मराठी भाषा गौरव दिन विशेष
मराठीला ‘अभिजात दर्जा’ हा अस्मितेचा प्रश्न
अभिजात मराठी भाषा समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर मुळे यांची मुलाखत
कोणतीही भाषा टिकण्यासाठी, तिचे अस्तित्व राखण्यासाठी व्यवहारात तिचा उपयोग सातत्याने व्हायला हवा. ज्येष्ठ भाषातज्ञ गणेश देवी यांच्या मते हवा आणि पाणी यांच्या इतकेच किंबहुना काकणभर अधिक भाषेचे महत्त्व आहे. असे असेल तर हवा आणि पाण्याइतकीच आपल्याला भाषेची गरज आहे, हे लक्षात घेऊन ती टिकविणे ही आपली जबाबदारी ठरते. याच अनुषंगाने मराठी भाषा टिकण्यासाठी, तिला अभिजात दर्जा मिळायला हवा का? यासंदर्भात अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मुळे यांची ही मुलाखत.
एखाद्या भाषेला ‘अभिजात’ हा दर्जा देण्याचे निकष काय आहेत?
अभिजात दर्जा मिळण्यासाठी त्या भाषेला किमान 1500 ते 2 हजार वर्षांचा इतिहास असायला हवा. ती भाषा पुराणकालीन असावी, याचे ऐतिहासिक पुरावे असायला हवेत. त्या भाषेच्या साहित्यिक परंपरा या अस्सल हव्यात. त्या कोणाकडूनही उधार घेतलेल्या नसाव्यात. त्या भाषेला भाषिक आणि वाङ्मयीन परंपरेचे स्वयंभूपण आहे, अशी ती भाषा असावी. प्राचीन भाषा व तिचे आधुनिक रुप यांच्यातील नाते स्पष्ट असायला हवे. म्हणजेच पूर्वी जी अभिजात भाषा होती, ती आज वापरात असेलच असे नाही. परंतु, तिचे आधुनिक भाषेशी नाते मात्र स्पष्ट व्हायला हवे.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी कोणकोणते प्रयत्न झाले?
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी महाराष्ट्र सरकारने रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. समितीने मराठीच्या प्राचीनतेचा अभ्यास करून केंद्र सरकारला 12 जुलै 2013 मध्ये अहवाल सादर केला. साहित्य संमेलनामध्येसुद्धा याचे ठराव झाले. काही तांत्रिक अडचणी दूर करून पुन्हा महाराष्ट्र सरकारने 14 फेब्रुवारी 2024 मध्ये माजी परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे, संजय नहार तसेच महाराष्ट्र राज्य विश्वकोष आणि भाषा सल्लागार समिती यांच्या अध्यक्षांची एक समिती नेमली. आता पुन्हा आम्ही सरकारकडे या भाषेला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी सतत पाठपुरावा करत आहोत.
मराठी भाषेला हा दर्जा अद्याप का मिळाला नाही?
मराठीला ‘अभिजात’ हा दर्जा मिळावा, यासाठी 10 जानेवारी 2012 मध्ये प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. त्यांच्यासह प्रा. हरी नरके आणि अन्य सदस्यांनी बराच पाठपुरावा केला. आपली भाषा अभिजात आहेच, मात्र शासनाकडून या भाषेवर अभिजात अशी मोहोर उमटली तर त्याचे वैश्विक सकारात्मक परिणाम आपल्याला पहायला मिळतील. लोकशाहीमध्ये भाषेला मान्यता देण्याचे एक तंत्र असते, त्या पद्धतीने विचार करता मराठीला हा दर्जा मिळणे तिचा अधिकार आहे. याच संदर्भात जेव्हा सातत्याने पाठपुरावा करण्यात आला, तेव्हा महाराष्ट्राचा प्रस्ताव विचाराधीन आहे, असे उत्तर एकेकाळी मिळाले होते. परंतु, अलीकडे जे निकष केंद्राच्या सांस्कृतिक मंत्रालयाने ठरविले आहेत, त्यांच्या शिफारशीसह अहवाल पाठविला असला तरी आता पुन्हा विलंब होतो आहे. अभिजात श्रेणीचा दर्जा साहित्य अकादमी व भारत सरकारचे सांस्कृतिक मंत्रालय यांच्या निकषावर उतरला तर अभिजात हा दर्जा मिळू शकतो.
