अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना दिलासा! मराठी शिकण्यासाठी मिळणार आणखी वेळ; प्रताप सरनाईकांचं मोठं भाष्य
मुंबई : राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य करण्याच्या मुद्द्यावर आता काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी देण्यात आलेली १५ ऑगस्टची मुदत संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशिक्षणासाठी आणखी वेळ देण्याची तयारी दर्शवली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी हिंदी भाषिकांना आपले भाऊबंद संबोधत त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नसल्याची भूमिका मांडली. त्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी २५ ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेत या विषयावर महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले.
“रिक्षा किंवा टॅक्सी चालकांना अजूनही प्रशिक्षणाची गरज असल्यास त्यांना प्रशिक्षण दिले जाईल. मात्र, मराठी अस्मितेचा आदर करा आणि मराठी शिका,” असे आवाहन प्रताप सरनाईक यांनी केले.
सरनाईक यांच्या माहितीनुसार, आतापर्यंत तब्बल १ लाख ६५ हजार रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे उर्वरित चालकांनाही मराठी शिकण्यासाठी आवश्यक संधी देण्याची सरकारची भूमिका असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मराठी भाषेचा सन्मान राखतानाच अमराठी चालकांवर अन्याय होणार नाही, यासाठी प्रशिक्षणाच्या माध्यमातून मार्ग काढण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे या भूमिकेतून दिसून येत आहे.