बेळगुंदीत आज मराठी साहित्य संमेलनाचा जागर
वार्ताहर/ किणये
बेळगुंदी येथील रवळनाथ पंचक्रोशी साहित्य अकादमी यांच्यावतीने 19 वे बेळगुंदी मराठी साहित्य संमेलन रविवार दि. 2 रोजी आयोजित केले आहे. या संमेलनासाठी बेळगुंदीनगरी सज्ज झाली आहे. संमेलनाच्या माध्यमातून गावात साहित्याचा जागर होणार आहे.
संमेलन चार सत्रांमध्ये होणार आहे. संमेलनाध्यक्षा म्हणून कोल्हापूर येथील पत्रकार व ज्येष्ठ कवयित्री सुजाता पेंडसे उपस्थित राहणार आहेत. सकाळी 8.30 वाजता ग्रंथदिंडीने सुऊवात, त्यानंतर चंदगड येथील आमदार शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. स्वागताध्यक्षा म्हणून भारती सुतार राहणार आहेत. विविध मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात येईल.
यावेळी पालखी पूजन, ग्रंथदिंडी पूजन आदींसह विविध देवदेवतांच्या फोटो प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. संमेलनाच्या पहिल्या सत्रात ग्रंथदिंडीनंतर संमेलनाध्यक्षा सुजाता पेंडसे यांचे भाषण होणार आहे. दुपारी 1 ते 1.30 स्नेहभोजन, दुपारी 1.30 वाजता दुसऱ्या सत्रात महिलांसमोरील आव्हाने या विषयावर सोलापूर येथील डॉ. स्मिता पाटील यांचे व्याख्यान, त्यानंतर मराठी साहित्यातील स्त्री दर्शन या विषयावर डॉ. मनीषा नेसरकर यांचे व्याख्यान होणार आहे.
दुपारी 3 वा. तिसऱ्या सत्रात गोवा येथील कवयित्री चित्रा क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन होणार आहे. यामध्ये उस्मानाबाद येथील कवयित्री शशिकला गुंजाळ, सोलापूर येथील अलका सपकाळ, गोवा येथील प्रकाश क्षीरसागर व दयाताई मित्रगोत्री तसेच उमेश शिरगुप्पे व नवोदित कवींचा सहभाग राहणार आहे.
4.30 वा. चौथ्या सत्रामध्ये रेळे ता. शिराळा येथील ‘आम्ही जिजाऊ बोलतोय’ हा एकपात्री प्रयोग विद्या पाटील सादर करणार आहेत. त्यानंतर ‘गजर कीर्तनाचा : सोहळा आनंदाचा’ हा कार्यक्रम होईल. त्यानंतर हभप गोविंद महाराज शिंदे अहिल्यानगर यांचे कीर्तन निरुपण होणार आहे. सर्वांनी या साहित्य संमेलनाचा लाभ घ्यावा, असे मंडळाच्यावतीने कळविले आहे.