For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आरपीडीमध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात

06:35 AM Mar 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
आरपीडीमध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात
Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

साउथ कोकण एज्युकेशन सोसायटी व राणी पार्वती देवी कला आणि वाणिज्य महाविद्यालय, बेळगाव मराठी विभाग यांच्यावतीने मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. प्रारंभी ग्रंथदिंडी झाली. ग्रंथपालखीचे पूजन हेमा व ज्ञानेश कलघटगी यांच्या हस्ते झाले. ग्रंथ पूजन बिंबा नाडकर्णी आणि प्रमुख पाहुणे ज्ञानेश्वर बंडगर यांच्या हस्ते झाले. भजन, ढोलताशा यांच्या गजरात निघालेल्या दिंडीने महाविद्यालय परिसर दणाणून गेला.

पहिल्या सत्रात ज्ञानेश्वर बंडगर यांनी मराठी भाषा आणि संत विचार यावर बोलताना संतांच्या योगदानाचे अनेक दाखले देत अंतर्मुख केले. आपली भाषा आपण टिकविली पाहिजे. आपल्या भाषेचे संवर्धन आपणच केले पाहिजे. मराठी भाषा समृद्ध आहेच पण त्याचे संवर्धन विद्यार्थ्यांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले. अध्यक्षा नाडकर्णी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मराठी भाषेचे सांस्कृतिक व शैक्षणिक महत्त्व अधोरेखित केले आणि तरुण पिढीने मराठीचा अभिमान बाळगावा, असे आवाहन केले.

Advertisement

दुसऱ्या सत्रात पे. डी. पाटील यांनी ‘प्रबोधनातून परिवर्तनाकडे’ या विषयावर विचारमंथन करत समाजपरिवर्तनात भाषेची भूमिका स्पष्ट केली. आपल्या विद्यार्थ्यांनी बहुभाषिक व्हावे पण मराठी भाषेचा जागर कायम करत राहावा, अशी भावना व्यक्त केली.

तिसऱ्या सत्रात आत्माराम पाटील आणि वैशाली पाटील यांच्या विनोदी कार्यक्रमाने उपस्थितांची मनमुराद करमणूक केली. त्यांच्या हलक्या फुलक्या विनोदी शैलीमुळे कार्यक्रमात रंगत आली.

कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींनी सादर केलेल्या स्वागतगीताने झाली. प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख प्रा. परसु गावडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. महादेव खोत व विद्यार्थिनी अनुष्का जाधव यांनी केले. आभार प्रा. लता कणबरकर यांनी मानले. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने मराठी विभागाच्या विद्यार्थ्यांनी झांजपथक, फुगड्या घालत मराठमोळ्या वेशभूषेत येऊन सर्वत्र महाविद्यालय मराठीमय केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एम. एस. कुरणी, प्रा. तृप्ती देसाई, प्रा. एस. एन. देसाई आणि प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.

Advertisement
Tags :

.