वि.गो.साठे मराठी प्रबोधिनीतर्फे मराठी भाषा दिन
प्रतिनिधी/ बेळगाव
वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे गोगटे रंग मंदिर येथे मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. प्रारंभी प्रबोधिनीचे सदस्य अनंत जांगळे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. इंद्रजित मोरे यांनी शोक प्रस्ताव मांडला. यानंतर ‘मराठी माध्यम माझी यशोगाथा’ हा परिसंवाद झाला. या अंतर्गत सोनाली व जगदीश बिर्जे, अक्षता व राहुल पाटील, अक्षता व ओकार सुतार यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. मराठी माध्यमातून शिकल्याने झालेला फायदा, या माध्यमाबद्दलचे गैरसमज, मराठी माध्यमातून व्यवसायाच्या संधी याबद्दल त्यांनी विचार मांडले. सविता पवार व नीला आपटे यांनी त्यांची मुलाखत घेतली.
प्रारंभी ‘मराठी माध्यम माझी यशोगाथा’ ही लघुनाटिका अंकिता कदम व शिवानी गायकवाड यांच्यासह माजी विद्यार्थिनींनी सादर केली. लेखन-दिग्दर्शन प्रसाद सावंत यांचे होते. संगीत विभागाने ‘उष:काल होता होता’ व ‘डोंगरी शेत माझे’ ही गीते सादर केली. प्रास्ताविक व स्वागत सुभाष ओऊळकर यांनी केले. प्रबोधिनीचे अध्यक्ष जयंत नार्वेकर यांनी पाहुण्यांचा सत्कार केला. बेळगाव जीएसटी विभागाचे साहाय्यक अध्यक्ष आकाश चौगुले व कॅन्टोन्मेंट बोर्डचे सीईओ सुदाम मंचलवार यांनी मराठी माध्यमातून शिक्षण घेतल्याबद्दल त्यांचा अॅड. राजाभाऊ पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
अंकिता कदम व शिवानी गायकवाड यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.