अभिजात भाषा दर्जा मिळाल्यास काय फायदा होणार आहे?
प्रथम म्हणजे संपूर्ण भारतीयांना ही भाषा अभिजात (क्लासिकल) भाषा आहे, हे स्पष्ट होईल. 10 कोटींपेक्षा अधिक लोक ही भाषा बोलतात, याची जाणीव पुन्हा अधोरेखित होईल. भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यास दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळतात. ‘सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीज’ स्थापन करण्याचे स्वातंत्र्य मिळते. प्रत्येक विद्यापीठांमध्ये अभिजात भाषेसाठी एक अध्यापन केंद्र स्थापन करतात. मुख्य म्हणजे देशभरामध्ये आणि जगातही मराठी भाषेला सन्मानाचे स्थान मिळू शकते. कारण, एखाद्या भाषेला जेव्हा अभिजात दर्जा मिळतो, तेव्हा त्या भाषेची प्रतिष्ठा वाढते आणि तिच्या श्रेष्ठतेला राजमान्यता मिळून तिच्या विकासासाठी अधिक प्रयत्न केले जातात.
आज दुर्दैवाने मराठीमध्ये व्यवहार कमी होत आहेत. अशावेळी अभिजात दर्जा कसा मिळेल?
दुर्दैवाने हे वास्तव आहे. पण त्यासाठी तीन घटक महत्त्वाचे आहेत. महाराष्ट्रातील समग्र राजकीय पक्ष ज्यामध्ये मंत्री, आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी या सर्वांनी मोठ्या प्रमाणात मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी मोहीम आखायला हवी. दुसरे म्हणजे दिल्लीत असणाऱ्या तमाम मराठी अधिकाऱ्यांनी सांस्कृतिक मंत्रालय, पंतप्रधान कार्यालय व शासन व्यवस्था यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करायला हवा. तिसरे म्हणजे सर्व साहित्यिक मंडळी, वृत्तपत्र, सोशल मीडिया आणि तमाम माध्यमातील सर्वांनीच आपल्यापरीने या मोहिमेला बळ द्यायला हवे. सध्या मराठीला अभिजात दर्जा मिळण्यासाठी मोहीम सुरू करणे, ही अतिशय योग्य वेळ आहे. येत्या काळात होणाऱ्या राजकीय घडामोडी लक्षात घेता जर तमाम मराठी भाषिकांनी यासाठी प्रयत्न केले तर त्याचा निश्चित उपयोग होणार आहे. जनतेचा दबाव, राजकीय पक्षांचा पाठपुरावा आणि अधिकाऱ्यांचे प्रयत्न असे तीनही घटक एकाचवेळी कार्यरत झाले तर लवकरात लवकर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल.
मराठीमध्ये व्यवहार अधिक होण्यासाठी आपण काय करू शकतो?
आज दुर्दैवाने महाराष्ट्रात इंग्रजीपुढे आपण शरणागत होतो की काय? अशी परिस्थिती आहे. या शरणागतीमुळे मराठी शाळांकडे, मराठी संस्थांकडे शासनाचे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. महाराष्ट्रातील मराठी माणूस आणि महाराष्ट्राबाहेरील मराठी समुदाय यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. या सर्वांना एकत्र आणणे आणि मराठी शाळांचे अस्तित्व टिकण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे. तरुणाईला यामध्ये सामावून घेत सामाजिक माध्यमांचा उपयोग वाढवायला हवा. मराठी भाषेचे महत्त्व या तरुणाईला पटवून देत समाजमाध्यमे हाताळण्यासाठी त्यांचा उपयोग करून घ्यायला हवा.
यानिमित्ताने मराठी भाषिकांना काय सांगाल?
आपली भाषा अभिजात आहेच. ती नाकारण्याचे कारण नाही. पण शासकीय पातळीवर तिला अभिजात दर्जा मिळायला हवा. याबाबत आपण आग्रही असायला हवे. कारण हा आपल्या अस्मितेचा मुद्दा आहे. मराठी अस्मितेचा हा प्रश्न असल्याने राजकीय व्यक्ती आणि मराठी भाषिक जनता यांनी त्यासाठी प्रयत्न करणे, शासनाकडे पाठपुरावा करणे, व्यवहारात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करणे हे महत्त्वाचे आहे. किंबहुना ते आपले कर्तव्य आहे.
