मराठी सिने अभिनेत्री अलका कुबल गुरुवारी मंडोळीत येणार
महिलांच्या स्नेहमेळाव्याला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थिती
वार्ताहर /किणये
मंडोळी गावातील मारुती मंदिर, कलमेश्वर मंदिर व विठ्ठल रखुमाई मंदिर जीर्णोद्धार कमिटी व ग्रामस्थ यांच्या वतीने गुरुवार दि. 29 रोजी सकाळी 11 वा.महिलांचा स्नेहमेळावा आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून मराठी सिने अभिनेत्री अलका कुबल आठल्ये या उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाची महिला वर्गांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे. मंडोळी गावातील पुरातन जागृत मारुती मंदिर, कलमेश्वर मंदिर व विठ्ठल रखुमाई मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात येत आहे. या जीर्णोद्धाराचे कामकाजही जोमाने सुरू आहे. गावातील माहेरवासिनींचा स्नेहमेळावा गुरुवारी सकाळी आयोजिला आहे. या कार्यक्रमाची गावात जय्यत तयारी केली आहे. सकाळी 11 वाजता स्नेहमेळावा होणार आहे. मराठी प्रसिद्ध चित्रपट ‘माहेरची साडी’ चित्रपटामुळे सीमाभागातील घराघरात आणि महिलांना अलका कुबल आठल्येंची चांगलीच ओळख झाली आहे. त्यांचे अन्य बरेच चित्रपट गाजलेले आहेत. तसेच त्यांनी विविध मालिकांमधूनही काम केले आहे. त्यामुळे त्या ग्रामीण भागातील महिलांच्या लाडक्या मराठी अभिनेत्री आहेत. दुपारी 4 ते सायं. 6 या वेळेत हंदिगनूर येथील ज्ञानेश्वरी महिला भजनी मंडळाचा हरिपाठ कार्यक्रम होणार आहे.