युवा समिती सीमाभागवतीने मराठी भाषा गौरव दिन
► प्रतिनिधी/ बेळगाव
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागाच्यावतीने मराठी भाषा गौरव दिन राजहंसगडावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य मूर्तीसमोर मराठीचा सन्मान सोहळा पार पडला. या निमित्ताने मराठी भाषेचा जागर करण्यात आला.
प्रारंभी येळ्ळूर म. ए. समितीचे ज्येष्ठ सदस्य वामनराव पाटील, महेश जुवेकर, धनंजय पाटील, राजू पावले, अशोक घगवे व इतर कार्यकर्त्यांच्या हस्ते गडावरील सिद्धेश्वर मंदिरात पूजा-आरती करण्यात आली. शिवाजी हावळाण्णाचे, खानापूर म. ए. समितीचे गोपाळ पाटील, यल्लाप्पा रेमाण्णाचे, प्रकाश अष्टेकर, लता उघाडे, मनोहर हुंदरे, मोतेश बार्देशकर, निलेश काकतकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. सिद्धाप्पा पुजारी यांनी मंत्रोपचार केला.
कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन नगरसेवक शिवाजी मंडोळकर, खानापूर म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यासह इतर मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी मान्यवरांनी मराठी भाषेचे महत्त्व तसेच व्यवहारातील वाढता वापर याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता उघाडे यांनी केले. मनोहर हुंदरे यांनी आभार मानले. यावेळी इंद्रजीत धामणेकर, रणजीत हावळण्णाचे, बी. एन. मजुकर, दयानंद उघाडे, कृष्णा शहापूरकर, नागेश बोभाटे, श्रीकांत नांदूरकर यासह इतर उपस्थित होते.