‘मराठी’ शूरवीरांची अन् संतांची!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गौरवोद्गार : नवी दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन
सागर जावडेकर/ नवी दिल्ली
विज्ञान भवन नवी दिल्ली येथे 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रमुख पाहुणे या नात्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. आपल्या अभ्यासपूर्ण भाषणाने त्यांनी तमाम साहित्यिकांना खिळवून ठेवले. मावळते अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, नूतन अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्वागताध्यक्ष शरद पवार, अ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे आदी मंडळी तसेच आयोजक, संमेलनाचे निमंत्रक संजय नहार यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. आपल्या भाषणाची सुरुवातच पंतप्रधानांनी माझ्या मराठी सारस्वतांनो तुमचे स्वागत करतो अशा शब्दातून केली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला 147 वर्षांचा इतिहास आहे. पुढील दोन वर्षांनी संमेलनाची शताब्दी आहे. त्याची तयारी आतापासून सुरु करताना युवावर्गाला तयार करा आणि त्यांच्यामध्ये मराठी भाषेचे प्रेम निर्माण करा. त्यांना साहित्य क्षेत्रात आणा, प्रोत्साहन द्या असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
भाषा टिकली तर संस्कृती टिकणार आहे, हे लक्षात ठेवा. महादेव गोविंद रानडे यांनी 1878 मध्ये मराठी साहित्य संमेलनाचा पाया रचला. त्यानंतर हरिनारायण आपटे, शिवराम परांजपे, वीर सावरकर या देशातील महान विभुतीनी याचे अध्यक्षस्थान भूषविले. त्या परंपरेशी जोडले जाण्याची संधी या निमित्ताने आपल्याला प्राप्त झाली हे आपण भाग्य समजतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
आपल्या भाषणात पंतप्रधानांनी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही तर ती आपल्या संस्कृतीची वाहक असते. समाजात जन्म घेत असलेली भाषा, समाजाच्या निर्मितीत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावित असते. मराठी भाषेने महाराष्ट्र आणि देशातील अनेकांच्या विचारांना अभिव्यक्ती देऊन सांस्कृतिक जडणघडण केलेली आहे. मराठी ही अत्यंत परिपूर्ण भाषा आहे. त्यात शुरता आहे. विरताही आहे. सौंदर्य आहे. संवेदनाही आहेत. आधुनिकता आहे. मराठी भाषेत भक्ती आहे, शक्ती आहे आणि युक्तीही आहे. ही मराठी भाषेची खरी महती आहे. समर्थ रामदास स्वामींनी ‘मराठा तितुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा. आहे तितुके जतन करावे. पुढे आणिक मिळवावे. महाराष्ट्र राज्य करावे ! असे जे म्हटले आहे त्या पंक्ती त्यांनी उद्धृत केल्या.
मराठी ही ग्यानबा तुकोबाची आहे. रामदासांची आहे, नामदेव, तुकडोजी महाराज, संत गोरा कुंभार, बहिणाबाई यांची आहे. संतांनी भाषेमध्ये फार मोठी भर घातलेली आहे. समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे. मराठी भाषेतील छत्रपती शिवाजी महाराज संभाजी राजे, बाजीराव पेशवे इत्यांदीनी दुष्मनाना संपवून टाकले. भाषेतून वीर पुरुष जन्माला आले. आधुनिक काळात लोकमान्य टिळक, फडके, सावरकर, इत्यादींनी इंग्रजांची झोप उडवून दिली होती. त्याचबरोबर या शुरवीरांचे मराठी साहित्यात देखीर फार मोठे योगदान आहे. टिळकांचे गीता रहस्य साऱ्या देशासाठी एक मौलिक ग्रंथ ठरलेला आहे. मराठी भाषा ही मराठी साहित्यिक आणि विचारवंतांनी अमृत भाषा निर्माण केली व तिची गोडी अविट आहे. कोणतीही भाषा भेदभाव करीत नाही. भारतातील अनेक भाषा या विविधतेतून एकता घडविण्याचे महत्त्वाचे काम करतात असे निवेदन करून पंतप्रधानांनी आचार्य अत्रे, विं. दा. करंदिकर आदींचाही गौरवोल्लेख केला आणि आज भाषेच्या नावावर जे समाजात गैरसमज पसरवून वैरत्व निर्माण करतात तेव्हा भाषेची समृद्धताच त्यांना उत्तर देऊन जाते, असे निवेदन करून पंतप्रधानांनी उपस्थित सर्व मराठी बांधवांना शुभेच्छा दिल्या.