मराठी भाषा... लेखक काय म्हणतात?
मराठी भाषा टिकण्यासाठी प्राध्यापक, शिक्षक, लेखक यांची जबाबदारी अधिक आहे. मुलांच्या हातातून मोबाईल काढून त्यांच्या हातात पुस्तक देण्यासाठी प्रथम पालकांनी वाचन करणे आवश्यक आहे. ठरावीक लेखकाचे वाचन करा, असे बिंबवण्याची गरज नाही. एकदा वाचनाची सवय लागली की नेमके काय वाचायला हवे, याचे अचूक आकलन मुलांना नक्कीच होते. पण आधी त्यांच्या हातात पुस्तके तर दिसू द्या. या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत, बेळगावच्या काही साहित्यिकांनी. हे साहित्यिक आपल्यापरीने लेखन करतात, ते मुलांपर्यंत पोहोचावे, यासाठी प्रयत्नही करतात. आजच्या मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने हे साहित्यिक लेखनाकडे कसे वळले? मुलांनी कोणती पुस्तके वाचावीत? असे त्यांना वाटते. याबाबत त्यांच्याशी केलेला हा संवाद.
सरकारी पातळीवर अनास्था चिंताजनक : डॉ. संध्या देशपांडे
आरपीडी व जीएसएस कॉलेजमध्ये मराठीच्या प्राध्यापक म्हणून काम केलेल्या डॉ. संध्या देशपांडे लेखिका आहेतच. परंतु, त्या अधिक रमतात नाट्याक्षेत्रामध्ये. 30 ते 35 हून अधिक पुरस्कार त्यांच्या नावे जमा असून अनेक नाटके त्यांनी लिहिली आहेत. परंतु, काही महत्त्वाच्या विषयावर कादंबरी लेखनही केले आहे. त्या म्हणाल्या, माझ्या लेखनाची सुरुवात बालनाट्यापासून झाली. कारण तेव्हा बालनाट्या कमी होती. बेळगावमध्ये मुलांसाठी नाटक करायचे ठरविल्यानंतर ‘रंगरंगिले छैलछबिले’ हे नाटक मला गवसले. परंतु, पुन्हा शोध घेतला तेव्हा फारसे हाती न लागल्याने मी स्वत:च ‘अबकडई, ‘पक्षीतीर्थ’, ‘पंडोरानी उघडला बॉक्स’ यासह अनेक नाटके लिहिली.
► एड्सबाबतही पथनाट्या लिहिण्याची गरज का भासली?
या प्रश्नावर एड्स तेव्हा वेगाने पसरत होता. त्यामुळे मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी याबाबत जागृती करणे आवश्यक आहे, असे ठरवून अभ्यास केला आणि त्यावरच पथनाट्या लिहिले. त्याचा पहिला प्रयोग कुलू-मनालीमध्ये केला आणि कर्नाटक, गोवा, महाराष्ट्रासह 500 प्रयोग केले. ‘मुलगी झाली हो’ या नाटकाचे बेळगावमध्ये प्रयोग करण्याचे ठरले. तेव्हा त्याचे नाट्यादिग्दर्शनही मी केले, असे त्या म्हणाल्या.
नाट्यालेखनातून कादंबरी लेखनाकडे कशा वळलात? याचे उत्तर देताना ‘अश्वदा’ हे नाटकच लिहायचे होते. त्याचा फॉर्म संगीत नाटकाचा असेच ठरविले होते. परंतु, लिहिताना त्याचा आवाका कादंबरीचाच असल्याचे लक्षात आले. तसेच ‘सुलतान’ ही एका वेगळ्याच विषयाची कादंबरी लिहिली. कारण नातेसंबंध काय आहेत? आणि ते कसे बदलतात? हा विषय विचार करण्याजोगा वाटतो. प्रसिद्ध गायिका गंगुबाई हनगल 95 व्या वर्षी बेळगावला आल्या होत्या. त्यांची गायनशैली एकीकडे असली तरी त्यांचे व्यक्तिमत्त्व वेगळेच होते. त्यांच्यावर मराठीमध्ये चरित्र नाही. म्हणून आपण चरित्र लेखन केले. बसवाण्णा यांच्यावर एक अनुवाद केला. ‘स्वप्न सारस्वत’ याचे लेखन केले. आगामी अष्टवक्राच्या तत्त्वज्ञानावर लेखन करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. असे असूनही मराठी मागे का पडते आहे? या प्रश्नावर मराठी शाळा बंद होणे, मराठमोळ्या चित्रपटांचे हिंदीकरण होणे, प्रस्थापितांनी इंग्रजीकरणाकडे वळणे, सरकारी पातळीवरील अनास्था ही कारणे असू शकतात. परंतु, ग्रामीण भागातील तरुण लेखक खूप चांगली मांडणी करत पुढे येत आहेत. ही मुले वाचत आहेत, लिहित आहेत. त्याचा दर्जा हा वेगळा मुद्दा आहे. परंतु, लेखनाकडे त्यांचे वळणे हे खूप आशादायी आहे. ही मुले ग्रामीण भागातून शहरात आल्यावर मात्र त्यांची भूमिका बदलण्याची भीती मला वाटते.
