मराठी भाषा गौरव दिन विशेष
मातृभाषेतून शिक्षण हा आग्रह हवा
मातृभाषेतूनच शिक्षण द्यायला हवे, असे केवळ व्यासपीठावरून त्यांनी सांगितले नाही. मराठी महत्त्वाची असे चर्चासत्रापुरते त्या बोलल्या नाहीत. तर प्रत्यक्षात विचारापाठोपाठ कृतीशील पावले उचलत त्यांनी आपल्या मुलांना हेतूत: मराठी माध्यमाच्या शाळेत घातले. आज त्यांच्या मुलांची मराठी भाषा उत्तम आहे. तितकीच इंग्रजी भाषासुद्धा ते उत्तम बोलतात. दोन भाषा भगिनींमध्ये असा हृद्य पूल बांधला आहे प्रसिद्ध अभिनेत्री आणि मराठी शाळांच्या सदिच्छा दूत चिन्मयी सुमित यांनी. मुंबईमधील मराठी शाळांच्या सदिच्छा दूत म्हणून काम करताना या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या वाढावी, मराठी शाळा टिकाव्यात, यासाठी आपल्या अभिनयाच्या कामाइतक्याच तळमळीने त्या हे काम करतात. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी भाषा, तिला मिळालेला अभिजात दर्जा, मराठी शाळांची परिस्थिती, प्रमाण व बोली भाषा अशा विविध प्रश्नांसह त्यांची घेतलेली ही मुलाखत....
► मातृभाषेतून शिक्षण घेणे किती आवश्यक आहे?
परम आवश्यक आहे. अनिवार्य आहे. आपण आताचा जो काळ पाहतो म्हणजे भाजीपाल्यासह अनेक वस्तू आपल्याला सेंद्रिय म्हणजेच कोणतेही कीटकनाशक न फवारलेल्या, सकस आणि पोषक हव्या आहेत. हेच मातृभाषेच्या शिक्षणाबाबत म्हणता येईल. मातृभाषेतून शिक्षण घेण्याचे फायदे अनेक आहेत. या भाषेतून शिक्षण घेऊनही आपला विकास सहजशक्य आहे.
►मराठी शिक्षक आणि पालक यांना मराठी शाळांबद्दल अनास्था आहे का?
शिक्षकांना अनास्था नाही. पालकांना असू शकते. माझ्या पिढीच्या लोकांचं हे नाकर्तेपण आहे की आपण मराठी शाळांसाठी आवर्जून काही केले नाही. त्याचे मार्केटिंगही केले नाही. आपला आळशीपणा आपल्याला नडला. दुसरीकडे इंग्रजी भाषेमध्ये शिक्षण नाही तर विकासच नाही, हे पद्धतशीरपणे पसरवले गेले. धनदांडग्या लोकांनी शिक्षण हा व्यवसाय केला. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळांनी याच शाळांमध्ये शिक्षण घेऊन प्रगती साध्य, असे बिंबवले. वरचा वर्ग जे करतो तेच खालच्या वर्गापर्यंत पद्धतशीरपणे झिरपत येते. पालकांना हेच शिक्षण महत्त्वाचे असे वाटू लागले. याच माध्यमात शिकल्याने नोकरी मिळणार, असा समजही झाला.
एक लक्षात घ्यायला हवे, इंग्रजी माध्यमात शिकणे व इंग्रजी येणे यामध्ये फरक आहे. जगातील उत्तमोत्तम ज्ञानसुद्धा इंग्रजी भाषेत रूपांतरित झाले आहे. संभाषण हाच मुद्दा असेल तर आपल्या स्वप्नांची, विचारांची भाषा कोणती आहे? तर ती मराठी आहे व शिक्षणाची भाषासुद्धा मराठी असेल तेव्हा त्याचे आकलनही सोपे जाते. घरात जी भाषा बोलली जाते, जी मुलांची मातृभाषा आहे, त्याच भाषेच्या शाळेमध्ये मूल जाते. तेव्हा त्या भाषेची त्याला पूर्वओळख झालेली असते. त्यामुळे शाळेमध्ये अधिक विस्ताराने ते मूल शिकत जाते. हे शिक्षण अत्यंत मोकळे आणि नैसर्गिक असते.