अन् पंतप्रधानांनी पवारांसाठी उभे राहून खुर्ची सरकविली
विज्ञान भवन सभागृहात शरद पवार जेव्हा भाषण करण्यासाठी पोडीयमपर्यंत गेले व तेथून ते परत आल्यानंतर पंतप्रधान आपल्या खुर्चीवरून उठले आणि त्यांनी शरद पवारांचा हात धरून थोडी खुर्ची सरकविली आणि पवारांना खुर्चीत बसविले. एवढेच नव्हे तर स्वत: पाण्याची बाटली उघडली. ग्लासमध्ये पाणी ओतले आणि ते पवारांना प्यायला दिले. पंतप्रधानांच्या या कृतीतून सारे रसिक साहित्यिक थक्क झाले. सर्वांनी जोरदार टाळ्यांचा कडकडाट केला. कितीतरी मिनिटे या टाळ्या चालूच होत्या. सूत्रनिवेदीकेने हे सूत्र पकडून या साहित्य संमेलनातून प्रेमाचा वर्षाव होतोय असेच प्रेम वाहवत ठेवा, असा सल्लाही दिला.
संघामुळेच जगण्याची मिळाली प्रेरणा
पंतप्रधानांनी आपल्या भाषणातून सांगितले की राष्ट्रीय स्वयंयसेवक संघाला यंदा शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. महाराष्ट्रातील एका महान व्यक्तीने संघाची स्थापना केली होती. आपण भाग्यवान समजतो. त्यांच्या विचारसरणीतून आपण आज या पदावर पोहोचलो. संघाने मला आणि देशातील शेकडो कोटी जनतेला जगण्याची प्रेरणा दिली आहे. संघामुळेच आपल्याला मराठी भाषा समजली, उमजली व मराठी हळूहळू शिकलो, असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधानांकडून छावाचे असेही कौतुक
आपल्या भाषणात पंतप्रधानांनी ज्येष्ठ साहित्यिक शिवाजी सावंत यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. ते म्हणाले की, सध्या छावा या चित्रपटाने बॉक्स ऑफिसमध्ये धुमाकूळ घातलेला आहे. संभाजी महाराजांचे शौर्य आपणा सर्वांना प्रेरणा देत असते. शिवाजी सावंत यांच्या कादंबरीने आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रेरणेने युवा वर्गामध्ये चैतन्य निर्माण झाल्याचे ते म्हणाले. यावेळी उपस्थित साहित्यिकांनी देखील जोरदार टाळ्या वाजवून पंतप्रधानांच्या या निवेदनाचे स्वागत केले.
संमेलनाची सुऊवात जैन धर्माच्या प्रार्थनेने करण्यात आली आणि त्याचवेळी काश्मीरची शमीमा अख्तर या युवतीने ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत सादर केले. समारोपाच्या वेळी आता विश्वात्मके देवे... हे पसायदान सादर करण्यात आले. शमीमा अख्तर या युवतीचे सर्वत्र जोरदार कौतुक करण्यात आले. आयोजन समितीचे निमंत्रक संजय नहार यांनी उपस्थित सर्व मंडळींना उद्देशून केलेल्या भाषणात साहित्य संमेलन कशा पद्धतीने दिल्लीमध्ये सुरू करण्यात आले याबाबतची सविस्तर माहिती दिली.
मोदींमुळे मराठीला अभिजात दर्जा : फडणवीस
आपल्या भाषणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जगभरातील मराठी माणसांचे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करुन देण्याचे जे स्वप्न होते ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साकार करुन दाखविले. त्यानंतर दिल्लीत हे संमेलन पंतप्रधानांच्या उपस्थितीत पार पाडणे ही मराठी भाषिकांसाठी अभिमानाची बाब आहे. आपल्या मराठी भाषेवर परकीय शक्तींनी आक्रमण करण्याचे प्रयत्न केले व त्यातून भाषा दूषित करण्याचा प्रयत्न झाला परंतु ते शक्य झाले नाही. प्रत्यक्षात छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील राजकारभारात मराठीचा वापर करुन आज्ञावली तयार करुन मराठी भाषेचे संवर्धन करण्यात फार मोठी कामगिरी बजावलेली आहे. भाषेचा आग्रह व स्वाभिमान या गोष्टी आपण महाराजांच्या कृतीतून शिकलो, असे ते म्हणाले. मराठी भाषेला माया आहे, वात्सल्य आहे. म्हणूनच ती समृद्ध भाषा ठरली आणि लोकभाषा झाल्याचे गौरवोद्गारही मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढले व आयोजकांचे अभिनंदन केले.