► मराठीला अभिजात दर्जा हवा का?
जी भाषा ज्ञानेश्वरांनी, तुकारामांनी आपली मानली, तिला अभिजात दर्जा कोणी कशासाठी द्यावा, ती अभिजातच आहे. प्रश्न ती वाचविण्याचा आहे. त्यासाठी ढिगाने संमेलने करून काहीही होणार नाही. मराठी शिक्षक आणि प्राध्यापक यांचे वाचन आणि लेखन वाढविण्यासाठी प्रयत्न व्हावेत. त्यांचे संमेलन व्हायला हवे. आम्ही शाळेतील मराठीवरच पोसलो, हेसुद्धा शिक्षकांनी लक्षात घ्यावे.
► तुमचे आवडते पुस्तक आणि आजच्या पिढीने वाचावी, अशी पुस्तके कोणती?
या प्रश्नावर ‘दासबोध’ हे आपले आवडते पुस्तक आहे. वयाची अट न ठेवता कोणीही, कोणत्याही वेळी वाचावे, असे हे पुस्तक आहे. ‘ज्ञानेश्वरी’च्या तुलनेमध्ये दासबोध आकलनाच्यादृष्टीने अधिक सोपा आहे. वाचनाची गोडी हवी तर अनिल बर्वेचे कोणतेही पुस्तक वाचावे. व. पु. काळेही वाचावेत. विशाखा, रसयात्रा ही पुस्तके महत्त्वाची आहेत. पुलं तर सदाबहार आहेत. अलीकडे वाचलेल्या पुस्तकांमध्ये ‘भिजलेल्या काळाचे अवशेष’ ही निरजाची कादंबरी वाचनीय आहे. कादंबरीची वेगळी परंपरा यानिमित्ताने वृद्धिंगत होईल. स्मिता दातार यांची ‘फक्त तिच्यासाठी’ वसंत लिमये यांची ‘टार्गेट असद शहा’, लॉक ग्रिफिल, विवस्त या कादंबऱ्या उत्कृष्ट आहेत. नवे लेखक चांगले आणि जबाबदारीने लिहित आहेत. मुलांनी सुरुवातीला तरी अशा कथा वाचाव्यात. चि. वि. जोशी, अरविंद गोखले, गंगाधर गाडगीळ, पु. भा. भावे, विभावरी शिरुरकर, कुसुमावती देशपांडे यांनी जे मराठी साहित्य समृद्ध केले आहे, ते एकदा नजरेखालून तरी घालायला हवे. या वाचनातूनच आलेली परिपक्वता काय वाचावे? हे कळण्यासाठी उपयोगी होईल.