इंग्रजी माध्यमाच्या शाळेत बोलणे, लिहिणे, वाचणे एकाचवेळी करावे लागते आणि मग त्याचा ताण मुलांवर येतो. इंग्रजी संभाषण येण्याची गरज पालकांना वाटते. इंग्रजी हा मुद्दा नाही. संभाषण हा मुद्दा आहे. जेव्हा विचार, भावना यांची ओळख स्पष्ट असते. स्वप्नांची भाषा, व्यक्त होण्याची भाषा एकच असते. तेव्हा संभाषण उत्तम होते. भावना, विचार आणि शिक्षण यांची भाषा एकच असल्याने त्या माध्यमात शिकताना एक सुसूत्रता येते. मराठी शाळांमध्येसुद्धा इंग्रजी भाषा शिकवली जाते. त्यामुळे संभाषण हा फार बाऊ करण्याचा मुद्दाच नाही. मराठी शाळेतील शिक्षक आजही मातृभाषा व संभाषण भाषा यासाठी प्रचंड धडपड करतात. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षक मराठीचा आग्रह धरतात, हे नाकारता येणार नाही.
► प्रमाण आणि बोली भाषांमध्ये फरक का केला जातो?
आपल्याला वर्गवारी करून शिक्के मारण्याची घाई असते. लहान-मोठे ठरवण्याची सुद्धा घाई असते. बोली भाषेमध्ये सर्व शब्दांची सरमिसळ आहे. तिला स्वत:चे व्यक्तिमत्त्व आहे. आमच्या पिढीने काही प्रवाद मानले. परंतु, आजची तरुण पिढी ही जास्त मोकळा विचार करते. हास्यजत्रासारख्या अत्यंत दर्जेदार कार्यक्रमामध्ये सातत्याने निरनिराळ्या बोली भाषा वापरल्या जातात. आजची पिढी त्याचा सहज स्वीकार करते. त्यामुळे हा फरक हळूहळू कमी होईल. त्यातील दरी संपुष्टात येईल, अशी मला आशा आहे.
► शिक्षकांना अशैक्षणिक कामे दिल्याने त्यांचे शिकवण्याकडे दुर्लक्ष होते का?
नाही. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षक खूप चांगले काम करतात. या शिक्षकांवर खूप कामे आहेत. म्हणून ते शिकवण्यामध्ये कुचराई करतात, असे मानता येणार नाही. आपण सरसकटीकरण फार पटकन् करतो. व्यक्तिमत्त्व विकासासाठीसुद्धा हे शिक्षक काम करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांची कृतज्ञ नोंद आपण ठेवायला हवी.
► बहुजन समाज शिक्षण क्षेत्रात आला म्हणून दर्जा खालावला, असा आक्षेप घेतला जातो. काय सांगाल?
बहुजन वर्ग येतो आहे, ही स्वागतार्ह बाब आहे. हा वर्ग येताना आपली संस्कृती, आपली भाषा, बोली भाषा घेऊनच येणार. ते नाकारता येणार नाही. दुसरीकडे जेव्हा तुम्ही मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालता, तेव्हा हे सर्व निकष लावता का? काही गोष्टी आपण गृहितच धरल्या आहेत. त्या बदलायला हव्यात.
►मराठी भाषेला मिळालेल्या अभिजात दर्जाने काय साध्य होईल?
हा दर्जा मिळाल्याचा आनंद आहेच. परंतु, त्यामुळे जनसामान्यांना फारसा फरक पडेल असे वाटत नाही. सरकार दरबारी काही गोष्टी बदलतील. कदाचित या दर्जामुळे भाषिक वातावरण, एक पर्यावरण निर्माण होईल. जर भाषाप्रेमी, कलाकार, धोरणकर्ते, सरकार, संघटना यांनी एकत्र येऊन काम केले तर मराठी भाषेसाठीचे एक सकारात्मक चित्र तयार होईल. पण एकत्र येणे ही अवघड गोष्ट सोपी करायला हवी.
►आज मराठी शाळा कमी होत आहेत. विद्यार्थ्यांची संख्या घटत आहे, हे दुष्टचक्र आपण कसे भेदायचे?
