महामेळाव्यातून मराठी अस्मिता दाखविणार
शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचा निर्धार
बेळगाव : बेळगाववर आपला हक्क दाखविण्यासाठी कर्नाटक सरकारकडून हिवाळी अधिवेशनाचा घाट घालण्यात आला आहे. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही मराठी भाषिकांकडून अधिवेशनाला विरोध म्हणून महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. महामेळाव्यातून मराठी अस्मिता दाखवून देण्याची सीमावासियांना एक संधी असून या दिवशी प्रत्येक मराठी भाषिक आपल्यावरील होणाऱ्या अन्याय, अत्याचाराविरोधात सहभागी होईल, असा निर्धार शहर म. ए. समितीच्या बैठकीत करण्यात आला. शहर म. ए. समितीची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी रामलिंगखिंड गल्ली येथील रंगुबाई भोसले पॅलेस येथे पार पडली. समितीचे ज्येष्ठ नेते बी. ए. येतोजी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीमध्ये महामेळाव्यासह शहर म. ए. समितीच्या पुनर्रचनेवर सखोल चर्चा करण्यात आली. खजिनदार प्रकाश मरगाळे म्हणाले, प्रत्येक समितीच्या कार्यकर्त्यांनी अंगामध्ये समितीनिष्ठा बाणविली पाहिजे. काही गोष्टी बोलणे सोपे असते. परंतु करणे तितकेच कठीण असते. कोणत्याही परिस्थितीत परवानगी मिळाली नाही तरी महामेळावा करणारच. जर महामेळावा होऊ दिला नाही तर शक्य तिथे ठिय्या आंदोलन सुरू करणार असल्याचे त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. यावेळी सरचिटणीस मालोजी अष्टेकर, चिटणीस रणजित चव्हाण-पाटील, समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर, युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांसह इतर उपस्थित होते. बैठकीत सागर पाटील, मदन बामणे, अमित देसाई, मोतेश बारदेशकर, प्रशांत भातकांडे, श्रीकांत कदम, प्रकाश नेसरकर, रणजित हावळाण्णाचे यांनी मनोगत व्यक्त केले.
महामेळाव्यासाठी 16 नोव्हेंबरला पोलिसांकडे अर्ज
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महामेळावा घेणार हे निश्चित असल्याने गुरुवार दि. 16 नोव्हेंबर रोजी म. ए. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासन तसेच इतर यंत्रणांना परवानगीचा अर्ज दिला आहे. परंतु पोलीस आयुक्त सिद्धरामप्पा यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत समितीकडून परवानगीचा अर्ज आला नसल्याचे सांगितले आहे. परंतु 15 दिवसांपूर्वीच म. ए. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परवानगीचा अर्ज दिला असून हा अर्ज बैठकीदरम्यान दाखविण्यात आला.
शहर म. ए. समितीची पुनर्रचना होणार
नवीन कार्यकर्त्यांचा ओढा म. ए. समितीकडे वाढला होता. शहर म. ए. समितीत त्यांना सामावून घ्या, अशी मागणी मागील काही दिवसांपासून होत होती. निवडणुकीच्या काळात शहर म. ए. समितीने 150-250 कार्यकर्त्यांची यादी तयार केली होती. या यादीतून शहर म. ए. समितीची पुनर्रचना केली जाणार आहे. समितीचे कार्यकर्ते मदन बामणे यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे शहर म. ए. समितीत नव्या चेहऱ्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.