लेखनिक नकोत, साहित्यिक हवेत : मेधा मराठे
नाटक, कथा, अनुवाद, बालनाट्या असे अनेक प्रकार मेधा मराठे यांनी हाताळले आहेत. आपल्यावर वाचनाचे किंवा लेखनाचे संस्कार वडिलांच्यामुळे झाले. कारण वडील संस्कृतचे प्राध्यापक होते. ते संस्कृत नाटकात काम करायचे, असे त्या म्हणाल्या. प्रारंभी एकांकिका लिहिल्या. परंतु, सर्वच कथाबीजांची एकांकिका होऊ शकत नाही, हे लक्षात आल्याने कथा लिहिण्यास प्रारंभ केला. प्रा. अनंत मनोहर लेखनामध्ये सातत्य हवे, असे सतत सांगत. परंतु, आपण फार उशिरा त्यांचे म्हणणे मनावर घेतले, अशी प्रांजल कबुलीही त्या देतात. लेखनाची सुरुवात कशी झाली? या प्रश्नावर दीर्घकाळाचे आजारपण आल्यानंतर वेळ जावा म्हणून ‘रिडर्स डायजेस्ट’ वाचत असताना त्यातील एका गोष्टीने लक्ष वेधले आणि तिचा हितोपदेश या पद्धतीने त्याचा अनुवाद आपण केला. हळूहळू मुलांसाठी एकांकिका लिहिल्या. बालनाट्या स्पर्धेसाठी ‘मनातल्या अंधाराची ऐशीतैशी’, ‘पुतळे झाली माणसे’, ‘घुसमट’ या बालनाट्यांचे लेखन केले. यातील ‘पुतळे झाली माणसे’ याला मुक्त संवाद इंदूरचा लेखनाचा पहिला क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. विनय आपटे स्मृतीप्रित्यर्थ झालेल्या एकांकिका स्पर्धेत ‘कुक्कूचुक्कू’ लेखनाचा पहिला व सोलापूरच्या अखिल भारतीय नाट्या परिषदेच्या लेखन स्पर्धेत याच एकांकिकेला दुसरे बक्षीस मिळाले. त्यानंतर ‘सायबर क्राईम सेक्शन-11’ ही मणिपूर आणि सायबर क्राईम विश्व यावर एकांकिका लिहिली. तिला हट्टंगडी पुरस्कार स्पर्धेसाठी नामांकन मिळाले.
► परंतु, आपण लिहायला हवे, असे कधी जाणवले? किंवा पहिले पुस्तक कोणते वाचले?
मी रत्नागिरीची. तेथे मनपाची लायब्ररी होती. त्या लायब्रारीतूनच ‘ला मिझराब्ल’ हे फ्रेंच राज्यक्रांतीची पार्श्वभूमी सांगणारे पुस्तक मी वयाच्या बाराव्या वर्षी वाचले. पण आजही त्या पुस्तकाने माझ्या मनात घर केले आहे. ब्रेडची चोरी केलेल्या चोराची आणि त्याचा पाठपुरावा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची गोष्ट यामध्ये आहे. त्या काळात भा. रा. भागवत यांची पुस्तके वाचली. ‘गुड अर्थ’, डॉ. गो. के. भट यांचे ‘नाट्यासौंदर्य’, ‘फास्टर फेणे’ अशी अनेक पुस्तके त्या काळात वाचून झाली.
► मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा का? बोलीभाषेचे महत्त्व किती आहे?
इतिहासाचा अर्थ लावायचा असल्यास दोन्ही भाषांचे महत्त्व तितकेच आहे. परिस्थिती, प्रदेश यानुसार भाषा बदलत जाणार. पण अभिजात भाषा जाणल्यास बोलीभाषेचा अधिक चांगल्याप्रकारे अभ्यास होईल.
► पुढील पिढीपर्यंत साहित्य पोहोचणार कसे?
पुढील पिढीला साहित्य पोहोचविणे ही आपली जबाबदारी आहे. मुलांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. अन्यथा लेखनिक एवढाच दर्जा शिल्लक उरेल. म्हणूनच मुलांनी वाचण्याआधी चांगले ऐकण्याची गरज आहे. यासाठी माझ्यापुरता एक उपक्रम मी लवकरच राबविणार आहे. फार मोठे त्याचे स्वरुप नसले तरी आपण काय करू शकतो? हा विचार करून माझा खारीचा वाटा मी उचलणार आहे.