तुम्ही ऐवजी आपण म्हणाला, हे खूप महत्त्वाचे वाटते. सरकार दरबारी जी धोरणे आखली जातात, ती राबविणारी यंत्रणा आपण असतो. मग आम्हालाच योजना अशा हव्यात, अशी मागणी करण्याचे सामर्थ्य आपल्यामध्ये यायला हवे. वेगवेगळ्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो. माझ्या कुवतीप्रमाणे माझ्या इमारतीमध्ये माझ्या रंगमंचाचा वापर करून मी जर मराठी भाषा आणि मराठी शाळा यांच्यासाठी प्रचार-प्रसार करू शकले तर चित्र पालटेल, हा विचार प्रत्येकाने केला व आपल्या परिसरामध्ये जागृती केली तर बदल होईल. संस्थात्मकदृष्ट्या जेव्हा मागणीचा रेटा वाढतो, तेव्हा धोरणे बदलली जातात. महत्त्वाचे म्हणजे केवळ समजूत करून घेऊन भाषेपासून दूर जाण्यापेक्षा मातृभाषेतून शिक्षण मिळणाऱ्या शाळेमध्ये मुलांना घालण्याचे धाडस करून तरी पहा. या भाषेतून शिकल्यानंतरही रोजगाराच्या, अर्थार्जनाच्या हजारो संधी उपलब्ध आहेत. मुळात आपली मानसिकता बदलण्याची गरज अधिक आहे.
►वाढत असलेली साहित्य संमेलनांची संख्या मराठी भाषेसाठी पूरक ठरेल का?
आपण याकडेही वेगळ्या पद्धतीने पाहूया. संमेलनामध्ये एकगठ्ठा पुस्तके पहायला मिळतात. निदान ती डोळ्याखालून घालता येतात. कृतीची सुरुवात विचाराने होते. एक वातावरण निश्चित निर्माण होते. साहित्य, वाङ्मय यांचा पैस मोठा आहे. त्यामध्ये चालीरीती, वातावरण याबद्दल बोलले जावे. निदान चर्चा तरी सुरू व्हाव्यात. मात्र, साहित्य संमेलने मोजकीच असावीत. भावना आणि संवेदनांना आवाहन करणे हे कलाकाराचे आणि साहित्यिकांचे कर्तव्यच आहे.
मराठी हि चळवळ व्हावी
मराठी ही मातृभाषा असली तरी इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे, असा समज करून पालकांनी आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत घातले. परंतु, मराठी भाषेपासून, मराठी संस्कृतीपासून त्यांची नाळ तुटावी, असे त्यांना कधीच वाटले नाही. मराठी भाषा, तिचे सौंदर्य याची कल्पना पालकांना आहे. तथापि, जागतिकीकरणाच्या रेट्यात रोजगारासाठी इंग्रजी उपयोगी ठरते, असे वातावरण निर्माण झाल्याने पालकांचीही गोची झाली. याचाच विचार करून इंग्रजी शाळेतील मुलांना मराठी भाषेची गोडी लागावी, या हेतूने मराठी साहित्य केंद्र, पुणेची स्थापना करण्यात आली. लोकमान्य सोसायटीच्या सहकार्याने स्थापन झालेल्या या केंद्राचे चेअरमन डॉ. किरण ठाकुर असून अद्वैता उमराणीकर या उपप्रमुख व शिरीष फडतरे हे मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत.
लोकमान्य सोसायटीने आपल्या सामाजिक बांधिलकीच्या म्हणजेच सीएसआर उपक्रमातून खानापूर तालुक्यातील काही खेडी दत्तक घेतली. खेड्यासह याशिवाय कर्नाटकातील मुलांना कानडी भाषेत शिकावे लागते. त्यामुळे मराठी भाषेपासून ती दूर जातात व हिंदीमिश्रित मराठीमध्ये ते बोलतात. या मुलांना मराठी शुद्ध बोलता यावे, संस्कारातून, श्लोकातून त्यांना मराठीचा परिचय व्हावा म्हणून बोलीभाषा शिकवणे आवश्यक आहे.
हिंदी संचालनालयातर्फे जशा हिंदीच्या पाच परीक्षा देता येतात, तशाच परीक्षा आता या मराठी केंद्रातर्फे घेण्यात येतील. या मुलांच्या बरोबरच जे जे परप्रांतीय आहेत, ज्यांना संवाद साधताना मराठी भाषेची गरज भासते. अशा सर्वांनासुद्धा या परीक्षा देता येतील. त्यांना जी पुस्तके दिली जातील, ती पुस्तके वाचणे भाग असणार आहे. अन्यथा त्यांना साहित्य कळणारच नाही. वाचनाबरोबरच ऐकणेही महत्त्वाचे आहे. सतत ऐकल्याने भाषा लवकर कळते. म्हणून ऑडिओ पद्धतीनेसुद्धा शिक्षण दिले जाणार आहे आणि लेखनाचा सरावही करून घेतला जाणार आहे.
