पर्यावरण विनाशाला कडाडून विरोध करणारा ''दशावतार ''
सावंतवाडी :
'दशावतार' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. हा चित्रपट रिलीज होऊन ५ दिवस झाले आहेत. सध्या हा चित्रपट रुपेरी पडद्यावर धुमाकूळ घालत आहे. 'बागी ४' आणि 'मिराई' यासारखे चित्रपट चित्रपटगृहामध्ये रिलीज झाले आहेत. तरीही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी ६० लाखाची कमाई केली होती. यानंतर या चित्रपटानं दुसऱ्या दिवशी १.४ कोटी, तिसऱ्या दिवशी २.४ कोटी , चौथ्या दिवशी १.१ कोटींची कमाई केली आहे. तसेच या चित्रपटानं रिलीजच्या पाचव्या दिवशी अंदाजे १.३० कोटींची कमाई केली आहे. सुबोध खानोलकर दिग्दर्शित आणि झी स्टुडिओ आणि ओशन आर्ट प्रस्तुत 'दशावतार' सिनेमा आपल्या कलेवर नितांत श्रध्दा असणाऱ्या आणि शेवटच्या श्वासापर्यंत दशावताराचा ध्यास बाळगलेल्या कोकणातील बाबुली मेस्त्रीची कथा हा सांगून जातो. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी बाबुली मेस्त्रीची भूमिका अगदी सुंदररित्या साकारली असून या चित्रपटातून कोकणाच्या भूमीवर घोंगावणाऱ्या मायनिंग लॉबीचे चित्रण आहे. स्वतःच्या आर्थिक विकासासाठी मायनिंग लॉबी वाले पर्यावरण आणि पर्यायाने गावच्या गाव कशी नष्ट करू शकतात यावर हा चित्रपट प्रकाशझोत टाकतो. बाबुली मेस्त्रींच्या मुलाची भूमिका साकारणारा माधव अर्थात सिद्धार्थ मेनन आपल्या वडिलांच्या उतारवयात त्यांचा आधार बनतो.पदरी शिक्षण असूनही त्याला नोकरीसाठी मुंबई खुणावत नाही.तर वडिलांच्या सेवेसाठी तो कोकणात राहणच पसंत करतो.या चित्रपटातून कोकणातील बेरोजगारीची समस्या अधोरेखित होते. जेव्हा जेव्हा परशुरामाच्या या भूमीत वाईट प्रवृत्ती उद्भवतात तेव्हा त्यांना रोखणारा राखणदार अस्तित्वात आहे हे हा सिनेमा सांगून जातो. या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांचे असून त्यांच्यासह सुजय हांडे, ओंकार काटे, अशोक हांडे, आदित्य जोशी, नितिन सहस्त्रबुद्धे, मृणाल सहस्त्रबुद्धे, संजय दुबे आणि विनायक जोशी चित्रपटाचे निर्माते आहेत. अजित भुरे या चित्रपटाचे सृजनात्मक निर्माते आहेत. गुरु ठाकूर यांचे प्रभावी शब्द चित्रपट समृद्ध करतात. या चित्रपटात दिलीप प्रभावळकर, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, लोकेश मित्तल, अभिनय बेर्डे, आरती वडगबाळकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. दशावतार या चित्रपटाच्या माध्यमातून परशुरामाच्या भूमीत पर्यावरणाचा नाश करणारे प्रकल्प गावकऱ्यांचा विरोध मोडीत काढून कसे आणले जातात. गावचे सरपंच , वनाधिकारी , पोलीस , राजकीय पुढारी यांना हाताशी धरून गावातल्या लोकांना काहीही भनक न लागू देता हे प्रकल्प कसे रेटले जाऊ शकतात याचे चित्रण हा सिनेमा करतो. कोकणच्या विकासाच्या नावाखाली येथील जंगले , कातळशिल्पे , देवराई , कशी नष्ट होऊ शकते हेही दाखवले आहे. वृद्धत्वाकडे झुकलेले परंतु , तरुणाईला लाजवेल असे व्यक्तिमत्त्व बाबुली मेस्त्री अर्थात दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेय. पर्यावरणाचा नाश करणाऱ्या प्रकल्पाला बाबुली मेस्त्रीने आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत कडाडून विरोध केला आहे.