बेरोजगारीचा भाषेवर परिणाम : द. तु. पाटील
बेळगावचे लेखक द. तु. पाटील हे स्वांतसुखाय, गर्दीत न रमता लेखन करणारे लेखक आहेत. त्यांच्या लेखन प्रवासाबद्दल जाणून घेताना आपण लिहू शकतो, ही जाणीव विद्यार्थीदशेमध्ये एम.ए.ला असताना झाली. पण त्यावेळी लगेच लेखनाकडे वळता आले नाही, असे ते म्हणाले. पहिल्या लेखन प्रवासाबद्दल ते म्हणाले, कथा, कादंबरी, नाटक, कविता यासह इतर वाङ्मयही वाचून झाले होते. महात्मा फुले, महर्षी वि. रा. शिंदे अशा विचारवंतांचे साहित्य तसेच वा. ल. कुलकर्णींपासून गो. मा. पवार, गो. म. कुलकर्णी, भालचंद्र नेमाडे, सुधीर रसाळ, रा. ग. जाधव यांचे समीक्षा लेखन वाचल्याने साहित्याबद्दल बऱ्यापैकी समज आली. आनंद यादव यांच्या ‘गोतावळा’ कादंबरीने अनेक प्रश्न उपस्थित केले. या कादंबरीने वाचकच नव्हे तर समीक्षकांनाही चकवा दिला आहे. ही कादंबरी वाचकांचा अनुनय करणारी, स्वप्नरंजनात्मक आहे, असा माझा पक्का समज झाला आणि त्याच्या मर्यादा दाखवणारा लेख नवभारतकडे पाठवला. तो प्रकाशित झाला. वसंत पळशीकर, सीताराम रायकर यांना तो आवडला आणि कौतुकास पात्र ठरला.
लेखनासाठी प्रेरणा मिळाली की स्वत:च घडलात?
या प्रश्नावर विद्यार्थीदशेत डॉ. गो. मा. पवार यांचे मार्गदर्शन लाभले. ते सतत लिही म्हणायचे. त्यांच्यामुळे साहित्यमूल्ये समजून घेऊन अभिरुचीची जडणघडण झाली. कुणाचाही परिचय नसताना मौज दिवाळी अंकासाठी ‘तड’ नावाची कथा पाठवून दिली. तत्कालिन संपादक श्रीनिवास कुलकर्णी यांनी ती आवडल्याचे सांगितले व ती प्रसिद्धही झाली. त्यांच्या आग्रहाने कादंबरी लिहिली. ती ‘चैत’ नावाने प्रसिद्ध झाली. आजची पिढी वाचन करते आहे की वाचनापासून दुरावली आहे का तिचे माध्यम बदलले आहे? या आपल्या प्रश्नामध्ये तीन उत्तरे असून प्रत्येक उत्तर होय असेच आहे. असे नमूद करत तरुण वाचत नाहीत म्हणणे अन्यायकारक ठरेल. विद्यार्थी कोणती पुस्तके वाचू म्हणून विचारायला येत. गेल्याच वर्षी गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ वाचल्याचे एका विद्यार्थिनीने सांगितले. कॉलेजच्या भित्तीपत्रकामध्ये, स्मरणिकेमध्ये विद्यार्थी लिहिण्याचा प्रयत्न करत आहेत. निबंधलेखन, काव्यवाचन, वक्तृत्त्व स्पर्धा यात सहभागी होत आहेत. त्यासाठी वाचनाची आवश्यकता असते. तंत्रज्ञानामुळे त्यांच्या हातातील साधन बदलले. परंतु, त्यावरही वाचन करणारे विद्यार्थी आहेतच. वाचनाचे माध्यम बदलले तरी त्या माध्यमाचा वापर करणारा तरुण हा शहरातील मध्यम व उच्चमध्यम वर्गापुरता मर्यादित आहे. परंतु, तरुणपिढी वाचनापासून दुरावत आहे, हे नाकारता येणार नाही. तरुण शिकतो ते नोकरीसाठी, उदरनिर्वाहाचे साधन मिळण्यासाठी. परंतु, तीच समस्या आज उग्र झाली आहे. त्यातून तरुणाईची दिशा बदलते आहे. हे खूप वेदनादायक आहे. तरुणाईला मराठी भाषा आणि वाचन याकडे वळविण्यासाठी सरकारी पातळीवर त्याचबरोबर सामाजिक संस्था, शिक्षण संस्था यांनीही प्रयत्न करायला हवेत. सीमाभागात असे प्रयत्न सुरू आहेत, हे महत्त्वाचे, असे ते म्हणाले. आपल्यावर प्रभाव टाकणारे पुस्तक म्हणजे नेमाडे यांची ‘कोसला’ कादंबरी, असे सांगून ‘शामची आई’, ‘माणदेशी माणसं’, ‘एक होता कार्व्हर’, ‘डोह’ व ‘माझ्या बापाची पेंड’ ही पुस्तके मुलांनी वाचावीत. असे सुचवतानाच लेखक म्हणून आपण एखादा उपक्रम राबविण्याबाबत विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले.
भाषेचे प्रेम निरंतर हवे : डॉ. विनोद गायकवाड
मराठी भाषा टिकण्यासाठी प्रथम शिक्षकांमध्ये त्या भाषेचे प्रेम निरंतर रहावे यासाठी प्रयत्न करायला हवेत. शिक्षक, प्राध्यापक काय वाचत आहेत? याचा आढावा घ्यायला हवा. कारण मुलांना वाचनाची आवड लावण्यामध्ये आणि मराठी भाषा टिकविण्यामध्ये या घटकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे विनोद गायकवाड यांना वाटते. आपला लेखन प्रवास सांगताना मांजरी या गावी सातवीत असताना ‘शिवा रामोशी’ नाटक पाहिले, ते पाहून ‘वीर सूर्याजी’ हे नाटक लिहिण्याचा आपण प्रयत्न केला, असे ते म्हणाले. पुढे मुलाचा छळ करणाऱ्या आईवर ‘योगी’ कादंबरी लिहिली. परंतु, साने गुरुजींच्या आईच्या प्रतिमेला धक्का बसणारी ही कादंबरी असल्याने कोणीच ती छापली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. लहान गावातून आल्यामुळे मी खूप एकलकोंडा होतो आणि बोलण्यापेक्षा लिहिण्यावर माझा भर होता, असे ते म्हणाले.
त्यावेळी कृष्णा नदीत आढळून आलेले एक प्रेत पाहून एक रहस्यकथा लिहिली. जी सातारा येथील गुन्हेगार मासिकामध्ये प्रसिद्ध झाली. त्याचे विलक्षण अप्रुप वाटले आणि मग वेगवेगळ्या विषयांवर लेखन सुरू केले. बेळगावमध्ये चित्रकला शिक्षक आणि नोकरीनिमित्त अनेक ठिकाणी भ्रमंती झाली तरी वाचन आणि लेखन याकडे दुर्लक्ष केले नाही. बेळगावमध्ये तर नाथ पै सर्कलपासून बेननस्मिथपर्यंत चालत येऊन शिक्षण घेतले. परिस्थिती न खचता लढण्याचे बळ वाचनानेच दिले, असेही त्यांनी सांगितले. आज जवळजवळ 54 कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या आहेत. लष्करी जीवनावर ‘वहिनी’, तमाशाच्या जीवनावर ‘जास्वंदी’ अशा कथाही लिहिल्या. ‘साई’ ही कादंबरी आज सहा भाषांमध्ये अनुवादित झाली आहे. परंतु, ही कादंबरी लिहिताना मी भक्त नव्हतो तर फक्त लेखक होतो, असे त्यांनी स्पष्ट केले. ‘युगान्त’ या कादंबरीची मराठीमध्ये आज तिसरी आवृत्ती निघते आहे. तमिळ आणि हिंदीमध्ये ती अनुवादित झाली आहे. अलीकडेच ‘मिडलक्लास’ या कादंबरीलाही त्यांना पुरस्कार मिळाला आहे.
मराठी टिकण्याबाबत मुलांच्या हातून मोबाईल काढून घेण्याचे कौशल्य पालकांनी आत्मसात करणे आवश्यक आहे. पालकच सतत मोबाईलमध्ये असले तर मुलांकडून वाचनाची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. बहुसंख्य शिक्षकांमध्येसुद्धा वाचनाबद्दल अनास्था आहे. शाळांमध्ये कवितेचे वर्ग संपले आहेत. या सगळ्याचा गांभीर्याने विचार करून शिक्षक, प्राध्यापकांनाच एकत्र आणणे त्यांना आवश्यक वाटते. आपले आवडते पुस्तक म्हणजे निवडक रवींद्र पिंगे. कारण त्यांचे लेखन मला आवडते. तर मुलांनी वाचावीत अशी पाच पुस्तके म्हणजे, रामायण, महाभारत, शिवचरित्र, माझी जन्मठेप, मराठी वाङ्मयाचा इतिहास ही होत, असे त्यांनी नमूद केले.
-मनीषा सुभेदार, बेळगाव