मुलांपर्यंत हे सर्व पोहोचण्याआधी शिक्षकांना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. शिक्षक किती वाचतात? हे तपासले जाईल. त्यांना वाचनासाठी प्रोत्साहित केले जाईल. कारण, विरामाची चिन्हे कुठे वापरावीत, हेसुद्धा शिकविणे आज आवश्यक झाले आहे. यासाठी सावित्रीबाई फुले विद्यापीठाने मान्यता दर्शवली असून पुण्यातील प्राच्चविद्या भांडारकर संस्थेतर्फे प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे.
बेळगावमध्ये या उपक्रमाचा पहिला टप्पा म्हणून दहा दिवसांचा क्रॅश कोर्स घेण्यात आला. एका वर्षात पाच कोर्स पूर्ण करता येण्याचेही स्वातंत्र्य आहे. या दहा दिवसांच्या कालावधीत मराठी भाषा वाढावी, समृद्ध व्हावी, मुलांना मराठी उत्तम लिहिता आणि वाचता यावे, यादृष्टीने प्रशिक्षण देण्यात आले. मराठी प्रार्थना, मराठी महिने, मराठी अंक, गाणी, कविता यांचे शिक्षण देण्यात आले. मुलांकडून मराठी वाचून घेणे व वाचून दाखवणे व त्यांच्याकडून मराठीची ओळख व्हावी म्हणून अक्षरेही लिहून घेण्यात आली. या कार्यशाळेमध्ये जीएसएस पदवीपूर्वच्या मराठीच्या प्रा. अनघा वैद्य-गोडसे यांनी मार्गदर्शन केले. सर्व विद्यार्थ्यांना बालभारती पुणेची मराठीची पुस्तके सवलतीच्या दरात देण्यात आली. बेळगावमध्ये या केंद्राचे काम प्रा. शोभा नाईक या पाहणार आहेत.
मराठी भाषा प्रचार समितीचे काम पुण्यात सुरू झाले आहे. पुणे आणि इतरत्र त्या त्या परिसरातील राष्ट्रीय नेत्यांची चरित्रकथांची पुस्तके देण्यात येणार आहेत. जेणेकरून विद्यार्थ्यांना इतिहासाची माहिती मिळेल व त्याची गोडीही लागेल. मुलांना उभे राहून बोलता आले पाहिजे. सभाधीटपणा आला पाहिजे, यासाठी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, संवाद लेखन स्पर्धासुद्धा घेण्यात येणार आहे. याच उपक्रमांतर्गत दि. 26 रोजी बेळगाव केंद्र येथे शिक्षकांची कार्यशाळा घेण्यात आली. एकूणच मराठी भाषेची नाळ अधिकाधिक दृढ व्हावी व तिच्यापासून कोणीही तुटले जाऊ नये असाच प्रयत्न या केंद्रातर्फे सुरू आहे.
व्यवसायामध्ये मराठी भाषेचा वापर होणे आवश्यक : डॉ. किरण ठाकुर
हा सर्व उपक्रम करण्यामागची मीमांसा करताना डॉ. किरण ठाकुर म्हणाले, महाराष्ट्राला संस्कृतीची एक परंपरा आहे. ही परंपरा मराठी माणसाला कसे वागायचे, याचे धडे देते. महाभारत, रामायण, संतचरित्र, शिवचरित्र मातृभाषेतूनच अधिक प्रभावी ठरते. जीवनसमृद्धी, उत्तम व्यवस्थापन हे संस्कृतीमधूनच अधिक प्रभावीपणे कळते. भाषेचे महत्त्व ओळखून व्यवसायामध्ये त्या भाषांचा वापर होणे आवश्यक आहे. या केंद्राच्या परीक्षा पुणे विद्यापीठाशी समकक्ष असून विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. या विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या शिक्षकांना मानधनही देण्यात आले आहे. मराठी भाषिक शिक्षकांची एक चळवळ सुरू व्हावी, असा प्रयत्न आहे. व्यक्तिमत्त्व विकास, टेबल मॅनर्स याचेही प्रशिक्षण मराठी शाळांमधून देण्यात येणार आहे. एकूणच दोन्ही भाषा विद्यार्थ्यांना अवगत असाव्यात, असाच हा प्रयत्न आहे. इतकेच नव्हे तर यु-ट्यूबवर आता आजी-आजोबा विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. त्याची ही तयारी सुरू आहे. याच हेतूने लहान मुलांमध्ये मराठीची आवड निर्माण होण्यासाठी एक वाचनालय सुरू करण्यात आले आहे. आरपीडी कॉलेज येथे सुरू होणाऱ्या या वाचनालयाचे उद्घाटन सोमवार दि. 3 मार्च रोजी अभिनेत्री व वाचक मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे. लोकमान्य कल्चरल फाऊंडेशनतर्फे हा उपक्रम सुरू होणार आहे.
