मराठी अधिकारी भास्कर सावंत यांचा राजस्थान प्रशासनात दबदबा
विटा :
सांगली जिल्ह्यातील भिकवडी या ग्रामीण भागातील सुपुत्र भास्कर आत्माराम सावंत यांनी प्रशासकीय सेवेत उत्तुंग यश मिळवले असून, आता त्यांच्याकडे राजस्थान सरकारच्या गृह विभागासह अनेक महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
भास्कर सावंत हे राजस्थान केडरमधील वरिष्ठ IAS अधिकारी असून, त्यांनी 1995 साली जिल्हाधिकारी म्हणून प्रशासकीय सेवेत पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी जयपूर आयुक्त, शिक्षण विभागाचे सहसचिव, आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अशा विविध पदांवर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक व नेतृत्वक्षम कार्यशैलीमुळे त्यांचा दबदबा राजस्थान प्रशासनात मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे.
- गृह खात्याची धुरा मराठी अधिकाऱ्याकडे
सध्या सावंत यांच्याकडे अतिरिक्त मुख्य सचिव, गृह विभाग, तसेच गृह रक्षण, जेल, राज्य अन्वेषण ब्युरो, मुख्य सतर्कता आयुक्त, आपत्ती व्यवस्थापन व नागरी सुरक्षा विभाग अशा विविध विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे. गृह विभागासारख्या महत्त्वाच्या खात्याचे नेतृत्व मराठी अधिकाऱ्याकडे सोपवले जाणे हे महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे.
- ग्रामीण शिक्षणातून शासकीय सर्वोच्च पदापर्यंतचा प्रवास
कडेगाव तालुक्यातील भिकवडी गावचे सुपुत्र असलेल्या भास्कर सावंत यांचे प्राथमिक शिक्षण खानापूर तालुक्यातील लेंगरे येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यांच्या वडिलांनी – आत्माराम सावंत गुरूजी – सामाजिक कार्यात, कुस्ती क्षेत्रात योगदान दिले. सावंत बंधूंनी या संस्कारांचा वारसा पुढे नेत "पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा" ही म्हण सार्थ ठरवली.
भास्कर सावंत यांचे बंधू रवि सावंत हेही प्रशासकीय सेवेत आहेत, तर डॉ. विक्रमसिंह कदम हे सांगली जिल्हा शल्यचिकित्सक असून, आरोग्य क्षेत्रात त्यांचा दबदबा आहे.
- प्रेरणादायी यश
भास्कर सावंत यांनी स्पर्धा परीक्षा पास करून यशाची शिखरे गाठत, "मराठी माणूस स्पर्धा परीक्षेत मागे असतो" ही संकल्पना मोडून काढली. दुष्काळी भागातील युवक आपल्या मेहनतीने, बुद्धीमत्तेने आणि जिद्दीने राजस्थानसारख्या राज्यात उच्च प्रशासकीय पदावर पोहोचू शकतो, हे त्यांनी सिद्ध केले. त्यांच्या यशाने आज प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटतो.