणार आहे. या कार्यक्रमाला मराठी भाषिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागाच्यावतीने करण्यात आले आहे.