मुलांमध्ये मराठी भाषेची गोडी निर्माण करावी : अद्वैता उमराणीकर
मुलांच्यामध्ये मराठी भाषेची गोडी निर्माण करणे हा केंद्राचा प्रमुख हेतू आहे. आज मुलांना आपल्या गावाचीसुद्धा नीटशी माहिती नाही. भाषा, संस्कृती यांची माहिती मुलांना असल्यास तरच त्यांना जगाचेही ज्ञान होईल. यासाठी खेळ, कार्यशाळा, प्रशिक्षण, गटचर्चा असे विविध उपक्रम राबविले जातील. आपल्या परिसराची ओळख होण्यासाठी ‘हेरिटेज वॉक’चेसुद्धा आयोजन करण्यात येणार आहे. शिक्षकाने गुगल सर्चची मदत न घेता स्वत:ची क्षमता वाढवावी, अनुकरणाऐवजी अनुसरण करावे हा केंद्राचा हेतू आहे.
मराठी आठव दिवस हि चळवळ न्हवे,सवय व्हायला हवी !
‘त्या’ चिमुरड्याच्या दोन प्रश्नांनी खरे सांगतो मला खूप छळले. भावी पिढीच्या या प्रश्नांना तेव्हा तरी माझ्याकडे उत्तर नव्हते. मग मी ते शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्यातूनच ‘मराठी आठव दिवस’ हा उपक्रम सुरू झाला. तीन वर्षांपूर्वी म्हणजे 2022 च्या 27 फेब्रुवारीला माझ्या सहा वर्षीय मानलेल्या नातवाला घेऊन मी मराठी भाषा गौरव दिवसाच्या शोभायात्रेत सहभागी झालो होतो. शोभायात्रा संपली आणि आम्ही घराकडे परतत असताना नातवाने प्रश्न केला, बाबा मराठीचे हे असे उद्या काही नाही का? एकच दिवस...? त्या चिमुरड्याच्या या दोन प्रश्नांनी खरे सांगतो मला खूप छळले. भावी पिढीच्या या प्रश्नांना तेव्हा तरी माझ्याकडे उत्तर नव्हते. मग मी ते शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्यातूनच ‘मराठी आठव दिवस’ हा उपक्रम सुरू झाला. खरे तर हा उपक्रम सुरू व्हायला आणखी एक कारण घडले. मित्राचा दहा वर्षांचा मुलगा घरात यू ट्यूबवरील हिंदीतून बोलतो, मराठी बोलतच नाही अशी मित्राची तक्रार होती. विचार केला तेव्हा लक्षात आले की, हे प्रकरण खूपच गंभीर आहे. भावी पिढी मराठी वाचणार नाही. मराठी बोलणार नाही, लिहिणार नाही मग मराठी शिल्लक राहील?
तात्काळ निर्णय घेतला आणि ‘मराठी आठव दिवस’ सुरू झाला. मराठी बोला, मराठी लिहा आणि मराठी वाचा ही सोपी त्रिसूत्री ठरवली आणि कामाला लागलो. 27 मार्च 2022 रोजी पहिला मराठी आठव दिवस साजरा केला कोल्हापुरात. एकीकडे मराठी आई-वडील आपल्या पाल्यांना इंग्रजी शाळेत घालण्याचा अट्टहास करत असताना कोल्हापुरात मात्र मला तीन अमराठी कुटुंबे सापडली. त्या तिघांनी आपल्या पाल्यांना मराठी शाळेत घातले होते. कारण विचारले तर तिघांचेही एकच उत्तर होते. आमच्या मुलांचे सर्व आयुष्य महाराष्ट्रातच जाणार आहे. मग त्यांना मराठी यायलाच हवे... बस, मला मराठी आठव दिवसाच्या पहिल्या उपक्रमाचे मानकरी सापडले होते. कोल्हापुरातील उद्योजक मित्र प्रशांत पोकळे यांना सोबत घेतले आणि त्या तीन अमराठी विद्यार्थिनींचा छोटेखानी सत्कार केला. एवढेच नव्हे, तर त्या तिघांनाही मराठी आठव दिवसाने शैक्षणिक दत्तक घेतले. पुढील वर्षभर त्यांचा शैक्षणिक खर्च उचलला.