शरद पवारनी दिली सणसणीत चपराक
साहित्य संमेलनात राजकारण्याचे काय काम? असा प्रश्न वारंवार उपस्थित होतो. परंतु लोकमान्य टिळक, पं. नेहरू, अटलबिहारी वाजपेयी, शंकरराव चव्हाण इत्यादींनी साहित्याला प्रतिष्ठा मिळवून दिलेली आहे. ही मंडळी स्वत: साहित्यिक होती, अशा शब्दात स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी हा विषय उरकून काढणाऱ्यांना सणसणीत चपराक दिली. राजकारण्यांनी साहित्य क्षेत्रात उडी घेतलेली आहेच. परंतु महानोर, अत्रे, लक्ष्मण माने इत्यादीनी देखील राजकारण्यांच्या आखाड्यात आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न केलेला आहे, असे पवार म्हणाले. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद क्वचितच महिलांना दिले जाते. अनेक महिलांना ते पुढे मिळत रहावे आणि भाषेच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रित यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
भाषा बोलल्याने जिवंत राहते : डॉ. तारा भवाळकर
भाषा ही समाजाला जोडणारी आहे, माणसाला जोडणारी आहे आणि भाषा ही बोलल्यानंतरच जिवंत राहते. पुस्तकात राहून जिवंत राहू शकत नाही, असे निवेदन करुन अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या नूतन अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांनी भाषा ही जोडणारी असावी तोडणारी नसावी असे म्हटले.
अध्यक्षीय भाषणातून डॉ. तारा भवाळकर यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे अभिजात भाषेचे संमेलन आहे आणि अनेक बोलींच्या भाषांचे ते संमेलन आहे. पंतप्रधानांची या संमेलनाला उपस्थिती ही अत्यंत आनंदाची बाब आहे.
विठ्ठल रखुमाईची मूर्ती पंतप्रधानाना भेट दिली याचा उल्लेख करताना डॉ. तारा भवाळकर म्हणाल्या की, विठ्ठल रखुमाई हे महाराष्ट्राच्या उदार संस्कृतीचे प्रतिक आहे. तमाम माणसांचे ते आराध्य दैवत आहे व हा विठ्ठल कर्नाटकातून महाराष्ट्रात आला व तिथेच तो स्थिरावला. विठ्ठल हा कष्टकरी समाजाचा देव आहे. स्वत: विठ्ठल अत्यंत साधा आहे. त्याचे भक्तगण हे सर्व जाती जमातींचे आहेत. मराठीची भूमिका व मराठीचे स्थान पक्के करण्यात आपल्या संतांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे, असे डॉ. तारा भवाळकर म्हणाल्या.
मराठी भाषेचा उगम हा आपल्या संस्कृतीतून झालेला आहे. मराठी साहित्याचा उगम हा भाषेच्या विविधांगी पैलूतून झालेला आहे. भाषा ही नेहमीच संस्कृतीचे बलस्थान आहे. त्यामुळे आपण जी भाषा बोलतो ती जोडणारी असावी तोडणारी नसावी, असे डॉ. तारा भवाळकर म्हणाल्या. आपली संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी झालेली निवड ही ज्यांनी केली त्यांचे आभार व कृतज्ञता व्यक्त करुन त्यांनी अध्यक्षपद महत्त्वाचे नाही तर गुणवत्ता महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन केले. मराठी भाषेला संतांनी फार समृद्ध केले व छत्रपती शिवरायांसाठी त्यांनी पाया तयार करुन दिला. आज मराठीला जो अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे, त्यासाठी संत मंडळी व साहित्यिकांनी फार मोठे योगदान दिलेले आहे, असे निवेदन करुन मराठी भाषा व साहित्य कर्तृत्वाने जिवंत राहील यासाठी प्रयत्न करा. भूता परस्परे जडो मैत्र जिवांचे... हा ज्ञानेश्वरांच्या मंत्र आचरणात आणण्याचे आवाहन त्यांनी केले.