एप्रिल महिन्यात कणकवलीत उतरलो. या दुसऱ्या कार्यक्रमापासूनच महेश केळुसकर आणि भाऊ कोरगावकर हे दोन स्नेही सोबत राहिले ते आजतागायत. केळुसकर यांनी ‘मराठी आठव दिवस’चे शीर्षक गीत लिहून दिले आणि नवोदित संगीतकार शशिकांत मुंबरे यांने ते संगीतबद्ध केले. सगळेच कसे मस्त जमून आले होते. कणकवली, मुंबई, पुणे, नाशिक असा दर महिन्याच्या 27 तारखेला कार्यक्रम प्रवास घडत गेला. कधी कवी संमेलन, तर कधी बंद पडत चाललेल्या मराठी शाळांबद्दल चिंतेचा परिसंवाद, कधी मराठीची श्रीमंती दाखवणारा कार्यक्रम तर एकदा गोव्यात दिवगंत कवी शंकर रामाणी यांच्यावरील बीज भाषण... मराठी आठव दिवस वैविध्य जपत होता आणि त्या त्या शहरातील, गावातील शे दोनशे मराठी माणसांना एकत्र आणत होता. दरम्यानच्या प्रवासात कवी अशोक नायगावकर आमच्या सोबत आले आणि आम्ही थेट बेळगाव गाठले. मग कुडाळ, नाशिक, शिर्डी, नालासोपारा, पणजी/ फोंडा गोवा... एकेका शहरात, राज्यात मराठी आठव दिवस पोहचत होता... शहरात आणि मराठी माणसात! आता अनेक नावे या चळवळीशी जोडली गेली आहेत. प्रशांत दामले, संतोष पवार, प्रा. अशोक बागवे, संगीतकार कौशल इनामदार, प्रतिभा सराफ, सतीश सोलंकुरकर... अशी अनेक नावे सांगता येतील. मराठी आठव दिवस उपक्रमाची चळवळ कधी बनली समजलेच नाही.
या चळवळीची पहिली दखल जागतिक मराठी अकादमीने घेतली आणि 2023 मध्ये पिंपरी-चिंचवड येथील जागतिक संमेलनात मराठी आठव दिवसचा भव्य सन्मान केला. त्यानंतर 2024 मध्ये या भाषिक चळवळीची दखल इंग्लंड येथील ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स या संस्थेनेही घेतली आणि मानपत्र प्रदान केले. आता मराठी माणसांचे या चळवळीकडे लक्ष जाऊ लागले होते, चर्चा होऊ लागली होती. विशेष म्हणजे मुंबईच्या अंधेरी येथील प्रागतिक विद्यामंदिर या शाळेत गेले वर्षभर हा दिवस विद्यार्थी साजरा करतात. मराठी बोलतात. मराठीवर बोलतात!
27 मार्च 2025 रोजी मुंबईत या चळवळीचा तृतीय वर्धापन दिन आम्ही वेगळ्या पद्धतीने साजरा करणार आहोत. या दिवशी दिवंगत कवी नारायण सुर्वे यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी ‘सुर्वे मास्तरांचे साहित्य संमेलन’ सुरू करणार आहोत. अजून खूप पल्ला गाठायचा आहे, देशभरातील मराठी माणसांपर्यंत पोहचायचे आहे... परदेशातील मराठी बांधवांना साद घालायची आहे.... प्रवास लांबचा आहे, पण इरादा पक्का आहे. मराठी आठव दिवस या उपक्रमाची चळवळ झाली. पण ती सवय व्हायला हवी... आणि एक दिवस हा आठव दिवस बंद होऊन सर्व मराठी माणसांनी दररोज मराठी बोलायला हवे, मराठी लिहायला हवे आणि मराठी वाचायला हवे...!
- रजनीश राणे
मनीषा सुभेदार, बेळगाव

